आषाढी वारीच्या निमित्ताने वारकऱ्यांना पाच लाख चष्म्याचे वाटप करणार…
‘पंढरीची वारी आरोग्य आपल्या दारी’ उपक्रम राबवणार – आरोग्य मंत्री तानाजीराव सावंत
करमाळा (बारामती झटका)
आषाढी वारीच्या निमित्ताने पंढरपूर येथे येणाऱ्या जवळपास दहा लाख वारकऱ्यांची आरोग्य तपासणी करून त्यांना मोफत औषधे, चष्मे देण्यात येणार असून सर्व प्रकारच्या आरोग्य तपासण्या अत्याधुनिक यंत्राद्वारे करण्यात येणार असल्याची माहिती आरोग्य मंत्री प्राध्यापक तानाजीराव सावंत यांनी दिली.
या बैठकीसाठी जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी स्वामी साहेब, जिल्हा संपर्कप्रमुख प्राध्यापक शिवाजीराव सावंत,
युवा नेते अनिल दादा सावंत, जिल्हाप्रमुख अमोल शिंदे, महेश चिवटे, मनीष निकाळजे, युवा सेनेचे जिल्हाप्रमुख प्रियदर्शन साठे, उपशहर प्रमुख नागेश गुरव, हिवरवाडी शाखाप्रमुख आजिनाथ इरकर, करमाळा तालुका उपप्रमुख दादासाहेब थोरात, शाखाप्रमुख आणि किर्ती यादव आदी उपस्थित होते.
आषाढी वारीच्या निमित्ताने आयोजित बैठकीत ते बोलत होते. या आरोग्य शिबिरासाठी पंढरपूरच्या तिन्ही बाजूला भव्य दिव्य मंडप टाकण्यात येणार असून जवळपास 5000 डॉक्टरांच्या मदतीने सर्व वारकऱ्यांची आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. यावेळी जवळपास 200 डॉक्टर डोळ्यांची तपासणी करण्यासाठी उपस्थित राहणार असून या माध्यमातून किमान पाच लाख वारकऱ्यांना मोफत चष्मे देण्यात येणार आहेत.
थंडी, ताप, खोकला, पोटदुखी, आदी तत्सम आजारांवरची सर्व औषधे मोठ्या प्रमाणावर वारकऱ्यांना दिली जाणार आहेत. संपूर्ण महाराष्ट्र येणाऱ्या सहाशे दिंड्यासोबत एक रुग्णवाहिका व एक फिरता दवाखाना देण्याचे नियोजन महाराष्ट्र शासनाच्या वतीने करण्यात आले आहे. ब्लड प्रेशर तपासणी, शुगर तपासणी, महिलांसाठी गर्भाशयाच्या कॅन्सरची तपासणी, तसेच जवळपास शंभर तपासण्या करण्याची सोय उपलब्ध करण्यात येणार आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या आदेशानुसार हे आषाढी वारीच्या निमित्ताने पंढरपुरात होणारे महाआरोग्य शिबिर असून याला ‘पंढरपूरची वारी, आरोग्य आपल्या दारी’ या स्लोगनने संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्धी करण्यात येणार आहे. आरोग्य शिबिर पार पाडण्यासाठी शिवसेनेचे जवळपास 3000 कार्यकर्ते अहोरात्र तैनात राहणार आहेत. आज प्राध्यापक तानाजीराव सावंत यांनी जिल्ह्यातील प्रमुख अधिकाऱ्यांसह ज्या ज्या ठिकाणी आरोग्य शिबीर होणार आहे त्या जागेची पाहणी केली.
दोन तास चाललेल्या या बैठकीत प्राध्यापक सावंत यांनी मायक्रो प्लॅनिंग करण्याच्या सूचना सर्व अधिकाऱ्यांनी दिल्या. आषाढी वारीच्या निमित्ताने हा जो उपक्रम पंढरपुरात सुरू होणार आहे तो इथून पुढे कार्तिकी वारीला सुद्धा राबविण्यात येणार असून पंढरपूरच्या दोन्ही वारीच्या निमित्ताने इथून पुढील काळात महाराष्ट्र शासनाच्या वतीने पूर्ण आरोग्याच्या तपासणी वारकऱ्यांच्या करण्यात येणार आहेत. हे शिबिर राबवण्यासाठी सोलापूर, पुणे, सातारा, सोलापूर, धाराशिव, अहमदनगर या पाच जिल्ह्यातून सर्व आरोग्य यंत्रणाचे कर्मचारी उपलब्ध राहणार आहेत. जिल्ह्यातील सर्व मेडिकल कॉलेजमधील शेवटच्या वर्षातील डॉक्टर विद्यार्थी सुद्धा आपली सेवा या ठिकाणी देणार आहेत, अशी माहितीही प्राध्यापक तानाजीराव सावंत यांनी दिली.
या आरोग्य तपासणीमध्ये काही वारकऱ्यांना जर आवश्यकता वाटली तर त्या वारकऱ्यांना मोफत शस्त्रक्रिया करून द्यायची व्यवस्था महाराष्ट्र शासनाच्या वतीने जिल्हा पातळीवरील दर्जेदार रुग्णालयात मोफत करून देण्यात येणार आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng