सीना-माढा उपसासिंचन योजनेतून चार दिवसांत मोडनिंबला पाणी – आ. बबनदादा शिंदे
मोडनिंब येथे विजयादशमीच्या मुहूर्तावर माढेश्वरी बँकेच्या नवव्या शाखेचा शुभारंभ
माढा (बारामती झटका)
या वर्षी माढा तालुक्यात सरासरी पेक्षा खूपच कमी पाऊस पडला आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी पिण्याच्या व शेतीच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. या भागातील नेतेमंडळी, शेतकरी व नागरिकांनी मोडनिंब वितरिकेतून पाणी सोडण्याची मागणी केली आहे. त्यामुळे येत्या तीन ते चार दिवसांत उजनी धरणातून सीना-माढा उपसासिंचन योजनेतून मोडनिंबला पाणी सोडणार असल्याचे प्रतिपादन आमदार बबनदादा शिंदे यांनी केले आहे. ते मोडनिंब, ता. माढा येथे माढेश्वरी अर्बन बँकेच्या नवव्या शाखेचा विजयादशमीच्या मुहूर्तावर दि. २४ ऑक्टोबर रोजी शुभारंभ करताना बोलत होते.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष कैलास तोडकरी होते. पाहुण्यांचे स्वागत व परिचय बँकेच्या संचालिका डॉ.निशिगंधा माळी यांनी केला.
प्रास्ताविकात व्हा. चेअरमन अशोक लुणावत यांनी सांगितले की, बँकचे सभासद, ठेवीदार व कर्जदारांच्या विश्वासास पात्र राहून पारदर्शक आणि काटकसरीने कारभार केला असून ८ शाखांमधून उत्कृष्ट पद्धतीने ग्राहकांना सेवा सुरू आहे. आज नवव्या शाखेची भर पडली आहे. या विविध शाखांमधून २२० कोटी ठेवींचे उद्दीष्ट पूर्ण केले असून मागील वर्षी बँकेला २ कोटी ४२ लाख रुपये नफा झाला आहे. बँकेला सातत्याने ऑडिट वर्ग ‘अ’ मिळाला आहे. सलग दोन वर्षांपासून ‘शून्य’ टक्के एनपीए राखण्यात बँकेला यश मिळाल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आदर्श शिक्षक राजेंद्र गुंड यांनी केले तर, आभार संचालक गणेश काशीद यांनी मानले.
यावेळी जिल्हा दूध संघाचे चेअरमन रणजितसिंह शिंदे, संचालक शंभूराजे मोरे, खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष बंडूनाना ढवळे, सरपंच लक्ष्मीबाई पाटील, मुन्नाराजे मोरे, बाबूराव सुर्वे, ॲड. बी. एस. पाटील, अजितसिंह देशमुख, मोहन मोरे, हनुमंत कुंभार, चांगदेव वरवडे, विशाल मेहता, चंद्रकांत गिड्डे, दत्तात्रय सुर्वे, राजाभाऊ मोरे, अनिल पाटील, विजय शिंदे, दादा सुरवसे, संतोष पाटील, संचालक राजेंद्र पाटील, दिगंबर माळी, अमित पाटील, नानासाहेब शेंडे, अरविंद नाईकवाडे, मुख्य कार्यकारी अधिकारी दत्तात्रय मुळे, सहव्यवस्थापक नंदकुमार दुड्डम, राजकुमार भोळे, निलेश कुलकर्णी, लक्ष्मण शिंदे, शाखाधिकारी विक्रम पाटील यांच्यासह ग्रामस्थ, बँकेचे अधिकारी, कर्मचारी व सभासद उपस्थित होते.
मराठा समाजाच्या आंदोलनाला व आरक्षणाला माझा सदैव पाठिंबा – ज्या ज्या वेळी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आंदोलन व मोर्चे निघाले त्या त्या वेळी मी पाठिंबा दिला असून योग्य ती मदतही केली आहे. आंतरवाली-सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या वेळी पोलिसांनी लाठीचार्ज केला, त्यावेळी त्या घटनेचा जाहीर निषेध करणारा राज्यातील मी पहिला आमदार आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी आमचा शासनाकडे पाठपुरावा सुरू आहे. आरक्षणाची लढाई ही कायदेशीर आहे. शासन व शासनाने नेमलेली तज्ज्ञांची समिती याविषयीची माहिती व पुरावे घेऊन योग्य तो निर्णय नक्कीच घेतील, असे आमदार बबनराव शिंदे यांनी सांगितले आहे.
बँकेच्या शुभारंभाचा कार्यक्रम सुरू असताना सकल मराठा समाजाच्या वतीने घोषणाबाजी करण्यात आली. मराठा समाजाला शैक्षणिक व नोकरीमध्ये आरक्षण मिळालेच पाहिजे, एक मराठा लाख मराठा अशा घोषणा दिल्या. काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते परंतु, पोलिसांनी समयसूचकता दाखवून संबंधितांना ताब्यात घेतले. त्यानंतर पुढील कार्यक्रम सुरळीत पार पडला. कार्यक्रम संपताच सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी सोडून दिले.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.