ताज्या बातम्या

महावितरणने उद्योगांच्या वीजपुरवठ्याचे प्रश्न प्राधान्याने सोडवावेत – धनंजय जामदार

बारामती (बारामती झटका)

अखंड विद्युत पुरवठा असेल तरच उद्योगांची उत्पादन प्रक्रिया सुरळीतपणे पार पडत असल्याने महावितरणने विद्युत पुरवठ्याच्या लहान-मोठ्या तक्रारींचे निवारण तातडीने करणे आवश्यक आहे. तसेच महावितरणला सर्वाधिक व नियमित महसूल औद्योगिक क्षेत्राकडूनच मिळत असतो. त्यामुळे उद्योगांच्या विविध पुरवठ्याबाबतचे प्रश्न सोडवण्यासाठी महावितरणने प्राधान्य द्यावे, असे मत बारामती इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट असोसिएशनचे अध्यक्ष धनंजय जामदार यांनी व्यक्त केले. बारामती एमआयडीसीसाठी २४ तास उपलब्ध राहणारी देखभाल दुरुस्ती वाहन सेवेचा शुभारंभ धनंजय जामदार यांच्याहस्ते करण्यात आला, त्याप्रसंगी ते बोलत होते.

महावितरणने अतिरिक्त कार्यकारी अभियंता मधुकर साळवे, सहाय्यक अभियंता राजेंद्र भगत, प्रधान यंत्रचालक कल्याण धुमाळ तसेच बारामती इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट असोसिएशनचे उपाध्यक्ष मनोहर गावडे, खजिनदार अंबीरशाह शेख, सदस्य महादेव गायकवाड, हरिश्चंद्र खाडे, राजन नायर, उद्योजक संदीप जगताप, आर्यराज नायर, जगदीश शिंदे यांच्यासह महावितरणचे तांत्रिक कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

धनंजय जामदार पुढे म्हणाले की, गेली अनेक वर्ष २४ तास कार्यरत असणारे देखभाल दुरुस्ती वाहन महावितरणने काही महिन्यांपूर्वी अचानक बंद केल्याने उद्योजकांची प्रचंड गैरसोय होत होती. किरकोळ तक्रारींचे निवारण देखील वेळेत होत नव्हते. यामुळे उद्योगांच्या उत्पादन प्रक्रियेत खंड पडून नुकसान होत होते. बारामती इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट असोसिएशनने पुढाकार घेऊन महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे याबाबत सातत्याने पाठपुरावा करून सदर सेवा सुरू करण्यासाठी प्रयत्न केले होते.

असोसिएशनच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत महावितरणने विद्युत पुरवठा देखभाल दुरुस्तीसाठी नवीन वाहन उपलब्ध केल्याबद्दल धनंजय जामदार यांनी समाधान व्यक्त केले.बारामती एमआयडीसी व परिसरातील उद्योजकांनी या सेवेचा लाभ घ्यावा असे आव्हान त्यांनी केले आहे.

अतिरिक्त कार्यकारी अभियंता मधुकर साळवे म्हणाले की, वीज पुरवठ्यासंबंधी उद्योगांच्या समस्या तत्परतेने सोडवण्यासाठी महावितरण नेहमीच प्रयत्नशील असते. असोसिएशनच्या मागणीनुसार आता देखभाल दुरुस्तीसाठी नवीन वाहन महावितरण उपलब्ध केले असून ही सेवा २४ तास उपलब्ध राहणार आहे. उद्योजकांनी ७८७५८००५७१ या क्रमांकावर संपर्क साधून सेवेचा लाभ घ्यावा, असे आव्हान त्यांनी केले. तसेच एमआयडीसी उपकेंद्राचे प्रधान यंत्रचालक कल्याण धुमाळ यांनी आभार मानले.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

5 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button