बार्टीला वाचविण्यासाठी इंदिरा अस्वार आणि धनश्री अवचरे यांना कार्यमुक्त करा

२० जुलैपासून आझाद मैदानावर बेमुदत धरणे आंदोलन
पुणे (बारामती झटका)
डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या (बार्टी) निबंधक इंदिरा अस्वार यांच्यावर माहिती अधिकार प्रकरणात खाडाखोड करणे, मुंबई उच्च न्यायालयात केसेस दाखल असतानाही आर्थिक हितसंबंध जोपासण्यासाठी या संस्थांची प्रकरणे दाबून ठेवणे, व्हेंडरला नियमबाह्य कामे देणे, बार्टीच्या हिताच्या प्रकल्पांना जाणीवपूर्वक प्रलंबित ठेवणे, प्रामाणिकपणे काम करणारे समतादूत, कर्मचारी, अधिकारी यांचा मानसिक छळ करणे, काही स्पर्धा परीक्षा केंद्रांना हाताशी धरून मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या योजनांवर डल्ला मारणे, भीमा कोरेगांव भोजन प्रक्रियेत घोटाळा करणे, स्वतःच्या फायद्यासाठी शासननिर्णय विरूद्ध पत्र निर्गमित करणे आदी आरोप असल्याने आम्ही त्यांची विभागीय चौकशी सुरू करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यासाठी दि. ८ जून २०२३ रोजी पुणे येथील बार्टीच्या कार्यालयासमोर एक दिवस व दि. २१ जून रोजी मुंबई येथील आझाद मैदानावर तीन दिवस उपोषण केले होते. तरीही निबंधक इंदिरा अस्वार यांनी धनसंपत्तीच्या जोरावर सत्ताधारी व वरिष्ठ अधिकाऱ्यांना मॅनेज केल्याने त्यांच्यावर कसलीही कारवाई होताना दिसत नसून बड्या नेत्यांच्या व अधिकाऱ्यांच्या आशिर्वादाने त्यांनी बार्टीमध्ये मनमानी कारभार सुरू केला आहे. त्यामुळे एससी समाजाच्या सर्वांगीण उन्नतीसाठी कार्यरत असलेल्या बार्टीला संपविण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या निबंधक इंदिरा अस्वार व दोषसिध्दीनंतर तत्कालीन महासंचालकांनी कार्यमुक्त केल्यानंतर पुन्हा बेकायदेशीररित्या कामावर घेतलेल्या धनश्री अवचरे यांना कार्यमुक्त करेपर्यंत मुंबई येथील आझाद मैदानावर गौतम भंडारे, सुनील ओवाळ, कविता गाडगे, महानंदा डाळिंबे, शकुंतला शेलार व सतीश गायकवाड यांनी बेमुदत धरणे आंदोलन करणार असल्याचे प्रसिध्दीपत्रकाद्वारे जाहीर केले आहे.

साप्ताहिक बंडखोरचे संपादक गौतम भंडारे यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तथा सामाजिक न्याय विभागमंत्री, सामाजिक न्याय व विशेष विभागाचे सचिव यांना याबाबत निवेदन दिले. यावेळी दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, इंदिरा अस्वार यांना पदमुक्त करुन त्यांची विभागीय चौकशी करण्याचे पत्र तत्कालीन महासंचालकांनी दि. २३ जानेवारी २०२३ रोजी मुख्यमंत्री व सामाजिक न्याय विभागाच्या सचिवांना पाठवले होते. त्या पत्राच्या अनुषंगाने व आम्ही मुंबई येथील आझाद मैदानावर केलेल्या उपोषणामुळे त्यांच्या विभागीय चौकशीला गती प्राप्त झालेली दिसत आहे. अशा परिस्थितीत निबंधक इंदिरा अस्वार यांनी दोषसिध्दीनंतर कार्यमुक्त केलेल्या धनश्री अवचरे यांची फेरनियुक्ती केलेली आहे. मात्र, आपल्या फेरनियुक्तीनंतर धनश्री अवचरे यांनी प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना त्रास देण्यास सुरूवात केलेली आहे. तसेच ज्यांना ज्यांना दोषसिध्दीनंतर कार्यमुक्त केलेले होते त्यांना अस्वार कामावर रुजू करुन घेण्याच्या प्रयत्नात आहेत. त्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने एससी समाजाच्या सर्वांगीण उत्थानासाठी कार्यरत असलेल्या बार्टी या संस्थेला बदनाम करुन संपविण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या निबंधक इंदिरा अस्वार व पुन्हा बेकायदेशीररित्या कामावर रुजू करून घेतलेल्या धनश्री अवचरे यांना तात्काळ कार्यमुक्त करावे. शासनाने धनश्री अवचरे प्रकरणात चौकशी अहवाल मागविला असतानाही विहित प्रक्रिया न करता मागील कार्यकाळात काढून टाकलेल्या किंवा सोडून गेलेल्या वाईट कर्मचाऱ्यांना घेण्याची सुरु केलेल्या प्रकरणाची चौकशी करावी व शासनाच्या आदेशाशिवाय नवीन भरती करण्यास प्रतिबंध करावे. इंदिरा अस्वार यांच्यावर विभागीय चौकशी सुरू करण्यात दिरंगाई करणारे व इंदिरा अस्वार यांना मदत करणारे मंत्रालयातील अधिकारी यांची चौकशी करावी. मुंबई मॅट कोर्टाने इंदिरा अस्वार यांना शासन स्तरावरून काढून टाकण्याची प्रक्रिया करावी, असे आदेश देऊनही त्यांना कार्यमुक्त करण्यात आले नाही याची चौकशी करावी. इंदिरा अस्वार यांना कार्यमुक्त करुन मूळ विभागात परत पाठवावे, भीमा कोरेगाव कोर्ट प्रकरणाची नसती संदेहास्पदरित्या हाताळणाऱ्या ॲड. बनकर यांना काढून टाकले असताना पुन्हा त्यांना व सनद जप्त झालेल्या न्यायाधिशांना बार्टीत घेऊन भीमा कोरेगाव प्रकरण कमकुवत करणाऱ्या इंदिरा अस्वार यांची विभागीय चौकशी सुरू करावी. तसेच त्यांनी आजपर्यंत नियमबाह्यरित्या केलेली सर्व कामे याबद्दल अद्ययावत दोषारोपपत्र दाखल करण्यात यावे. ॲड. बनकर व माजी न्यायाधीश अहिवळे यांना कार्यमुक्त करून विहित प्रक्रियेद्वारा दर्जेदार न्यायिक अधिकारी घ्यावेत, भीमा कोरेगाव न्यायिक प्रकरणात इंदिरा अस्वार यांनी केलेली कागदपत्रांची हानी याची तात्काळ चौकशी आयुक्त समाजकल्याण मार्फत करावी व इंदिरा अस्वार यांना या प्रकरणापासून तात्काळ दूर करावे, भीमा कोरेगाव भोजन घोटाळा यात इंदिरा अस्वार यांच्यावर तात्काळ कार्यवाही करावी, समाजातील जबाबदार संघटना तक्षशिला महिला मंडळ यांनी इंदिरा अस्वार यांच्यावर केलेल्या अनेक गंभीर तक्रारींना केराची टोपली दाखविण्यात आली आहे.
त्या अत्यंत गंभीर तक्रारींची चौकशी करावी व केराची टोपली दाखविण्याऱ्यांवर कार्यवाही करावी. अन्यथा दि. २० जुलै २०२३ पासून आझाद मैदान, मुंबई येथे बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येईल याची नोंद घ्यावी, असे यावेळी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. या निवेदनावर गौतम भंडारे, सुनील ओवाळ, कविता घाडगे, शकुंतला शेलार, महानंदा डाळिंबे आदिंच्या सह्या आहेत.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng