शरदचंद्रजी पवारांची नियुक्ती घटनाबाह्य !

अजितदादा पवार गटाची आयोगाला माहिती
दिल्ली (बारामती झटका)
माजी केंद्रीय मंत्री शरदचंद्रजी पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्षपदी नियुक्ती करताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घटनेची पूर्णपणे पायमल्ली करण्यात आली, असा जोरदार युक्तिवाद अजितदादा पवार गटाने सोमवारी निवडणूक आयोगाकडे केला आयोगा पुढे केला.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून काका शरदचंद्रजी पवार आणि पुतणे अजितदादा पवार यांच्यात निर्माण झालेला वाद केंद्रीय निवडणूक आयोगाकडे पोहोचला आहे. आयोगाकडे सोमवारी या प्रकरणाची दुसरी सुनावणी झाली. अजितदादा पवार गटाचे वकील एन. के. कौल यांनी सोमवारी बाजू मांडली. यानंतर मनिंदर सिंग आणि सिद्धार्थ भटनागर हे सुद्धा अजितदादा पवार गटाकडून बाजू मांडणार आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगाने अजितदादा पवार गटाचे म्हणणे दुसऱ्या दिवशी ऐकून घेतले. यापूर्वी, शुक्रवारी पहिली सुनावणी झाली होती. शरदचंद्रजी पवार हे घर चालवतात, तसे पक्ष चालवत होते, असा आरोप अजितदादा पवार गटाने केला आहे. महत्त्वाचे म्हणजे शरदचंद्रजी पवार यांची अध्यक्षपदी निवड करताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या घटनेतील तरतुदींची पूर्णपणे पायमल्ली करण्यात आली, अशी माहिती आयोगापुढे दिली. अजितदादा पवार गटाचा युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर बाजू मांडण्याची संधी शरदचंद्रजी पवार गटाला दिली जाईल, यानंतर आयोग आपला निर्णय देईल, असे सूत्रांचे म्हणणे आहे.
दरम्यान, अजितदादा पवार गटाची बाजू आमचे वकील योग्य प्रकारे मांडणार असल्याचे मत या गटाचे महासचिव आणि राष्ट्रीय प्रवक्ते ब्रिजमोहन श्रीवास्तव यांनी दिले. आयोगावर आमचा पूर्ण विश्वास असून त्यांचा निकाल आम्हाला मान्य राहील, असेही ते म्हणाले.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng