ताज्या बातम्याराजकारण

मांडवे गावच्या सरपंच सौ. शितल अर्जुन दुधाळ यांचा सरपंच पदाचा राजीनामा.

मांडवे (बारामती झटका)

माळशिरस तालुक्यातील क्षेत्रफळाने सर्वात मोठी व राजकीय दृष्ट्या महत्त्वाची असणारी तालुक्याच्या पश्चिम भागातील मांडवे ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ‌ शितल अर्जुन दुधाळ यांनी सरपंच पदाचा राजीनामा माळशिरस पंचायत समिती येथे दिलेला होता. सदर राजीनामाच्या अनुषंगाने पडताळणी मीटिंग ग्रामपंचायत कार्यालय येथे ग्रामविकास अधिकारी रवींद्र पवार यांच्या उपस्थितीत संपन्न झाली. यावेळी शितल अर्जुन दुधाळ, स्वाती तानाजी दुधाळ, सुरज दिनकर साळुंखे, हनुमंत भीमराव टेळे, रितेश बबनराव पालवे, अश्विनी गजानन पालवे, हसीना रफिक मुलाणी, स्वाती राजेंद्र शिंदे, पंचशीला रामचंद्र गायकवाड, विठ्ठल ज्ञानदेव पालवे आदी ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.

पडताळणी बैठकीमध्ये राजीनामा मंजूर केलेला आहे.
मांडवे ग्रामपंचायतीत 17 सदस्य आहेत. सदरच्या ग्रामपंचायतीमध्ये तीन पंचायत समिती सदस्य जयवंततात्या पालवे, बबनबापू पालवे व तानाजीआबा पालवे गटाचे सदस्य आहेत. जयवंत बापू व जयवंत तात्या यांच्या गटाचे नऊ सदस्य तर तानाजी आबा यांच्या गटाचे आठ सदस्य आहेत, जयवंततात्या व बबनबापू गटाचे हनुमंतराव टेळे यांना सरपंच केलेले होते.

दरम्यानच्या काळामध्ये तानाजी आबा यांच्या गटातील ज्येष्ठ नेते अर्जुन दुधाळ व इतर सदस्य यांनी बबनबापू व जयवंततात्या यांच्या गटासमवेत पुढील राजकीय गणिते तयार करून हनुमंत टेळे यांनी राजीनामा दिल्यानंतर बिनविरोध सरपंच पदी सौ. शितल अर्जुन दुधाळ यांची निवड करण्यात आलेली होती.

ज्येष्ठ नेते अर्जुन दुधाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सौ. शितल अर्जुन दुधाळ यांनी सर्व ग्रामपंचायत सदस्यांना विश्वासात घेऊन ग्रामपंचायतीचा कारभार योग्य प्रकारे सांभाळलेला होता. श्री. संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पायी वारी पालखी सोहळ्यामध्ये मांडवे ग्रामपंचायत हद्दीत स्वागत व विसावावेळी सरपंच यांना स्वागत करण्याचा मान मिळालेला होता. तालुक्यात कितीतरी सरपंच आहेत. ठरल्याप्रमाणे राजीनामा देत नाहीत मात्र, मांडवे ग्रामपंचायतीच्या कर्तव्यदक्ष सरपंच सौ. शीतल अर्जुन दुधाळ यांनी राजीनामा देऊन खऱ्या अर्थाने दिलेला शब्द पाळलेला आहे. त्यामुळे ज्येष्ठ नेते अर्जुन दुधाळ यांच्या विषयी “बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले” अशी मांडवे पंचक्रोशी व माळशिरस तालुक्यात राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.

पडताळणी मीटिंग नंतर सात दिवसाचा कालावधी संपल्यानंतर खऱ्या अर्थाने राजीनामा मंजूर होऊन लवकरच मांडवे ग्रामपंचायतीला नवीन सरपंचाची निवड होईल. राजीनामा मंजूर झाल्यानंतर नवीन सरपंच पदाची निवड होईपर्यंत प्रभारी सरपंच पदाचा पदभार उपसरपंच यांच्याकडे राहत असतो. नूतन सरपंच कोण होणार, याकडे माळशिरस तालुक्याचे लक्ष लागून राहिलेले आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

One Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button