माळशिरस तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेतातील शेती साहित्य, शेळ्या, बोकडे, मोटार सायकल चोरी होण्याच्या घटनेत वाढ !

माळशिरस तालुक्यातील पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी, पिडीत जनतेची मागणी
माळशिरस (बारामती झटका)
माळशिरस तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेतातून काही दिवसांपासून केबल, मोटर, स्टार्टर इत्यादी शेती साहित्य चोरी होण्याच्या घटना सातत्याने वाढत आहेत. घरासमोरील शेळ्या, बोकड, मोटरसायकल यांचीही चोरी होण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आहेत. शेतकऱ्यांच्या शेतातून शेती साहित्य, केबल, मोटर, स्टार्टरची चोरी करणाऱ्या चोरांना व घरासमोरील चोरी पकडण्यासाठी पोलिसांनी रात्रीची गस्त घालावी, अशी मागणी सर्वसामान्य जनता व पीडित शेतकरी यांच्यामधून होत आहे.पावसाळा सुरू होऊन काही दिवस झाले तरी अद्यापही पावसाने तालुक्यात काही भागांमध्ये पाठ फिरवल्याने पाण्याअभावी शेतकऱ्यांची पिके जळून चालली आहेत.
शेतकरी मोठ्या अडचणीत सापडला असताना दुसरीकडे शेतकऱ्यांच्या शेतामधून केबल, मोटर, स्टार्टर इत्यादी शेती विषयक साहित्याची चोरी होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढू लागल्याने शेतकरी चिंतेत आहेत.
माळशिरस तालुक्यातील सर्वच पोलीस स्टेशनच्या हद्दीतील पोलिसांनी रात्रीची गस्त घालत असताना केबल, मोटर, स्टार्टर इत्यादी शेती साहित्याची चोरी करणाऱ्या चोरांना अटक करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई देखील केली आहे. तरीसुद्धा चोऱ्यांचे प्रमाण वाढत असल्याने कडक कारवाई करण्याची गरज आहे. तालुक्यातील गावागावात व वाड्या-वस्त्यांवर सातत्याने होणाऱ्या भुरट्या चोऱ्यांचे प्रमाण रोखण्यासाठी ग्रामसुरक्षा दलाची स्थापना ग्रामपंचायतीच्या मदतीने करण्यात आलेली आहे.
लाखो रूपये खर्च करून गावात अनेक ठिकाणी सीसी टीव्ही कँमेरे बसवण्यात आले. परंतु, गावातील चोऱ्या़चे प्रमाण काही कमी झाले नाही. उलट भुरट्या चोऱ्यांचे प्रमाण वाढले असून पोलीस यंत्रणेने याची दखल घेऊन रात्रीची गस्त वाढवून चोरांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी स्थानिक ग्रामस्थ व शेतकरी वर्गातून होत आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng