लोणार सरोवर : अद्वितीय, अद्भुत आणि रहस्यमय पर्यटन स्थळ
एक अद्भुत खाऱ्या पाण्याचे विवर
(बारामती झटका)
लोणार सरोवर हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील बुलढाणा जिल्ह्यातले खाऱ्या पाण्याचे जगातील तिसऱ्या क्रमांकाचे सरोवर आहे. याची निर्मिती फार वर्षांपूर्वी उल्कापातामुळे झाली. हे सरोवर औरंगाबाद शहरापासून १५० किलोमीटर अंतरावर आहे. लोणार सरोवर हे बेसॉल्ट खडकातील एकमेव मोठे आघाती सरोवर आहे आणि या सरोवराचे पाणी अल्कधर्मी आहे. लोणार सरोवराच्या जतनासाठी व संवर्धनासाठी लोणार विवर हे वन्यजीव अभयारण्य म्हणून घोषित केले आहे. तसेच या परिसरात अंदाजे बाराशे वर्षांपूर्वीची जुनी मंदिरे आहेत. त्यापैकी जास्त मंदिरे ही भगवान महादेवांची आहेत. मंदिराच्या समोर गोमुख कुंड आहे. या गोमुख कुंडाचे वैशिष्ट्य म्हणजे यातून बारा महिने पाणी वाहत असते. ते पाणी कधीच म्हणजे उन्हाळ्यातही बंद होत नाही. ते पाणी कुठून येते हे आजपर्यंत कोणालाच कळले नाही.
सरोवराची निर्मिती पन्नास हजार वर्षांपूर्वी झाली असे मानले जाते. पण २०१० साली प्रकाशित झालेल्या एका शोध निबंधात सरोवराचे वय पाच लाख सत्तर हजार वर्ष इतके वर्तवण्यात आले आहे. अमेरिकेतील स्मित सोनियन संस्था, युनायटेड स्टेट्स जिओग्रफ़िकल सर्वे तसेच भारतातील जिऑलॉजिकल सोसायटी ऑफ इंडिया, फिजिकल रिसर्च लॅबोरेटरी, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी यासारख्या अनेक संस्थांनी या सरोवरावर संशोधन केले आहे.
महाराष्ट्राच्या सात आश्चर्यापैकी लोणार सरोवर हे एक आश्चर्य ठरले आहे. महाराष्ट्रातील अद्भुत आणि देखण्या सात आश्चर्यांची जून २०१३ मध्ये घोषणा करण्यात आली. त्यामध्ये शांति सदभावनेचे प्रतीक ग्लोबल पॅगोडा, मुंबईच्या मध्य रेल्वेचे मुख्यालय सीएसटी स्टेशन, मध्ययुगीन काळातील एक अभेद्य दौलताबादचा किल्ला, पश्चिम घाटातील कास पठार, स्वराज्याची पहिली राजधानी रायगड किल्ला, औरंगाबाद मधील अजिंठा लेणी आणि बुलढाणा जिल्ह्यातले लोणार सरोवर ही आपल्या महाराष्ट्रातील सात आश्चर्य ठरलेली आहेत.
लोणार सरोवर हे एक अति वेगवान धूमकेतू किंवा उल्का तिथे आदळल्यामुळे निर्माण झाले असे सिद्ध झाले आहे. या सरोवराचा आकार काहीसा अंडाकृती आहे. उल्का पूर्वेकडून ३५ ते ४०° च्या कोनाने आली आणि आदळली. त्यामुळे या ठिकाणी सरोवर (विवर) निर्माण झाले. सरोवराच्या पृष्ठभागाचे क्षेत्रफळ अंदाजे १.१३ चौरस किलोमीटर आहे तर सरोवराची खोली १३७ मीटर आहे.
महाराष्ट्रातील अद्वितीय अद्भुत आणि रहस्यमय असे ज्याचं वर्णन करता येईल असं बुलढाणा जिल्ह्यातील लोणार सरोवराविषयी या लेखात आपण अधिक माहिती पाहणार आहोत.
एक लवणासूर नावाचा राक्षस होता. तो या ठिकाणी राहणाऱ्या लोकांना व तपश्चर्या करणाऱ्या साधुसंतांना खूप त्रास द्यायचा. म्हणून येथील लोकांनी त्याची तक्रार देवाकडे केली. त्यामुळे विष्णु भगवान यांनी बाल विष्णूचे रूप घेऊन लवणासुराचा वध केला. संस्कृत मध्ये लवण म्हणजे मीठ आणि लवणासुराचा वध या सरोवरात झाला म्हणून या सरोवराचे पाणी खारट झाले, असे पौराणिक कथेनुसार सांगण्यात येते. परंतु यामागे कोणते विज्ञान आहे हे आपण जाणून घेऊयात.
भारतातील इतर काही पर्यटन स्थळाप्रमाणे हे सरोवर देखील एक इंग्रजी अधिकारी जे. ई. अलेक्झांडर यांना १८२३ मध्ये दृष्टीस पडले. भारत स्वतंत्र झाल्यानंतर जिऑलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाने लोणार सरोवर याविषयी संशोधन केले. येथील दगडांचे कार्बन डेटिंग केले आणि त्यांच्या लक्षात आले की, हे सरोवर अंदाजे पन्नास हजार वर्षांपूर्वीचे आहे. लोणार सरोवर पाहण्यासाठी प्रवेश शुल्क भारतीयांसाठी चाळीस रुपये तर, परदेशवासियांसाठी साठ रुपये आहे. आपल्याला जर त्या ठिकाणचे छायाचित्रण करायचे असेल तर त्यासाठीही भारतीयांसाठी शंभर रुपये व परदेशवासींसाठी दोनशे रुपये भरावे लागतात. आत गेल्यानंतर आपल्याला एक प्राचीन मंदिर दिसते ते मंदिर म्हणजे यज्ञेश्वर मंदिर किंवा शुक्राचार्य यांची वेधशाळा. या वेधशाळेत तारे व ग्रहांचा अभ्यास करून पावसाविषयी अंदाज बांधण्यात यायचा. लोणार सरोवराच्या परिसरात एकूण चौदा मंदिर असून त्यापैकी बारा मंदिरे महादेवाची आहेत. असं म्हणतात की, या सरोवराला पूर्ण प्रदक्षिणा घालून जर या मंदिरांचे आपण दर्शन घेतले तर बारा ज्योतिर्लिंगांचे दर्शन घेतल्याचे पुण्य माणसाला मिळते.
शुकाचार्यांच्या वेधशाळेनंतर येते ते रामगया मंदिर. या ठिकाणी भगवान श्रीराम यांनी वास्तव्य केले होते असे म्हणतात. त्यावेळी प्रभू रामचंद्रांनी माता सीता यांच्या आंघोळीसाठी बाण मारून पाणी काढले होते. त्या ठिकाणाला माता सीता न्हाणीघर असे म्हणतात. आजही त्या ठिकाणामधून पाणी वाहत असते. या ठिकाणचे पाणी सुद्धा नेमके कुठून येते, हे आजपर्यंत कोणालाही समजले नाही. रामगया मंदिरातील राम, लक्ष्मण व सीता यांच्या मूर्ती निजामाच्या काळामध्ये नष्ट केल्या होत्या. परंतु काही वर्षांपूर्वी या ठिकाणी श्रीरामाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. या मंदिराचे वेगळेपण म्हणजे आपण प्रत्येक ठिकाणी श्रीरामांच्या मंदिरामध्ये राम, लक्ष्मण आणि सीता अशा तिघांच्याही मूर्ती पाहतो. पण या मंदिरामध्ये फक्त प्रभुरामांचीच मूर्ती आपल्याला पाहायला मिळेल. परंतु या मंदिराचे एक वैशिष्ट्य म्हणजे आपण जर मुख्य चौकटीच्या बरोबर समोर उभा राहून दर्शन घेतले तर आपली सावली प्रभू रामांच्या दोन्ही बाजूला पडते व आपल्याला बंधू लक्ष्मण व सीता माता या दोघांचेही दर्शन झाल्यासारखे वाटते.
लोणार सरोवराच्या काठावर कमलजा देवीचे अतिशय पुरातन असे मंदिर आहे. नवव्या व दहाव्या शतकामध्ये या ठिकाणी दैत्यांनी ठाण मांडल्यामुळे दैत्यांचा नाश करून कमलजा देवीने आपले वास्तव्य याच ठिकाणी केले. कमलजा देवी ही अनेक लोकांची कुलदैवत असल्यामुळे या ठिकाणी नवरात्रमध्ये कमलजा देवीची यात्रा भरली जाते. कमलच्या देवीच्या मंदिराच्या समोरच सासु-सुनेची विहीर आहे. या विहिरीचे वैशिष्ट्य व वेगळेपण म्हणजे या एकाच विहिरीतील पाणी खारट व गोड आहे, असे म्हणतात. विहिरीतील मंदिराकडेची बाजू आहे तिकडचे पाणी गोड तर विहिरीची सरोवराकडची जी बाजू आहे ते पाणी खारट आहे. असे एकाच विहिरीचे गोड व खारट पाणी आपणाला एकत्र येथे पाहायला मिळते. आपल्या भारतीय परंपरेनुसार जलतीर्थ, स्थल तीर्थ, कामतीर्थ व मोक्षतीर्थ असे तीर्थाचे प्रकार पडतात. त्यापैकी जलतीर्थ व मोक्षतीर्थ असे दोन्ही तीर्थ आपल्याला या विहिरीमध्ये मिळतात. त्यामुळे सासु-सुनेची विहीर ही पर्यटकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू बनलेली आहे.
एका उल्कापातेच्या आघातामुळे निर्माण झालेले हे निसर्गसौंदर्य अतिशय मनमोहक, मानवाला निसर्गाच्या जवळ घेऊन जाणारे, चिकित्सकवृत्ती जागृत करणारे, वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करणारे, निसर्गाविषयी आपुलकी वाढवणारे, नैसर्गिक संसाधनाविषयी जागृती वाढवणारे असे आहे. लोणार सरोवर हे आपल्या भारतामध्ये आहे, याचा आपल्या सर्व भारतीयांना तसेच महाराष्ट्रीयनांना विशेष अभिमान वाटावा असेच आहे. आतापर्यंत भारतातील तसेच जगातील विविध शास्त्रज्ञांनी लोणार सरोवराविषयी बरेच संशोधन केलेले आहे. वैज्ञानिकांच्या मतानुसार जेव्हा उल्कापात झाला तेव्हा या ठिकाणी एक मोठे आघाती विवर निर्माण झाले. त्यावेळी यामध्ये पाणी नव्हते. परंतु खूप खोल खड्डा निर्माण झाल्यामुळे आजूबाजूच्या डोंगर उतारावरून येणारे पाणी या ठिकाणी जमा झाले. परंतु हे विवर बेसॉल्ट खडकाचे आघाती विवर असल्यामुळे या सरोवराचे पाणी खारट झाले, असे वैज्ञानिकांचे मत आहे. या सरोवरातील पाणी हे समुद्राच्या पाण्याच्या सात ते दहा टक्के पेक्षा जास्त खारट आहे. त्यामुळे या सरोवरामध्ये खूपच दुर्मिळ असेच जीव वास करतात.
अपोलो वन मधून चंद्रावरून जे दगड आले होते, त्या दगडांचा अभ्यास केला असता त्या दगडांमध्ये असणारे घटक आणि लोणार सरोवर येथील दगड यामध्ये साम्य आढळून आलेले आहे. तसेच सर्वात जास्त अल्कलाइन असलेले पाणी फक्त या सरोवरात आढळून आलेले आहे. निसर्गाचा एक अद्भुत चमत्कार, असे या सरोवरासंबंधी म्हटले जाते. तसेच आइना-ए-अकबरी, स्कंदपुराण व पद्मपुराण यासारख्या प्राचीन ग्रंथातही या विवराचा संदर्भ आढळतो. प्राचीन ग्रंथात या सरोवराचा उल्लेख ‘विराज तीर्थ’ किंवा ‘बैरजतीर्थ’ असा केला जात असे.
संपूर्ण जगाला आश्चर्य वाटावे असे हे लोणार सरोवर आपल्या भारतामध्ये आणि विशेष म्हणजे महाराष्ट्रामध्ये आहे. त्या विषयी आपण अधिकाधिक माहिती जाणून घेऊन उपलब्ध असलेल्या निसर्ग सौंदर्याचे जतन करूयात.
शब्दांकन/ संकलन- श्रीमती दिपाली शांताराम तापोळे
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा
चोरमले पवार वस्ती
तालुका-माळशिरस,जिल्हा- सोलापूर.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.
“This is exactly what I was looking for, thank you!”
“Thanks for sharing such valuable information!”
“Amazing post, keep up the good work!”