जिजामाता महाविद्यालयात श्रीमती रत्नप्रभादेवी मोहीते पाटील यांची जयंती उत्साहात साजरी

संग्रामनगर (बारामती झटका) केदार लोहकरे यांजकडून
अकलूज येथील जिजामाता कन्या प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयात श्रीमती रत्नप्रभादेवी मोहिते पाटील ऊर्फ आक्कासाहेब यांची ९८ वी जयंती साजरी करण्यात आली. यावेळी शिक्षण प्रसारक मंडळ अकलूजचे संचालक रामचंद्र गजाबा गायकवाड कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. तर प्रमुख व्याख्यात्या म्हणून सुनिता ठोंबरे उपस्थित होत्या.
यावेळी सुनिता ठोंबरे यांनी श्रीमती रत्नप्रभादेवी मोहिते पाटील यांच्या जीवनाचा आढावा त्यांनी घेतला. तसेच आदर्श माता, आदर्श गृहिणी आणि आदर्श स्त्री म्हणून आक्कासाहेबांच्या संस्कारी जीवनाचा आढावा घेतला. विद्यार्थीनींनी मूल्य संस्कारांची जोपासना करत सामाजिक भान राखण्याचे कार्य प्रवृत्त होण्याचे आवाहन याप्रसंगी सौ. ठोंबरे यांनी केले.

जिजामाता कन्या प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय अकलूजच्या मुख्याध्यापिका सुनीता वाघ यांनी प्रास्ताविकामध्ये श्रीमती रत्नप्रभादेवी मोहिते पाटील अर्थात आक्कासाहेबांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली. २५ जुलै हा प्रताप क्रीडा मंडळाच्या अध्यक्षा व रत्नाई संकुलच्या मार्गदर्शक स्वरूपाराणी जयसिंह मोहिते पाटील यांचाही जन्मदिवस असल्याने त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
या प्रसंगी शैक्षणिक वर्ष २०२३-२४ मधील प्रथम पारितोषिक वितरण समारंभ या औचित्यावर पार पडला. पी. ए. गोडसे आणि रोहित माने यांनी पारितोषिक वितरण समारंभाचे नियोजन व सुत्रसंचालन केले. इयत्ता दहावीतील विद्यार्थिनी कुमारी आयेशा तिकोटे हिने याप्रसंगी आक्कासाहेबांच्या जीवन कार्याविषयी मनोगत केले.
आक्कासाहेबांच्या जयंतीनिमित्त रत्नाई संगीत वाद्यवृंदाने माऊली शेलार यांचेसोबत रत्नाईगीत सादर करून आक्कासाहेबांना आदरांजली वाहिली तसेच याप्रसंगी वृक्षारोपणही करण्यात आले. प्रशाला समितीच्या सदस्या मनीषा चव्हाण तसेच प्रशालेतील सर्व विद्यार्थिनी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी याप्रसंगी उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिग्विजय जाधव यांनी केले तर आभार प्रदर्शन वाय. के. माने देशमुख यांनी केले. ‘सारे जहाँ से अच्छा’, या देशभक्तीपर गीताने कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला. शिक्षण प्रसारक मंङळाच्या सर्वच शाखांमध्ये जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng