सख्खा भाऊ पक्का वैरी.. त्रास देणाऱ्या भावाचा खून!

स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी आठ तासांत केला गुन्हा उघड
भावासह मित्राला अटक, खून केल्याची कबुली
कोल्हापूर (बारामती झटका)
‘सख्खा भाऊ पक्का वैरी’, अशी मराठी भाषेत म्हण आहे. याची प्रचिती हुपरी, ता. हातकणंगले येथे आली. आई-वडिलांना मारहाण करणे, छळ करणे, लहान भावाच्या चांदी उद्योगात अडचण निर्माण करणे आणि भावाला सतत शिवीगाळ मारहाण करणे, असे कृत्य करणाऱ्या मोठ्या भावाचा लहान भाऊ व त्याच्या मित्राने काटा काढला. हा खून घरात चोरी करण्यासाठी आलेल्या लुटारूंनी केला असावा असा बनाव केला होता. मात्र, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि गोकुळ शिरंगाव पोलिसांनी अवघ्या आठ तासांत खुनाचा छडा लावून दोघांना अटक केली.
हुपरी येथील प्रसिद्ध चांदी उद्योजक ब्रह्मनाथ सुकुमार हालोंडे (वय ३१, रा. सिल्व्हर झोन परिसर, हुपरी) यांचा रविवारी सायंकाळी स्वतःच्या घरात धारदार हत्याराने भोसकून खून झाला. ब्रह्मनाथ यांचे आई, वडील बाहेरगावी गेले होते. त्यामुळे घरात कोणीच नसल्याने खुनाचा प्रकार सायंकाळी उघड झाला. ते घरी आल्यानंतर त्यांनी मुलास रक्ताच्या थारोळ्यात पाहिल्यानंतर हंबरडा फोडला. शेजारी जमले. त्यांनी गोकुळ शिरगांव पोलीस ठाण्यात फोन करून माहिती दिली.
करवीरचे उपअधीक्षक सुजीतकुमार क्षीरसागर, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पो. नि. रविंद्र कळमकर, सपोनि पंकज गिरी, उपनिरिक्षक जालिंदर जाधव, अंमलदार संजय हुंबे, गोकुळ शिरगांवचे पो. नि. दिगंबर गायकवाड यांच्यासह फौजफाटा तातडीने दाखल झाला. पोलीसांनी पंचनामा करून ब्रम्हनाथ याचा मृतदेह रुग्णालयात पाठवला. त्यानंतर घराचा पंचनामा केल्यानंतर तिजोरीतील साहित्य विस्कटले होते. आठ ते दहा लाख रुपयांची चांदी, सोन्याचे दागिने चोरीस गेले होते. यावरून हा खून लुटमारीच्या उद्देशाने झाला असावा, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज होता.
मात्र, पोलिसांनी मृताच्या आई, वडिलांकडे चौकशी केल्यानंतर लहान भाऊ प्रवीण हालोंडे (वय २५) व ब्रह्मनाथ यांच्यात भांडण, वाद होता. दोघेही एकमेकांच्या जिवावर उठले होते. ब्रह्मनाथ लग्न जमत नसल्याने चिंतेत होता. चिडचिड्या स्वभावामुळे तो आम्हालाही मारहाण व शिवीगाळ करत होता, अशी माहिती ब्रह्मनाथच्या पालकांनी दिल्यानंतर पोलिसांची संशयाची सुई लहान भाऊ प्रवीण याच्यावर आली. प्रवीणला ताब्यात घेऊन चौकशी केली. पण, तो ताकास तूर लावू देत नव्हता. ‘तो मी नव्हेच’ असा लखोबा लोखंडेचा अवतार धारण केला.
पोलिसी खाक्या दाखवताच त्याने भावाचा खून केल्याची कबुली दिली. या खुनात आपण एका मित्रालाही सहभागी केल्याचे सांगितले. पोलिसांचा अर्धा तपास पूर्ण झाला होता. संशयित दोघांना अटक केली. त्यांनी खून केल्याची कबुली दिली. प्रवीण हालोंडे याने आंतरजातीय विवाह केला होता. त्यामुळे ब्रह्मनाथ याचे लग्न जुळत नव्हते. परिणामी, ब्रह्मनाथ लहान भावावर चिडून होता. प्रवीणला तो चांदीच्या व्यवसायातही अडचणी निर्माण करत होता. ब्रह्मनाथच्या या त्रासाला कंटाळून प्रवीण दुसऱ्या गावात खोली भाड्याने घेऊन पत्नीसह राहत होता.
मोठा भाऊ ब्रह्मनाथ हा आपल्या कामात अडथळा आणतो. तसेच तो आपल्याला गाठून ठार मारण्याची तयारी करत आहे, असे प्रवीणला वाटत होते. आपला गेम होण्यापूर्वी भावाचाच गेम वाजवायचा असे ठरवून प्रवीण याने मित्राच्या मदतीने सख्खा भाऊ ब्रह्मनाथ याचा खून केल्याचे पोलीस तपासात उघड झाले. पोलिसांनी प्रवीण सुकुमार हालोंडे (वय २८, रा. रेंदाळ) व सहकारी मित्र आनंद शिवाजी खेमलापुरे (वय २४, रा. हुपरी) अशा दोघांना अटक केली आहे.
फोनवरून लोकेशन शोधले
आई, वडील शेताच्या कामानिमित्ताने बाहेरगावी गेले आहेत. त्यांना दोन दिवस लागतील. सध्या ब्रह्मनाथ घरात एकटाच आहे, अशी माहिती प्रवीणला वडिलांना फोन केल्यानंतर कळली. ब्रह्मनाथ घरात एकटा असल्याने प्रवीणने डाव साधला. कामानिमित्ताने रविवारी दुपारी तीन वाजता घरात गेला. मित्राच्या मदतीने धारदार चाकूने ब्रह्मनाथचा खून केला. कपाटातील चांदीचे दागिने काढून घेऊन साहित्य विस्कटले. शांत डोक्याने ते निघून गेले.

सिल्वर झोन निर्जन परिसर
सिल्व्हर झोन हा हुपरी व गोकुळ शिरगांव या दोन गावांच्या बाँड्रीवरचा परिसर आहे. मात्र, ही हद्द गोकुळ शिरगांव पोलीस ठाण्याच्या अखत्यारित येते. रात्री निरव शांतता असते. दिवसाही फारसे कोणी नसते. कुटुंबीय कामानिमित्त बाहेर जातात. त्यामुळे घरात ठरावीक लोक असतात. दुपारी विश्रांती घेत असल्याने सर्वच घरांचे दरवाजे बंद असतात. त्यामुळेच प्रवीण खून करून गेल्याचे कोणाच्याही लक्षात आले नाही.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.