ताज्या बातम्यासामाजिक

पद म्हणजे काय ?

माळशिरस (बारामती झटका)

कोणत्याही क्षेत्रातील पद म्हणजे सहकाऱ्यांनी त्या क्षेत्रात समूह हितासाठी उपलब्ध करून दिलेली संधी व काटेरी मुकुट असतो. कोणत्याही माणसाचे महत्व हे पद मिळाल्यामुळे कधीच वाढत नाही तर, तो त्या पदाला किती न्याय देतो, तो किती कार्यक्षम, कर्तुत्व, नेतृत्व, दाखवतो यावरच त्याचे खरे व्यक्तिमत्व समाजाला समजते‌. कर्तृत्वच नसेल आणि पद मिळाल्यामुळे अहंपणा स्वार्थपणा, लबाडी व गर्व चढला असेल तर, कालांतराने निश्चितच त्याचा गर्व खाली होतो. पदामुळे तात्पुरते महत्त्व वाढते पण चांगल्या कर्तुत्वामुळे आयुष्यभर महत्त्व राहते.

पदामुळे आपल्यावर असलेली जबाबदारी व्यवस्थित वेळ देऊन पार पाडली पाहिजे. चांगली माणसं, सहकारी बरोबर घेऊन त्या क्षेत्रात यश मिळवले पाहिजे. ज्यांनी तुमच्यासाठी त्याग केला आहे, त्यांची जाणीव निरंतर व कायमच ठेवली पाहिजे. व्यक्ती जेव्हा समाजात जितक्या उंचीवर पोहोचते ती निव्वळ त्याच्या कर्तुत्वामुळे नव्हे तर त्या व्यक्तीच्या सोबत असलेल्या बऱ्याच लोकांनी केलेल्या त्यागाचा सुद्धा त्यात महत्त्वाचा वाटा असतो. म्हणून संबंधितांनी आपल्या स्वतःला मोठे म्हणण्यापेक्षा आपल्याला मोठे करणारी आपली माणसं मोठी असतात, याची जाणीव ठेवून वागलेलं बरं.

ज्या पायरीचा सहारा घेऊन आपण पुढची पायरी गाठली आहे, त्या पायरीला कधीच विसरू नये. कारण, त्या पायरीचा आधार घेतला नसता तर आपण पुढची पायरी कधीच ओलांडू शकलो नसतो.

लक्षात असू द्या, पद क्षणभंगुर असते, पण पद गेल्यावरही आपली किंमत कायम राहिली पाहिजे, असे माणसांशी वागले पाहिजे. नाहीतर हाच समाज तुमची कार्यक्षमता, कर्तुत्व, वागणं, प्रामाणिकता व बोलणं पाहत असतो, ऐकत असतो, आणि सहनही करत असतो. मात्र, लबाडीपणा वाढला तरी योग्य वेळी धडा शिकवतो की, तिथं तुमची किंमत रसातळाला जाऊन शून्य होते. म्हणूनच आपल्या माणसांशी, समाजाशी व विश्वासू मित्रांशी नीट वागा, नीट बोला व आपले कर्तुत्व निस्वार्थी व चांगले आहे, हे सिद्ध करा. तरच, लोक तुमच्यासोबत राहतील.

जो दुसऱ्यांना मान देतो, मुळात तो स्वतःच सन्माननीय असतो. कारण, माणूस दुसऱ्यांना तेच देऊ शकतो जे त्याच्या जवळ असते. मनाचा मोठेपणा हा गुण आहे. जो पदाने नव्हे तर संस्कारांनी प्राप्त होतो. म्हणून प्रत्येक व्यक्तीने पद आहे म्हणूनच काम केले पाहिजे, असं नाही. पद हे आपण मागून नाही तर आपल्या लोकांनी, समाजाने दिलं पाहिजे. तरच, त्या कर्तुत्वाला मानसन्मान मिळतो. पद म्हणजे मी कुणी मोठा आहे, हे ज्या दिवशी मनात येईल त्या दिवसापासून आपली उतरती कळा सुरू झाली हे समजून जा. यामुळे पदाचा गर्व टाळून पदाला न्याय मिळेल असेच काम करा.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

3 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button