कृषिवार्ताताज्या बातम्या

लसीकरण व गोठ्याची स्वच्छता याद्वारे लम्पी आजार रोखू शकतो – सहाय्यक आयुक्त डॉ. सत्यवान भिंगारे

पंढरपूर येथे स्वेरीत ‘लम्पी जनजागृती अभियान’ संपन्न…

पंढरपूर (बारामती झटका)

‘सध्या गाय, म्हैस अशा दुभत्या जनावरांमध्ये लम्पी हा गंभीर आजार होत आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग व पशुपालक चिंतेत दिसत आहेत. गुरांना ताप येणे, त्वचेवर आणि श्लेष्मल त्वचेवर वाढलेले वरवरचे फोड आणि एकापेक्षा जास्त गाठी ही या रोगाची लक्षणे आहेत. संक्रमित गुरांच्या पायांवर सूज येते आणि जनावर लंगडते. वास्तविक पाहता शंभर टक्के लसीकरण व गोठ्याची स्वच्छता सातत्याने केल्यास पशुमध्ये होणारा लम्पी हा आजार आपण रोखू शकतो.’, असे प्रतिपादन महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागाचे सहाय्यक आयुक्त डॉ. सत्यवान भिंगारे यांनी केले.

पशुसंवर्धन विभाग, महाराष्ट्र शासन व जेष्ठ पशुवैद्यक प्रतिष्ठान, पंढरपूरद्वारा आयोजित ‘लम्पी जनजागरण अभियान’ अंतर्गत स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मध्ये आयोजिलेल्या या उपक्रमात सहाय्यक आयुक्त डॉ. सत्यवान भिंगारे हे मार्गदर्शन करत होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्वेरीचे संस्थापक सचिव व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ. बी. पी. रोंगे हे होते. व्यासपीठावर प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. विश्वासराव मोरे, पशुधन विकास अधिकारी डॉ. विजय कोळेकर, पशुपालक हणमंत सुरवसे, भंडीशेगावचे विठ्ठल आलेराव आदी तसेच पशुधन पर्यवेक्षक अनिल शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी प्रास्ताविकामध्ये डॉ. विश्वासराव मोरे यांनी लम्पी आजाराबाबत पशुपालकांची भिती दूर करून त्या संदर्भात शास्त्रोक्त माहिती दिली. आजारावर नियंत्रण ठेवण्याच्या दृष्टीने विद्यार्थी व पशुपालकांमध्ये जनजागृती निर्माण करण्यासाठी आत्तापर्यंत रयत शिक्षण संस्था (रोपळे), मातोश्री सरुबाई माने प्रशाला (भटुंबरे), वामनराव माने प्रशाला (भैरवनाथ वाडी), लोकमान्य प्रशाला (पंढरपूर), यशवंत विद्यालय (भोसे), विठ्ठल प्रशाला (गुरसाळे) या व इतर ठिकाणी जवळपास सात हजार विद्यार्थी व पशुपालकांना आवश्यक माहिती देण्यात आल्याचे सांगितले. पुढे त्यांनी आणखी काही विद्यालये, कनिष्ठ महाविद्यालये यामधून लम्पी आजाराबाबत जनजागृती अभियान घेणार असल्याचे सांगितले. डॉ. भिंगारे यांनी लम्पी आजाराची कारणे, लक्षणे व आजार नियंत्रित ठेवण्यासाठी ८० टक्के सुश्रूता व २० टक्के उपचाराची गरज असल्याचे सांगितले.

अध्यक्षपदावरून बोलताना स्वेरीचे संस्थापक सचिव व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ. बी. पी. रोंगे म्हणाले की, ‘अशा आजारामध्ये महत्वाची जबाबदारी ही प्रामुख्याने पशुपालकांची असून त्यांनी वरिष्ठ पशुपालकांच्या मार्गदर्शक सूचनेनुसार दक्षता घेतल्यास व शुश्रूता केल्यास कोविड महामारीप्रमाणे पशूमध्ये आढळणारा हा लम्पी आजार नियंत्रणात येऊ शकतो. या आजारावरची लस लवकरच शासन संशोधित करेल.’ असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

या जनजागृती कार्यक्रमास ५०० हून अधिक भावी अभियंते व सध्या पशूपालक असलेले नागरिक मोठ्या संख्येने उपस्थितीत होते. यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. विजय कोळेकर यांनी केले तर तुंगत येथील पशुधन पर्यवेक्षक अनिल शिंदे यांनी आभार मानले.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

6 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button