मळोली गावातील खिलार जातीची कालवड महूद येथील प्रदर्शनात दाखल होणार…

मळोली ता. माळशिरस, येथील सुरज उर्फ शिवराम शिरीष जाधव पाटील यांची देखणी पैठण कालवड महुद बुद्रुक ता. सांगोला येथील प्रदर्शनात लक्ष वेधून घेणार…
मळोली (बारामती झटका)
मळोली ता. माळशिरस, येथील चिरंजीव सुरज उर्फ शिवराम शिरीष जाधव पाटील यांची देखणी पैठण कालवड महुद बुद्रुक ता. सांगोला, येथील प्रदर्शनात लक्ष वेधून घेणार आहे. खिलार जातीची कालवड महुद येथील प्रदर्शनात दाखल करणार असल्याचे गोरक्षक व प्रगतशील बागायतदार शिरीष सोपानराव जाधव पाटील व शिवशंकर सोसायटीचे चेअरमन शशांक बाळासाहेब जाधव पाटील यांनी सांगितले.
सुरज जाधव पाटील यांनी सदरची कालवड लहानपणी कसाई यांच्या ताब्यातून सोडवून गाईचे संगोपन केलेले आहे. लहानपणापासून तळहाताच्या फोडाप्रमाणे पैठणीला जपलेले आहे. खिलार गाय वाचली पाहिजे, यासाठी त्यांनी पैठण गायीची काळजी घेतलेली आहे. योगायोगाने एक वर्ष पूर्ण होत आलेले आहे, त्या पैठण कालवडीच्या नैसर्गिक शरीरावर देणगी लाभलेली आहे. टोकदार शिंदे आहेत, शेपटाला झुपकेदार केसांचा गोंडा आहे. डोळे, नाकपुडी व पायांचे चारीही खुर काळेभोर आहेत. जेमतेम उंची आहे. शरीरावर कोणत्याही प्रकारे डाग नाही. पांढरीशुभ्र रंगाला असणारी खिलार जातीची पैठणी कालवड सांगोला तालुक्यातील खिलार जनावरासाठी सुप्रसिद्ध असणाऱ्या महूद यात्रेतील जनावरांच्या प्रदर्शनामध्ये सहभागी होणार आहे.
प्रदर्शनात शेतकरी, गोरक्षक व यात्रेकरू यांचे पैठण नक्कीच लक्ष वेधून घेईल आणि बक्षीसास पात्र होऊन जाधव पाटील घराण्याचे व मळोली गावाचे नाव उज्वल करील असा आशावाद सुरज उर्फ शिवराम शिरीष जाधव पाटील यांच्या बोलण्यातून जाणवत होता.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.