आदिनाथ कारखाना सक्षमपणे चालवणार – प्रा. तानाजीराव सावंत

करमाळा (बारामती झटका)
सहकारी साखर कारखाना पूर्णपणे सक्षम पद्धतीने चालवण्यासाठी ऊस तोडणी यंत्रणा भरलेली असून प्रशासकीय संचालकांनी सर्व सभासद, ऊस उत्पादक, शेतकरी, कर्मचारी यांना विश्वासात घेऊन अत्यंत चांगल्या पद्धतीने कारखाना चालू करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा, असे मत राज्याचे आरोग्य मंत्री तथा आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचे पालकत्व स्वीकारलेले प्राध्यापक तानाजीराव सावंत यांनी व्यक्त केले.
पुणे येथे प्रशासकीय संचालक बाळासाहेब बेंद्रे, सदस्य महेश चिवटे, संजय गुटाळ यांनी पुणे येथे प्रा. तानाजीराव सावंत यांची भेट घेऊन आदिनाथ कारखान्याच्या झालेल्या कामकाजाचा आढावा त्यांच्यासमोर मांडला.
आदिनाथ कारखान्याच्या कारभाराबद्दल प्रा. तानाजीराव सावंत यांनी समाधान व्यक्त करून किमान पाच लाख टन उसाचे गाळप करून कारखान्याचे भवितव्य सुरक्षित करावे. ऊस उत्पादक सभासदांनी सुद्धा हा आपला मालकीचा कारखाना आहे, हा उद्देश डोळ्यापुढे ठेवून क्रियाशील सभासद म्हणून कायमस्वरूपी राहण्यासाठी प्रत्येकाने या कारखान्याला ऊस द्यावा, असे आवाहन संचालक बाळासाहेब बेंद्रे यांनी केले आहे.

ऊस वाहतूक तोडणीचे करार भैरवनाथ शुगर आलेगाव व भैरवनाथ शुगर या मार्फत करण्यात आले आहे. सर्व कर्मचारी उत्साहाने व एकजुटीने कामकाज करीत असून कामकाजातील प्रगती बद्दल बाळासाहेब बेंद्रे यांनी समाधान व्यक्त केले आहे.
शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख प्राध्यापक शिवाजीराव सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली यावर्षीच्या गाळपाचे नियोजन करण्यात आले असून आदिनाथ पूर्ण क्षमतेने चालू होणार असल्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांतून समाधान व्यक्त होत आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng