रोडचा प्रश्न लागला मार्गी परंतु, विनापरवानगी अवैध उत्खनन व वाहतूक तक्रार जिल्हाधिकारी सोलापूर यांच्या दालनात.

नातेपुते (बारामती झटका)
आंदोलनातील काही तक्रारीचे समाधान झाल्याने व इतर तक्रारीवर कारवाई होत नसल्याने संबंधित वरिष्ठ कार्यालयाकडे तक्रार करणार असल्याने नातेपुते येथील आंदोलन स्थगित करत आहे, असे विनायक सावंत यांनी सांगितले. नातेपुते नगरपंचायत नातेपुते चे मुख्याधिकारी खांडेकर यांच्याकडून जे. एम. म्हात्रे कंपनीला त्यांच्या गौण खनिज वाहतूकीमुळे नादुरूस्त झालेला रस्ता डांबरीकरण करून मिळावा याबाबत पत्र देण्यात आले तसेच सा. बां. विभाग अकलूज यांच्याकडूनही त्यांच्या हद्दीतील पिरळे-नातेपुते रस्ताचे टेंडर काढण्याबाबत प्रक्रिया झाली आहे, असे सांगितले असून त्याबाबत आवश्यक कागदपत्रे दाखवली आहेत. त्यामुळे रस्त्याच्या मागणीचा विषय काही प्रमाणात मार्गी लागला आहे. तक्रारी अर्जातील सततच्या गौण खनिज अवजड वाहतूकीमुळे निर्माण होणाऱ्या धूळीबाबत सदर वाहतूक मार्गावर पाणी मारले जाईल, असे आश्वासन मिळाले आहे.
तसेच ओव्हरलोड वाहतूक होणार नाही, असेही तोंडी सांगण्यात आले आहे. त्याचबरोबर जर रस्ता खराब झाल्यास तात्पुरत्या स्वरूपात तो दुरूस्त करून देण्याबाबतही तोंडीच सांगितले आहे. आंदोलनातील काही विषय मार्गी लागण्याची प्रक्रिया सुरू झाली असल्याने आंदोलन स्थगित केले आहे, असे आंदोलन कर्ते विनायक सावंत यांनी स्पष्ट केले आहे.
तहसिल कार्यालय माळशिरसचे तहसिलदार शेजूळ यांच्याकडून नातेपुते परिसरातील विनापरवानगी अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतूकीवर तक्रारी अनुषंगाने चौकशी करून योग्य ती कार्यवाही करणेत येईल, असे सांगण्यात आले आहे. परंतु ७ दिवस झाले तरीही गौण खनिज उत्खनन व वाहतूक सुरू आहे. याबाबत तक्रारी अर्जात सदर उत्खनन व वाहतूक परवानी आहे का ?, याबाबत पुरावे द्यावे आणि परवानगी नसेल तर उत्खनन व वाहतूक करणारे यांच्यावर शासकीय नियमानुसार त्वरित कारवाई करावी अशी विनंती केली होती.
परंतु तहसिलदार माळशिरस, मंडळ अधिकारी नातेपुते व तलाठी नातेपुते यांच्याकडून कोणतीच माहिती देण्यात आली नसून जिल्हाधिकारी कार्यालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार सदर उत्खनन व वाहतूक परवानगी आदेश नाहीत. तसेच सदर उत्खनन कोणतीच रॉयल्टी भरली नाही, हेच स्पष्टपणे दिसत आहे. याबाबत सर्व पुरावे व माहिती तहसिलदार माळशिरस यांना अगोदरच दिली होती. तरीही कार्यवाही करण्यास वेळ लावला जात आहेत. यात जिल्हाधिकारी कुमार आर्शिवाद यांनी लक्ष घालावे.
नातेपुते नगरपंचायत नातेपुते यांच्या पत्रावरून तरी सध्या स्पष्टपणे असे दिसत आहे की, सदर गौण खनिज उत्खनन व वाहतूक पालखी महामार्ग काम करणारी जे. एम. म्हात्रे कंपनीच करत आहे. जर असे असेल तर मग महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग शासन परिपत्रक मधील दिशानिर्देश नुसार कार्यपद्धतीची अंमलबजावणी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्या कंत्राटदारांनी व संबंधित महसूल अधिकारी यांनी करणे आवश्यक असताना तसे होताना दिसत नाही. यावरूनच शासनाची रॉयल्टी बुडवण्याचा प्रकार स्पष्ट दिसत आहे. याला कारणही तसेच आहे. तहसिलदार यांना दिलेल्या माहितीतील ठिकाणी उत्खनन व वाहतूक परवानगी आदेश दाखवावे, असे तक्रारी अर्जात लेखी विचारले आहे. तसेच समक्ष भेटूनही याबाबत पुरावे दाखवा अशी विनंती केली आहे, तसेच फोन करूनही याबाबत तात्काळ कळवावे असेही नम्र विनंती केली आहे. परंतु, तहसिलदार शेजूळ याबाबत काहीही बोलायला तयार नाहीत. उलट उडवाउडवीची उत्तरे देत आहेत. म्हणून जिल्हाधिकारी कुमार आर्शिवाद यांनी तात्काळ दखल घ्यावी अशी लेखी विनंती विनायक सावंत यांनी केली आहे.
तसेच तलाठी नातेपुते, मंडळ अधिकारी नातेपुते व तहसिलदार माळशिरस यांच्यावर शासन परिपत्रक अंमलबजावणी न करणाऱ्या जे. एम. म्हात्रे कंपनीला जाणूनबुजून वाचवण्याचा प्रयत्न करून लोकशाही मार्गाने आंदोलन करणारे यांना जाणूनबुजून आंदोलन करण्यास भाग पाडून आंदोलन स्थळी भेट न देणारे मंडळ अधिकारी, तलाठी यांच्यावरही शिस्तभंगाची कारवाई करावी. अन्यथा, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येणार आहे असे लेखी पत्र विनायक सावंत यांनी जिल्हाधिकारी सोलापूर यांना दिले आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.