Uncategorizedताज्या बातम्या

कोरोनाकाळात आरोग्यदूत म्हणून मिरवणारा निघाला गुटखा माफिया, महाराष्ट्रात गुटख्याचं अवैध नेटवर्क चालवत असल्याचं समोर

अनेक राजकीय व्यक्ती तसंच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसोबत वावर असलेला आणि स्वतःला आरोग्यदूत म्हणवून घेणारा तुषार जगताप हा चक्क गुटखा माफिया…

नाशिक (बारामती झटका)

नाशिक ग्रामीण पोलिसांची एक कारवाई सध्या चांगलीच चर्चेचा विषय ठरत आहे. अनेक राजकीय व्यक्ती तसंच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसोबत वावर असलेला आणि स्वतःला आरोग्यदूत म्हणवून घेणारा तुषार जगताप हा चक्क गुटखा माफिया निघाला आहे. परराज्यातील साथीदारांच्या मदतीने तो महाराष्ट्रातील गुटख्याचे अवैध नेटवर्क चालवत असल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे. 

26 मे 2023 रोजी इगतपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुटख्याने भरलेल्या दोन कंटेनरमधून सव्वा कोटींचा अवैध गुटखा पोलिसांनी जप्त केला होता. यातील मुख्य आरोपी आणि जवळपास तीन वर्षांपासून अनेक गुन्ह्यात फरार असलेल्या राज किशनकुमार भाटिया याला राजस्थानच्या जयपूरमधून गेल्या आठवड्यात अटक करण्यात आली होती. राज भाटिया हा दिल्ली आणि जयपूरमधून सूत्रे हलवून बंद कंटेनरमध्ये गुटखा लपवत देशातील विविध राज्यांमध्ये गुटख्याची तस्करी करतो. दरम्यान राज भाटियाची सखोल चौकशी सुरु असतानाच 2021 पासून तो तुषार जगतापच्या मदतीने महाराष्ट्रातील गुटख्याचे अवैध नेटवर्क चालवत असल्याची कबुली त्याने दिली आणि त्यानुसार तुषार जगतापला इगतपुरी पोलिसांनी मंगळवारी (27 जून) बेड्या ठोकल्या आहेत. दरम्यान तुषारच्या अटकेमुळे गुटखा तस्करीची राज्यातील पाळेमुळे खोदण्यास पोलिसांना मदत होणार आहे.

नाशिक ग्रामीण पोलिसांकडून गुटखा तस्करीचे आंतरराज्यीय रॅकेट उद्ध्वस्त

नाशिक ग्रामीण पोलिसांनी गुटखा तस्करीचे मोठे आंतरराज्यीय रॅकेट उद्ध्वस्त केलं आहे. 26 मे रोजी नाशिक-मुंबई महामार्गाने भिवंडीच्या दिशेने कंटेनरमधून जवळपास सव्वा कोटी रुपयांचा गुटखा इगतपुरी पोलिसांनी पकडला होता. गुटखा कुठून आला याचा माग काढत असताना दिल्ली, जयपूरमधून सूत्रे हलवीत देशाच्या विविध राज्यात गुटख्याची तस्करी करणारा राज भाटियाला जयपूरमधून अटक करण्यात आली होती. 

आरोग्यदूत म्हणवून घेणारा निघाला गुटखा माफिया

त्याच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार नाशिकसह राज्याच्या इतर भागात गुटखाचे रॅकेट चालवल्याच्या संशयावरुन स्वतःला आरोग्यदूत म्हणवून घेणाऱ्या तुषार जगतापला अटक करण्यात आली. मात्र त्याला लगेच जमीनही मंजूर झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. तुषार जगताप याचा अनेक राजकीय नेत्यांशी आणि बड्या अधिकाऱ्यांशी सलोखा आहे. कोरोना काळात त्याने रुग्णांना ऑक्सिजन वाटप केल्याने आरोग्य दूत अशी पदवी त्याने स्वतःला लावून घेतली. सिक्स पॅक बॉडी बनवून मोटिवेशन रिल्स बनवीत असल्याने तुषार जगताप सध्या चांगलाच चर्चेत होता. मात्र गुटखा रॅकेटमध्ये त्याचे नाव समोर आल्यानं अनेकांना धक्का बसलाय, यात अजून कोणाकोणाची नाव समोर येतात याकडे लक्ष लागलं आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

One Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button