वेळापूर परिसरात रात्री ड्रोनचा सुळसुळाट, पोलीस यंत्रणा सतर्क
नागरिकांनी घाबरून न जाता, ग्रामसुरक्षा यंत्रणा व स्थानिक तरुणांनी पोलिसांना सहकार्य करावे – भाऊसाहेब गोसावी, सहायक पोलीस निरीक्षक
वेळापूर (बारामती झटका)
मागील ५ दिवसांत वेळापूर ता. माळशिरस या परिसरात ड्रोनने घिरट्या मारल्या जात असल्याने माळशिरस तालुक्यातील वेळापूरसह, निमगाव, मळोली, शेंडेचिंच, तोंडले-बोंडले, धानोरे परिसरातील नागरिकांत घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच ड्रोन संदर्भातील आजुबाजूच्या ऐकीव घटनांवरून जनतेत चर्चला उधाण आले आहे.
आतापर्यंत माळशिरस तालुक्यातील पश्चिम भागात फिरत असलेल्या ड्रोनने गेल्या दोन दिवसांपासून पूर्व भागातील वेळापूरसह तोंडले-बोंडले, खळवे, माळखांबी व धानोरे परिसरात घिरट्या घेतल्याचे दिसून आले. सुमारे नऊच्या दरम्यान सुरू झालेला ड्रोनचा हा प्रवास रात्री बारापर्यंत चालला. यावेळी परिसरातील नागरिकांतून एकमेकांना फोनद्वारे सतर्क करण्यात आले. याचबरोबर पाच ते सात किलोमीटर परिघात ड्रोनच्या ऑपरेटरला शोधण्याची मोहीम राबविण्यात आली. परंतु अखेरपर्यंत काहीच हाती न लागल्याने शोध थांबवण्यात आला.
ड्रोनसारख्या उपकरणांद्वारे अवकाशातून घराच्या परिसरातील लोकवस्तीचा शोध घेऊन तेथील घरात चोरांकडून दरोडा टाकला जातो आहे. अशा आजपर्यंत ऐकलेल्या बातम्यांमुळे येथील परिसरातील नागरिकांत घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच रात्रीच्या वेळेस अवकाशात ड्रोन व तत्सम उपकरण फिरत असल्याबाबत प्रशासनाकडून आतापर्यंत कोणताही ठोस खुलासा करण्यात आला नाही. यामुळे जनतेत तर्कवितर्कांना उधाण आले आहे.
रात्रीची गस्त वाढवली
ड्रोनबाबत माहिती घेत आहोत. तसेच रात्रीची गस्त वाढवली आहे. नागरिकांनी घाबरून न जाता काही घटना किंवा अनोळखी लोक दिसल्यास पोलिसांशी संपर्क साधावा. तसेच, ग्रामसुरक्षा यंत्रणा व स्थानिक तरुणांनी मिळून पोलिसांनाही सहकार्य करावे. अफवांवर विश्वास ठेवू नये.
भाऊसाहेब गोसावी, सहायक पोलीस निरीक्षक
चोऱ्यांचा प्रयत्न फसला
शेरी नं. २ येथील मोहसिन अमीर कोतवाल यांच्या घरी पहाटे अडीच वाजता सोन्या-चांदीचे एकूण ४७ हजारांचे दागिने चोरुन नेले तर पिसेवाडीनजिक प्रवीण बनकर याच्या घरी दरवाजा उचकटताना आवाज झाल्याने येथील चोरीचा प्रयत्न फसला. निमगाव रोड येथील महादेव बनकर यांच्या घरीही चोरी करण्यात आली. मात्र, डब्यात काही नसल्याने चोरटे रिकाम्या हातानी परतले. तसेच साधू पिसे यांच्या घराजवळ अनोळखी ४ इसम पहाटेच्या सुमारास दिसून आले आहेत. विशेष म्हणजे याच भागात ड्रोनने घिरट्या घातल्या होत्या.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.