आ. बबनराव शिंदे यांचेकडून वैद्यकीय शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना १ लाखाची मदत
मानेगाव येथील संस्कृती मोटे व दिपक गावडे यांना दिले प्रत्येकी ५० हजार
माढा (बारामती झटका) राजेंद्र गुंड यांजकडून
माढा तालुक्यातील मानेगाव येथील सर्वसामान्य गरीब कुटुंबातील होतकरू व अभ्यासू विद्यार्थी संस्कृती हरिश्चंद्र मोटे व दिपक बापू गावडे या दोघांनीही वैद्यकीय पात्रता परीक्षेत अर्थात नीटच्या परीक्षेत अनुक्रमे 720 पैकी 678 व 660 गुण प्राप्त केल्याबद्दल दोघांचाही यथोचित सत्कार आमदार बबनराव शिंदे यांच्याहस्ते करण्यात आला.
संस्कृती मोटे व दिपक गावडे या दोघांच्याही घरची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने जिल्हा दूध संघाचे चेअरमन रणजितसिंह शिंदे व मानेगाव येथील नेतेमंडळी आणि ग्रामस्थांच्या विनंतीवरून आमदार बबनराव शिंदे यांनी पुढील वैद्यकीय शिक्षणासाठी मदत म्हणून प्रत्येकी ५० हजार अशी १ लाखाचे सहकार्य केले आहे. मतदारसंघातील गोरगरीब, गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना मदत करण्याची भूमिका आ. बबनराव शिंदे यांनी घेतल्याबद्दल या दोघांच्या कुटुंबियांनी व ग्रामस्थांनी त्यांचे आभार मानले.
यावेळी बोलताना आ. बबनराव शिंदे म्हणाले की, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करून प्रामाणिक कष्ट, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर वैद्यकीय पात्रता परीक्षेत मिळवलेले यश हे कौतुकास्पद आणि प्रेरणादायी आहे. या दोघांनीही आईवडिलांच्या कष्टाचे चीज केले असून भविष्यात ते नक्कीच डॉक्टर होण्याचे स्वप्न साकार करतील, अशी अपेक्षा व्यक्त केली. या दोन्ही यशस्वी विद्यार्थ्यांचा आदर्श इतरांनी घ्यावा असे आवाहनही त्यांनी केले.

यावेळी जिल्हा दूध संघाचे चेअरमन रणजितसिंह शिंदे, मानेगावचे नेतेमंडळी, ग्रामस्थ व मोटे आणि गावडे कुटुंबातील सदस्य उपस्थित होते.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng