महात्मा फुले जन आरोग्य योजनेत सर्पदंश आणि ॲपेंडिक्सचा समावेश – आरोग्य मंत्री तानाजी सावंत

सार्वजनिक आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांची महत्वपूर्ण घोषणा
मुंबई (बारामती झटका)
महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत सर्पदंश व ॲपेंडिक्स या आजारांचा समावेश करणार असल्याची महत्वपूर्ण घोषणा सार्वजनिक आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी गुरुवारी विधानसभेत केली.
आमदार दिलीप चव्हाण यांनी महात्मा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत आजारांची संख्या वाढवण्याबाबत लक्षवेधी सूचना मांडली होती. राज्यात महात्मा फुले जन आरोग्य योजनेची मदत पाच लाख रुपयांपर्यंत वाढविली परंतु, त्याची अंमलबजावणी होत नाही. सुरुवातीला साधारणतः ९५० आजारांचा समावेश केला होता. ही संख्या १९०० पर्यंत वाढविली आहे. सर्पदंश व ॲपेंडिक्सचा त्यात समावेश करावा, अशी मागणी केली होती

मंत्री सावंत यांनी यावर उत्तर दिले. महात्मा फुले जन आरोग्य योजना व आयुष्मान भारत-पंतप्रधान जन आरोग्य योजनेअंतर्गत सर्पदंशासाठी उपचार उपलब्ध आहेत. सर्पदंशासाठी लागणारे इंजेक्शन देखील शासकीय दवाखान्यात मोफत दिले जाते. आता सर्पदंश व ॲपेंडिक्सचा या योजनेत समावेश केला जाईल. तसेच या योजनेत समावेश करायच्या नव्या आजारांच्या निवडीसाठी एक विशेष समिती गठीत केली जाईल. समिती त्यावर निर्णय घेईल, असे सार्वजनिक आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी सांगितले.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng