भारतात कारचं स्टीअरिंग उजवीकडे आणि परदेशात डावीकडे का असतं ?

मुंबई (बारामती झटका)
भारतात सर्व वाहनांची स्टीअरिंग व्हील उजव्या बाजूला असतात. दोन्ही देशांमध्ये विकल्या जाणाऱ्या एकाच मॉडेलच्या कारमध्ये स्टीअरिंग व्हील वेगवेगळ्या ठिकाणी असतात. देश बदलला कि, स्टीअरिंग व्हीलची पोझिशन का बदलते, याचा कधी विचार केलाय का ?
भारतीय ड्रायव्हरला अमेरिका किंवा युरोपमध्ये गेल्यावर तिथे गाडी चालवायची झाल्यास अनेक अडचणींचा सामना करावा लागू शकतो. कारण, अमेरिकेसह अनेक युरोपीय देशांमध्ये कार, बस, ट्रकसह अनेक वाहनांची स्टीअरिंग व्हील डाव्या बाजूला असतात.
भारत, जपान, ब्रिटन आणि ओस्ट्रेलियासारख्या काही मोजक्या देशांतल्या वाहनांमध्ये स्टीअरिंग व्हील उजव्या बाजूला असतात. जगातल्या अनेक देशांमधल्या गाड्यांचं स्टीअरिंग व्हील डाव्या बाजूला आहे. यामागे काही कारणं आहेत.
भारतातल्या वाहनांमध्ये स्टीअरिंग व्हील उजव्या बाजूला का असतं ?
भारतात विकल्या जाणाऱ्या वाहनांमध्ये स्टीअरिंग व्हील उजव्या बाजूला असतात, याचा ब्रिटीश काळाशी संबंध आहे. मोटार गाड्या ब्रिटीश राजवटीतच भारतात आल्या. त्यावेळी, ब्रिटीश बनावटीच्या गाड्या भारतात आयात केल्या जात होत्या. या गाड्यांचं स्टीअरिंग व्हील उजव्या बाजूला होतं. भारतात ब्रिटीश राजवट २०० वर्षांहून अधिक काळ असल्याने भारतातल्या वाहनांच्या इंजिनअरिंगवरदेखील ब्रिटीश इंजिनिअरिंगचा प्रभाव होता. तोपर्यंत लोकांना उजव्या बाजूच्या स्टीअरिंगने वाहनं चालवण्याची सवय झाली होती. त्यामुळे देश स्वतंत्र झाल्यानंतरही कार उत्पादक कंपन्यांनी स्टीअरिंग व्हील उजव्याच बाजूला ठेवलं.
अमेरिकेतल्या वाहनांमध्ये स्टीअरिंग व्हील डाव्या बाजूला का असतं ?
अमेरिकेतल्या गाड्यांमधलं स्टीअरिंग व्हील डावीकडे असण्याचा संबंध १८ व्या शतकात अमेरिकेत धावणाऱ्या टीमस्टर्सशी आहे. टीमस्टर्स त्यांच्यासोबत घोडागाडी घेवून जात असत. या गाड्यांमध्ये उजव्या बाजूला सामान ठेवण्यासाठी जागा होती, तर डाव्या बाजूला घोडेस्वार बसायचे.
जेव्हा अमेरिकेत कारचा शोध लागला तेव्हा इंजिनीअर्सनी तोच ट्रेंड पुढे नेला. कार आणि ट्रकसारख्या वाहनांमध्ये स्टीअरिंग व्हील डाव्या बाजूला बसवलं गेलं. सुरुवातीला, अमेरिकेतून युरोप आणि इतर देशांमध्ये गाड्या निर्यात केल्या जात होत्या. त्यामुळे युरोपमध्येही डाव्या बाजूला स्टीअरिंग असलेली वाहनं आहेत.

स्टीअरिंग व्हील डाव्या बाजूला असण्यामागे आणखी एक कारण आहे. अमेरिकेसह युरोपातल्या अनेक देशांमध्ये वाहनं रस्त्याच्या उजव्या बाजूने चालतात. अशा परिस्थितीत ड्रायव्हर गाडीच्या डाव्या बाजूला बसला तर समोरून येणाऱ्या वाहनाचा वेग आणि अंतराचा अंदाज लावणं सोपं होतं.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



