पिलीव येथील धनगर समाजाचे जेष्ठ नेते व यशोदीप बहुउद्देशीय संस्थेचे संस्थापक सचिव आबासाहेब शेंडगे यांचे दुःखद निधन

पिलीव (बारामती झटका) रघुनाथ देवकर यांजकडून
माळशिरस तालुक्यातील दक्षिण भागातील धनगर समाजाचे ज्येष्ठ नेते व श्री महालक्ष्मी दूध संस्थेचे माजी चेअरमन तसेच यशोदीप शिक्षण संस्था व बहुउद्देशीय संस्थेचे संस्थापक सचिव आणि महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री कै. आ. डॉ. भाई गणपतरावजी देशमुख यांचे खंदे समर्थक व पंचायत समिती माळशिरसचे दिवंगत सदस्य हरिभाऊ कपने यांचे मेहुणे तुकाराम उर्फ आबासाहेब शेंडगे यांचे वयाच्या ७४ व्या वर्षी दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाची बातमी समजताच पिलीव व परिसरातील ग्रामस्थ, नातेवाईक, आप्तस्वकीय, स्नेही मंडळी, पाहुणेमंडळी, मित्र मंडळी व राजकीय, सामाजिक, व्यापारी, विविध संघटना, संस्था यांचे प्रतिनिधींनी शेंडगे यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांचे अंत्यदर्शन घेतले व परिवाराचे सांत्वन केले. त्यांच्या अंत्ययात्रेसाठी सर्व घटकातील लोक बहुसंख्येने उपस्थित होते. त्यांच्या जाण्याने सामाजिक, राजकीय व शेंडगे परिवारांत मोठी पोकळी निर्माण झाल्याचे बोलले जात आहे. कै. आबासाहेब शेंडगे यांनी या भागामध्ये सामाजिक कार्यामध्ये वाहुन घेतले होते व गोरगरिबांच्या व आर्थिक परिस्थितीने पिचलेल्या अनेकांना त्यांच्या शैक्षणिक, प्रापंचिक, आर्थिक अडचणी सोडवून दिलासा दिला होता. अनेकांचे ते पोषण कर्ते बनले होते.
कै. हरिभाऊ कपने यांचे स्वप्न साकार करण्यासाठी त्यांनी माजी मंत्री कै. गणपतराव देशमुख साहेब व अशा अनेक मान्यवरांच्या सहकार्याने तरंगफळ व सुळेवाडीच्या माळरानावर अनेक प्रकारच्या संकटांना तोंड दिले. प्रा. संतोषकुमार शेंडगे यांना अनेक प्रकारच्या शासकीय नोकऱ्या येत असताना देखील नोकरी न करण्याचा सल्ला देऊन श्रीनाथ विद्यालय व जुनिअर कॉलेज, तरंगफळ आणि श्री. विठ्ठल दयाजी विद्यालय, सुळेवाडी अशा दोन्ही ठिकाणी चांगल्या प्रकारचे शिक्षण मिळाले पाहिजे. यासाठी शिक्षण संस्थेच्या दोन शाखा काढण्यास भाग पाडून सातारा, सोलापूर जिल्ह्याच्या सरहद्दीवर सुळेवाडी या ठिकाणी व तरंगफळ या ठिकाणी गोरगरिबांच्या विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारचे शिक्षण देण्याचा प्रयत्न केला. या दोन्हीही विद्यालयांमधून बोर्डाचे निकाल स्थापनेपासून 100% लावण्यामध्ये कै. आबासाहेब शेंडगे यांनी पुढाकार घेऊन शिक्षण क्षेत्रासारख्या पवित्र क्षेत्रांमध्ये नावलौकिक केला. असे आबासाहेब शेंडगे यांच्या कार्याबद्दल अनेकजण बोलून दाखवत आहेत.
त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी, सुना, नातवंडे, जावई असा मोठा परिवार आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९७६६७०३५१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.