काय सांगताय ?? जिल्हा परिषद शाळेचा शिक्षक चक्क “ठेकेदार” झाला…

“ऐकावे ते नवलच” शिक्षक शाळेत विद्यार्थ्यांना बे चे पाढे व बाराखडी लिहायला सांगतात, तसेच ग्रामसेवक व शाखा अभियंता शिक्षक सांगतात तसेच बिल लिहितात म्हणे..
माळशिरस (बारामती झटका)
केंद्र सरकार व महाराष्ट्र शासन यांच्याकडून थेट ग्रामपंचायतीला जनतेचा व ग्रामीण भागातील मूलभूत सुविधांचा विकास करण्याकरता निधी उपलब्ध होत असतो. त्यामधून गावचा विकास साधावयाचा असतो. गावचे सरपंच, उपसरपंच व सदस्य गावातील विकासकामे स्वतः अगर दुसरे ठेकेदार यांचेकडून करून घेत असतात. मात्र, एका ग्रामपंचायतीच्या सरपंचाचा भाऊ जिल्हा परिषद शाळेचा शिक्षक आहे. शिक्षक असताना चक्क ठेकेदार झालेले आहेत. विशेष म्हणजे शिक्षक शाळेत विद्यार्थ्यांना बे चे पाढे व बाराखडी लिहायला सांगतात. तसेच ग्रामसेवक व शाखा अभियंता यांना शिक्षक सांगतात तसेच बिल लिहितात, अशी चर्चा गावामध्ये सुरू आहे. सामाजिक कार्यकर्ते व ग्रामपंचायत सदस्य यांचे सखोल माहिती काढण्याचे काम सुरू आहे.
आई-वडील यांच्यानंतर शिक्षक पूज्य गुरुजन वर्ग असतात. समाजामध्ये आई-वडील जसे मुलांना संस्कार देतात तसेच संस्कार जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक देत असतात. अनेक शिक्षकांनी समाजामध्ये चांगल्या पद्धतीने ज्ञानार्जन करून विद्यार्थ्यांना घडविलेले आहे. शिक्षकांची ९०% आपल्या शिक्षणातील विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता व बुद्धी विकास व्हावा यासाठी धडपड सुरू असते. मात्र १०% टक्के शिक्षक शिक्षकी पेशाला काळीमा फासणारे काम करीत असतात. कितीतरी शिक्षक शाळेमध्ये विद्यार्थ्यांना अभ्यास करा, असे सांगून शाळेच्या मैदानात व व्हरांड्यात बसून फोनवर चर्चा करतात, खडी आली का ? वाळू आली का ? सिमेंट भिजलं का ?, इंजिनियरची भेट झाली का ? सेंट्रींगचे सामान आले का ? कामगारांचा पगार एवढा कसा झाला ? असे तासनतास फोनवर बोलत असतात. ज्या शिक्षकांचा प्लॉटिंगच्या व्यवसाय आहे, अशा शिक्षकांचा फोन सुरू असतो.
एक वर्ग सावकारकीमध्ये आहे. शाळेच्या आवारातच व्याजाने पैसे दिलेल्या लोकांना बोलवून घेऊन विद्यार्थ्यांच्या समोरच कितीतरी वेळ सावकारकीच्या व्यवहाराविषयी चर्चा सुरू असते. आजपर्यंत प्लॉटिंग व्यवसाय व सावकारकी करणारे शिक्षक पाहिलेले होते आता मात्र, चक्क ठेकेदार झालेले शिक्षक पाहावयास मिळत आहेत.
घरातील बंधू सरपंच अथवा उपसरपंच असल्यानंतर शिक्षक स्वतःला अति हुशार समजून आमच्या भावाला समजत नाही, असे म्हणून ग्रामपंचायतीच्या कामांमध्ये शाळेच्या वेळेमध्ये हस्तक्षेप करत असतात. अनेकवेळा पंचायत समितीत बांधकाम विभागात एमबी घेऊन जात असतात. कामावर चक्कर मारीत असतात. येणा-जाणाऱ्या लोकांनी सहज चौकशी केली की, रस्त्याचे काम कोण करते. तर, रस्त्यावरील कामगार व बांधकाम विभागातील कनिष्ठ कर्मचारी यांनी थेट शिक्षकांचे नाव सांगितले असल्याचे रेकॉर्डिंग तयार झालेले आहे.
सध्या शिक्षक ठेकेदार यांचे प्रस्थ वाढत आहे. गावातील नागरिक त्रस्त आहेत, यासाठी पंचायत समितीच्या शिक्षण विभागाने कामचुकार व बेजबाबदार असणारे
१०% टक्के शिक्षक यांच्यावर कडक कारवाई करावी या मागणीने पालक वर्गातून सूर निघत आहे. गावातील सामाजिक कार्यकर्ते व ग्रामपंचायत सदस्य यांचे ठेकेदार शिक्षक यांचा बंदोबस्त करण्यासाठी पुरावे जमा करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng