सालगड्यांनी घातली मालकास 3 लाखांची टोपी

सोलापूर (बारामती झटका)
एक वर्षाकरिता शेतात सालगडी म्हणून राहण्यास आलेल्या पती-पत्नीने शेत मालकास ३ लाखाची टोपी घालून केवळ चार दिवसातच शेतातून पोबारा केला.
फिर्यादी संतोष बाबुराव गायकवाड (रा. सेटलमेंट फ्री कॉलनी) यांनी आपल्या शेतात सालगडी म्हणून मोलाप्पा मेहेत्रे व पद्मिनी मेहेत्रे (दोघे रा. कोनापुरे चाळ, स्टेशन रोड सोलापूर) यांना ठेवले होते. त्यांनी २२ मार्च २०२४ रोजी घरातील सोने भाच्यामार्फत २ लाखाला गहाण ठेवून तसेच स्वतःजवळ १ लाख असे ३ लाख रुपये ओळखीच्या हनुमंत चवरे व नागेश जाधव यांच्यासमोर रोख स्वरूपात त्या दोघांना दिले. त्याप्रमाणे १७ मार्च ते २१ मार्च पर्यंत दोघे आरोपी शेतात सालगडी म्हणून राहिले.
दरम्यान, यावेळी त्यांना आई, भाऊ तसेच सासू-सासरे येऊन भेटून गेले. त्यानंतर २२ मार्च रोजी दोघेही कोणाला काही न सांगता अज्ञात ठिकाणी निघून गेले. त्यांचा मोबाईलही बंद आहे. आरोपींच्या सासू-सासऱ्याकडे विचारण्या केली असता ते उडवा उडवीची उत्तरे देत आहेत. त्यामुळे दोघा पती-पत्नीच्या विरोधात सलगर वस्ती पोलीस ठाण्यात आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. या घटनेचा अधिक तपास फौजदार चंगरपल्लू हे करत आहेत.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.