शासन शिक्षक भरती करणार असल्याने भविष्यात शिक्षण शास्त्राची पदवी घेतलेल्या विद्यार्थ्यांना चांगले दिवस येणार – प्रा. रवींद्र वंजारे.

संग्रामनगर (बारामती झटका) केदार लोहकरे यांजकडून
कोडोली (ता. पन्हाळा) महाराष्ट्र शासन लवकरच शिक्षक भरती करणार असल्याचे जाहीर झाले आहे. त्यामुळे शिक्षणशास्त्राची पदवी घेतलेल्या विद्यार्थ्यांचा भविष्य काळ उज्ज्वल आहे,” असे भाकित वारणानगर येथील तात्यासाहेब कोरे शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचे प्रा. रवींद्र वंजारे यांनी केले. कोडोली येथील यशवंत शिक्षणशास्त्र महाविद्यालयाच्या ३३ व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. रवींद्र वंजारे बोलत होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. विश्वनाथ पाटील होते.
वर्धापनदिनानिमित्त विद्यार्थी-शिक्षकांनी तयार केलेल्या भित्तिपत्रक प्रदर्शनाचे उद्घाटन प्रा. वंजारे यांच्याहस्ते झाले. महाविद्यालयाच्या सृजनशीलता व व्यक्तिमत्त्व विकास विभागाच्यावतीने कार्यक्रमाचे संयोजन केले.
अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. विश्वनाथ पाटील म्हणाले की, माजी आमदार कै. यशवंत एकनाथ पाटील यांनी १ सप्टेंबर १९९० साली महाविद्यालय सुरू केले. त्यावेळी बी. एड. महाविद्यालयांची संख्या कमी होती. परिणामी इच्छा असूनही अनेकांना बी.एड. करण्याची संधी मिळत नव्हती. या शिक्षणशास्त्र महाविद्यालयामुळे डोंगरी व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची अडचण दूर झाली. संस्थेचे व्यवस्थापक कै. प्रदीपबाबा पाटील आणि विद्यमान सेक्रेटरी डॉ. जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली महाविद्यालयाची उत्तरोत्तर प्रगती सुरू आहे.
विद्यार्थिनी-शिक्षिका पद्मश्री पाटील यांनी प्रास्ताविकात पाहुण्यांची ओळख करून दिली. व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते देवी सरस्वती, माजी आमदार कै. यशवंत एकनाथ पाटील आणि माजी व्यवस्थापक कै. प्रदीपबाबा पाटील यांच्या प्रतिमांची पूजा करण्यात आली. यावेळी स्वप्नाली कांडगावकर यांनी सूत्रसंचालन केले तर प्राजक्ता प्रकाश पाटील यांनी आभार मानले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सृजनशीलता व्यक्तिमत्त्व विकास विभागाच्या प्रमुख प्राध्यापिका गुलनास कमरुद्दीन मुजावर, प्रा. संजय जाधव, प्रा. अतुल केशव बुरटुकणे, कार्यालयीन अधीक्षक एस. के. पाटील, वरिष्ठ लिपिक अनिल इंदुलकर, ग्रंथपाल सूरज इंगवले आणि सेवक तानाजी मोहिते यांनी अथक परिश्रम घेतले.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng