ओळख : वेगळी वाट चोखाळणाऱ्या नवदुर्गांची – १ – सुशीला व बेबी बिडकर
पुणे (बारामती झटका)
आभाळाला बाप व पृथ्वीला आई समजून काळ्या आईची सेवा करणाऱ्या अमरावती जिल्ह्यातील वरूड तालुक्यातील पुसला गावात राहून १२ कि.मी. वर असणाऱ्या पंढरीच्या जंगलात ४ कि.मी. चालून शेतीत राबून आपला उदरनिर्वाह करणाऱ्या सुशीला व बेबी या दोघी भगिनी आज जवळपास महाराष्ट्राला माहीत झाल्यात. महाराष्ट्राच्या कृषीकन्या, रणरागिणी, बंडखोर व विद्रोही अशा या जिजाऊ, सावित्री, रमाईच्या लेकी आज समाजबांधव, समाजकंटकांचा त्रास सहन करून पुढे जात शेतकऱ्यांच्या आयडॅाल बनल्या आहेत.
अठराविश्व दारिद्र्य, वडील व्यसनाधीन, ५ बहिणी, लहानपणापासून आईची पाहिलेली मारहाण, उपाशीपोटी झोपणे, आईची हतबलता हे सारं पहात या बहिणी मोठ्या झाल्या. सुशीला इंग्लिश लिटरेचर व बेबी १२ वी झाली. पुढे परिस्थितीमुळे त्यांनी शेती हाच व्यवसाय निवडला. वडील या सर्व बहिणी व आईला सोडून कधीच गेले होते. इतरांकडे मोलमजुरी करून यांनी झोपडीवजा घर बांधले. ७-८ वर्ष ४ एकर शेती पडीक होती. पण इतरांच्या शेतात राबण्यापेक्षा आपल्या शेतीत राबले तर पीक जास्त निघेल हा विचार करून मोठ्या बहिणीने व आईने कष्टाने शेती सुरू केली. संत्राचे पीक आले की वडील ते विकायला जायचे व पैसे घ्यायचे, असा संसार सुरु होता. मोठ्या बहिणीचे लग्न करून दिले. अशातच वडील गेले व त्यानंतर दोन वर्षांनी आई गेली. सर्व बहिणी पोरक्या झाल्या. कसेही असले तरीही आईवडील असण्याचा आधार असतो.
काही वेळा दुःख, संघर्ष पाचवीला पुजलेलं असतं असं म्हणतात, त्याप्रमाणे या बिडकर भगिनींच्या वाट्याला आलं असं म्हणावं लागेल. आई वडीलांना जाऊन अनुक्रमे १३ व १५ वर्ष झालीत. सुमारे २३/२४ वर्षापासून सुशीला व बेबीने वडिलोपार्जित शेती स्वकष्टाने कसायला, फुलवायला सुरूवात केली. नापिकी, दुष्काळ, रोगराई याची पर्वा न करता शेतात संत्री, मोसंबी, सीताफळ अशी फळांची लागवड केली. प्रचंड घनदाट जंगल, जंगली जनावरांचा वावर असूनही रात्री बेरात्री पाणी द्यायला किमान १० कि.मी. जंगलातून आठवड्यातून दोनतीनदा जाणे, अगदी विषारी साप, हिंस्त्र प्राणी यांना चुकवत, माणसांपासून संरक्षण करताना बॅटरी न घेता जाऊन धाडसाने या भगिनी आजही शेती करत आहेत. गहू, कांदा, हरभरा, कपाशी अशी पिके घेत ती विकण्यापर्यंतची सारी कामे या दोन वाघिणी करतात. यातून मिळालेल्या उत्पन्नातून त्यांनी मोठ्या तीन बहिणींचे विवाह करून दिले व स्वतः शेती करायचा निर्णय घेतला. यांचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे शेती बरोबरच या शेतकऱ्यांसाठी वेगळ्या पध्दतीने लढा उभारत आहेत. सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे शेतकरी हतबल झाला आहे. निसर्गाची त्याला अनेकदा साथ नसते. शेतात राबणारा शेतकरी खऱ्या अर्थाने मालक व्हावा, सावकराकडून होणारी पिळवणूक थांबावी. बॅंकांमार्फत शेतकऱ्यांना मिळणारी मदत व शासकीय योजनांचा लाभ शेतकऱ्यांपर्यंत पोचावी यासाठी जागृती अभियान सुरू केले. शेतकऱ्यांचा आवाज बनून त्यांनी लोकजागर सुरू केला. महेंद्री हे अभयारण्य जाहीर करावे यासाठी त्या लढा देत आहेत. वन्यप्राणी पिकाचे नुकसान करतात. त्याची नुकसान भरपाई मिळावी यासाठी पंचनामा केला जातो. परंतु नुकसान भरपाईसाठी केलेल्या पंचनाम्यात अफरातफर व खोटी सही केल्यामुळे या भगिनींनी त्याला वाचा फोडण्यासाठी या भगिनींनी नुकतेच ९ दिवसाचे उपोषण केले होते. या त्यांच्या लढ्यामुळे वनपरिक्षेत्र अधिकारी निलंबित तर एक वनपाल निलंबित झाले व दोन कर्मचाऱ्यांना शोकॉज नोटीसा देण्यात आल्या. शेतकऱ्यांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात त्या सतत शासन, प्रशासन, वनखाते विरोधात आवाज उठवतात त्यामुळे अनेकदा त्यांना दबाव, दहशतवादाला सामोरे जावे लागले आहे. गावगुंड, समाजकंटक, पुरूषी मानसिकता यामुळे अनेकदा त्यांना त्रासाचा सामना करावा लागला परंतु त्यांनी कायम शांतपणे कायद्याचा आधार घेतला. प्रत्येक प्रसंगातून त्या तावून सुलाखून निघाल्या. यामुळेच त्यांना आज एक वेगळी प्रतिष्ठा व इज्जत समाजातून मिळत आहे. नीडर व धाडसीपणे शेती केल्याने आज दोघींना भरपूर सन्मान व पुरस्कार मिळत आहेत.
दोघी भगिनींचे अतूट प्रेम असल्याने व गेली २३-२४ वर्ष एकत्रितपणे शेतीत कष्ट करत असल्याने दोघींचे जीवन, कार्य व कर्तृत्व आज एकच झाले आहे. त्यामुळे दोघीही रणरागिणी व वाघिणींची ही एकत्रित कथा. पुरस्कार घेतानाही एक शाल दोघींना टाका असे सांगणाऱ्या या आधुनिक नवदुर्गा आहेत. यांना आजवर रणरागिणी पुरस्कार, हिरकणी पुरस्कार,
आदर्श महिला पुरस्कार, ऑरेंज city आयकॉन अवॉर्ड, कर्तृत्वत्वान महिला पुरस्कार, नारीशक्ती पुरस्कार, आदर्श नारीभूषण पुरस्कार, वसंतराव नाईक पुरस्कार, कृषिरत्न पुरस्कार असे शेकडो पुरस्कार त्यांना मिळाले आहेत. आज या भगिनी इतर शेतकऱी महिलांनाच नव्हे तर पुरूषांनाही प्रेरणादायी आहेत. अनेक शेतकरी त्यांचा सल्ला आज घेत आहेत व आपले प्रश्न व समस्या सांगत आहेत. आपले प्रश्न सोडवताना नकळतपणे त्या इतरांचे नेतृत्व करताना दिसतात. परिस्थितीचा सामना करून आयुष्याचा नवा सूर्य पाहाणाऱ्या या रणरागिणी आता मृत्यूलाही भीत नाहीत. रोज नवनवे आव्हान त्या स्वीकारत आहेत. ‘लाईटच्या वेळा रात्री असल्याने शेतात पाणी द्यायला तेव्हा जावे लागते. त्यावेळी आम्ही जनावरांना घाबरत नाही. माणसाला घाबरतो. साप वगैरे नेहमी दिसतात पण ते काही करत नाही पण माणसांनीच जास्त त्रास दिला आहे.’ असे सुशीला सांगते. ‘जात पात धर्म हा भेदभाव आम्ही कधीच करत नाही. तरीही आम्हांला बदनाम करायचा प्रयत्न झाला, बाईला गप्प करायचे म्हणून चारित्र्यावर शिंतोडे उडवायचा, अगदी ॲट्रॅासिटी लावायचाही प्रयत्न झाला. पण सर्व संतांना, महापुरूषांना आम्ही मानतो, त्यांच्या विचारांनी बळ येते. नातेवाईक व समाजाचे पाठबळ नाही पण महामानवांच्या प्रेरणेने आम्ही जीवंत आहोत.’
साधी रहाणी, बोलण्यात करूणेचा भाव, शेतकऱ्यांविषयी कळवळा, आत्मीयता, खरेपणा, सच्चेपणा, कष्ट, जिद्द, हिंमत बाळगून संघर्षातून वाट काढत ये वक्त भी गुजर जायेगा… ही भावना सतत मनात ठेवून जगणे समृध्द करणाऱ्या या दोन्ही कृषीकन्या या आजच्या आधुनिक नवदुर्गा आहेत. त्यांच्या प्रचंड संघर्ष व जिद्दीला मानाचा मुजरा..!
सुशीला बिडकर – 99602 94725
ॲड. शैलजा मोळक
लेखक, कवी, समुपदेशक, व्याख्याता
अध्यक्ष शिवस्फूर्ती प्रतिष्ठान व जिजाऊ ग्रंथालय पुणे
मो. 9823627244
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.
Tempat paling asik bermain slot game hanya di big77