१०%रा.खत व खर्च बचत नॅनो डीएपी वापर लेख क्र. – ६ श्री. सतिश कचरे, मंडळ कृषि अधिकारी नातेपुते
नातेपुते (बारामती झटका)
वरचे वर वाढलेल्या, वाढत चालेल्या रासायनिक खतांच्या किमंती, वेळेवर अनुउपलब्धता, वाढलेला उत्पादन खर्च, खराब होत चालेल्या जमिनी, वाढलेला सामू यावर उपाययोजना करणे, काळाची गरज आहे व ते आपल्या हातात आहे. कृषिमध्ये पीकाला युरिया बरोबर मोठ्या प्रमाणावर वापरले जाणारे रासायनिक खत म्हणजे डीएपी होय.
डीएपीच्या ही वजन कमी करून किंमती वाढल्या असून वेळेवर उपलब्ध होत नाहीत. आणि लिकिंगसह घ्यावा लागत आहे. उपलब्ध तंत्रज्ञान, निविष्ठा, वापरले तर आपण शेतकरी बांधव वरील बाबीवर मात करू शकतो. आपण यापूर्वीच्या लेखात १०% रासायनिक खत व खर्च बचत मध्ये १) हिरवळीचे पीके विविध प्रकारच्या पेढी २) सरळ खताचा वापर ३) नॅनो युरिया वापर ४) मातीपरिक्षणावर आधारित संतुलीत खत वापर ५) ठिंबक सिंचनाद्वारे व फवारणीद्वारे द्रवयुक्त खताचा वापर बाबत माहिती घेतली आहे. या लेखात नॅनो डिएपी बाबत महत्व समजवून घेऊ व १०% रासायनिक खत व खर्चात बचत करू या ! गोळीयुक्त डीएपी किंमतीने १८०० ते २१०० रु. प्रति बॅग आहे. ह्या एका बॅगच्या तुलनेत लागणारे नॅनो डीएपी ५०० मिली ६०० रुपयात मुबलक प्रमाणात सहज उपलब्ध आहे. यामध्ये नत्र ८% व फॉस्फरस १६% असून अतिसुक्ष्म कणांनी बनले असून त्याच्या कणांची साईज / आकारमान १०० नॅनोमीटर पेक्षा कमी आहे.
नॅनो डीएपी महत्व १) बाजारात सहज, मुबलक उपलब्ध आहे. २) वाहतूक हाताळणी व साठवणूक पॅकिंग खर्च कमी आहे. ३) संपूर्ण भारतीय बनावटीचे जैवतंत्र इंजिनिअरीग तंत्रज्ञान बनविलेले परकीय चलन वाचविणारे रासायनिक खत आहे. ४) १०० नॅनो मिटर पेक्षा सुक्ष्म कणांमुळे सहज शोषण केले जाते. त्यामुळे याची उपयोगिता, उत्पादन क्षमता, कार्यक्षमता उत्कृष्ट आहे. ५) निसर्ग, पशु, पक्षी, वनस्पती, मानव, पीके परिसंस्थेला मित्रत्वाचे प्रदूषण मुक्त रासायनिक खत आहे. ६) नॅनो कणामुळे पूर्ण शोषण होते. यामुळे हरितद्रव्य वाढ, प्रकाशसंश्लेषण प्रक्रिया वाढ, यामुळे कोंब उगवन क्षमता वाढते. यामुळे दर्जात्मिक उत्पादनात वाढ होते. ७) नॅनो डिएपी सर्व प्रकारच्या बायोस्टीमुलंन्ट, ॲग्रोकेमिकल्स, द्रवरूप खते मधून देता येते. ८) उत्पादनापासून २ वर्षांपर्यंत प्रदीर्घ सेल्फ लाईफ आहे. ९) नॅनो डिएपी फवारणी व सुक्ष्म सिंचनाद्वारे तृणधान्य, कडधान्य, गळीत धान्य, चारपीके, व्यापारी पिके, भाजीपाला, फळे, औषधी, सुंगधी वनस्पतीसाठी, उस, केळी या पीकांस उपयुक्त आहे.
वापरण्याची पद्धत –
१) बीज, कंदमुळे प्रक्रिया – ३ ते ५ मिली प्रतिलिटर पाण्यासह प्रक्रिया करून पेरणी करावी. उगवन क्षमता वाढीसह व्हिगर जोम वाढ दिसून येते. २) फवारणीसाठी २ ते ४ मिली प्रति लिटर वाढची, फुटवे, फुलोरा अगोदर दाणे भरणेचे वेळीस फवारणी लाभदायक ठरते. ३) सुक्ष्म सिंचनाद्वारे २% द्रावण करून देण्यात आल्यावर लाभदायक ठरते. पंपानुसार नॅनो डीएपीचे प्रमाण नॅनो डीएपी चे टोपण २५ मिलीचे असते. त्याप्रमाणे नॅपसॅक स्प्रेसाठी २-३ कॅप (५०-७५ मिली) १५-१६ साठी घेऊन स्प्रे करावा. बुम, पॉवर स्प्रेसाठी ३-४ कॅप (१०० मिली) २०-२५ लिटर टॅकसाठी घ्यावे व एकरी ४ ते ६ टॅक वापरावेत. ड्रोन स्प्रेसाठी २५०-५०० मिली १०-२० लिटर टॅकसाठी १ एकर पिकाला फवारणीसाठी वापरावे.
वापरताना घ्यावयाची काळजी –
१) प्रत्येक स्प्रे ला बाटली हलवून घ्यावी. २) चांगल्या उपयोगासाठी फवारणी सकाळी किंवा संध्याकाळी करावी. ३) फवारणीनंतर १२ तासात पाऊस आला तर नंतर फवारणी करावी. ४) उत्पादन तारीख पासून २ वर्षापर्यत वापर करणे फायदेशीर ठरते. वरील सर्व फायदे, उपलब्धता, उपयोगीता, उत्पादनक्षमता, परकिय चलन वाचविणारे, कार्यक्षमता, सर्व परिसंस्था मित्रत्वाचे नाते ठेवणारे, खर्चाची बचत करणारे, सर्व पीक समावेशक नॅनो डीएपीचा वापर करून १०% पेक्षा जास्त रासायनिक खताची व खर्चाची बचत करणे काळाची गरज आहे व असे आवाहन मंडळ कृषि अधिकारी, नातेपुते कायालयाने केले आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng