वृद्धाश्रमात वृद्धाचे निधन, पित्याच्या अंतदर्शनासाठी ही मुलगा आला नाही
सोलापूर (बारामती झटका)
सोलापूरजवळील मोरवंची (ता. मोहोळ) येथील प्रार्थना फाऊंडेशनच्या वृध्दाश्रमात एका ७६ वर्षांच्या वृध्दाचे निधन झाले. त्याची माहिती त्याच्या कुटुंबियांस कळविण्यात आली. परंतु, पित्याचा मृतदेह घरी नेण्यास मुलाने नकार दिला. एवढेच नव्हे तर पित्याच्या अंत्यदर्शनासाठी येण्यासही मुलाने नकार दिला. त्यामुळे संस्थेनेच दुर्दैवी वृध्दाच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले. मुलाने पित्याचे शेवटचे तोंडही पाहिले नाही. उलट, त्यांना कोणीही नाही, बेवारस आहेत म्हणून नोंद लावून अंत्यविधी उरका, असा निरोपच मुलाने पाठवला. या घटनेतून आलेला अनुभव मनाला चटका लावून गेला.
मृत वृध्द आजोबा मोरवंचीत प्रार्थना फाऊंडेशनमार्फत मोफत चालविल्या जाणाऱ्या वृध्दाश्रमात गेल्या वर्षापूर्वी दाखल झाले होते. त्यांना दोन मुले आणि वृध्द पत्नी असा परिवार आहे. परंतु कौटुंबीक कलहामुळे घरी त्यांचा सांभाळ केला जात नव्हता. त्यांचा थोरला मुलगा व्यावसायिक चित्रकार तर धाकटा मुलगा छोटा व्यापारी आहे. वृध्दाश्रमात येण्यापूर्वी वृध्द आजोबांना हृदयविकाराचा झटकाही येऊन गेला होता. मुलांनी घराबाहेर काढल्यामुळे खंगलेल्या त्यांना गावातील मंडळींनीच वृध्दाश्रमात दाखल केले होते. तीन महिन्यांपूर्वी त्यांना पुन्हा हृदयविकाराचा तीव्र झटका आला. उपचारासाठी त्यांना रूग्णालयात हलविण्यात आल्यानंतर त्याची माहिती त्यांच्या घरी कळविण्यात आली होती. परंतु रूग्णालयात भेटण्यासाठी एकही मुलगा आला नव्हता.
शेवटी काल सकाळी वृध्दाश्रमात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. स्वभावाने अतिशय शांत, प्रेमळ मनाचे वृध्द आजोबा अचानकपणे गेल्याने समस्त वृध्दाश्रमाला दुःख झाले. या दुर्दैवी घटनेची माहिती प्रार्थना फाऊंडेशनचे प्रमुख प्रसाद मोहिते यांनी मृत वृध्दाच्या मुलांना कळविली आणि पित्याचा मृतदेह घरी नेण्यासाठी निरोप दिला. मुलाने नकार दिला. तेव्हा प्रसाद मोहिते यांनी मृतदेह घेऊन जाऊ नका, पण निदान पित्याचे शेवटचे तोंड पाहण्यासाठी तरी येऊन जा, असे कळविले. गावातील मंडळी वृध्दाश्रमात धावून आली. मुलाला जन्मदात्या पित्याला पाणी तरी पाजवून जा, असे कळविले असता थोरला मुलगा एकटाच कसाबसा आला. आम्ही पित्याचा मृतदेह घेऊन जाऊ शकत नाही, जे काही असेल ते संस्थेने करावे. त्यास आमची काही हरकत नाही, असे मुलाने लेखी पत्र दिले. परंतु शेवटी पित्याचे साधे अंत्यदर्शनही न घेताच मुलगा परत निघून गेला. वडील बरीच वर्षे आमच्याकडे नव्हते. त्यामुळे त्यांचा आणि आमचा काही संबंध नाही. त्यांना वडील म्हणायलाही आम्हाला लाज वाटते, असे मुलगा सांगत होता.
या दुर्दैवी घटनेबाबत प्रसाद मोहिते म्हणाले, ज्या आई-वडिलांनी जन्म दिला, हालअपेष्टा सहन करून लहानाचे मोठे केले, शिक्षण देऊन घडविले, लग्न लावून दिले आणि संसार उभा करून दिला, त्या मुलांनी म्हातारपणी आई-वडिलांना काठीचा आधार देणे हे कर्तव्य ठरते. परंतु आई-वडिलांची लाखोंची मालमत्ता हिसकावून घेऊन त्यांना वाऱ्यावर सोडणे, कौटुंबिक संबंध कितीही बिघडले असले तरी शेवटी बाप गेल्यानंतर राग, मत्सर, द्वेष बाजूला ठेवून मुलांनी निदान शेवटचे कर्तव्यही विसरणे, हे निकोप आणि सुसंस्कृत समाजाचे लक्षण नाही.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.