माळशिरस येथे मुलीच्या जन्माचे जल्लोषात स्वागत.

माळशिरस (बारामती झटका)
मुलगी झाल्याचा आनंद व्यक्त करण्यासाठी वाघमोडे परिवार व मदने परिवार यांनी मुलीच्या जन्माचे जोरदार स्वागत करून आनंदोत्सव साजरा केला. एकीकडे स्त्रीभ्रूण हत्येसारखा कलंक समाजाला लागलेला असताना, दुसरीकडे अशाप्रकारे सकारात्मक आणि आदर्श पावलंही उचलली जात आहेत.
सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस गावात साठ फाटा पाटील वस्ती, येथील बापू एकनाथ वाघमोडे यांची मुलगी रूपाली व झंजेवस्ती येथील पोपट मदने यांचे चिरंजीव दीपक यांना पहिल्यांदा मुलगी झाल्याने एक अनोखा स्वागत सोहळा साजरा केला. एक चिमुकली पाहुणी घरात येणार होती. तिच्या स्वागताला घरातील सर्वजण जणू आसुसलेले होते.

सकाळपासून लोक या चिमुकलीच्या आगमनाची वाट पाहत होते. ही पाहुणी दुसरी-तिसरी कुणी नसून जन्मलेली लेक होती. आपल्या तान्हुल्या लेकीच्या स्वागतासाठी तिच्या घरातील सर्वांनी फुलांच्या पायघड्या व फटाक्यांची आतिषबाजी करत जोरदार स्वागत केले. दीपक आणि रूपाली यांच्या पोटी एक कन्यारत्न जन्माला आले.

१२ डिसेंबर २०२४ या दिवशी मुलीने जन्म घेतला. मुलगी जन्माला आल्याचा आनंद या दाम्पत्याच्या गगनात मावत नव्हता. दवाखान्यातून घरी आणताना स्वागत समारंभ करण्याची योजना जन्मदात्यांनी आखली. त्यांच्या या आनंदात घरातील सर्वांनी हिरीरीने भाग घेतला. एका नवजात मुलीच्या स्वागताची अशी तयारी म्हणजे स्त्री भ्रूण हत्येच्या विरोधातील एक सकारात्मक पाऊलच म्हणावं लागेल.


नवजात मुलीच्या आई-वडिलांना झालेला आनंद अवर्णनीय होता. ज्या गावात मुलीच्या जन्मानंतर नाक मुरडली जायची, त्या गावात मुलीच्या जन्माचं स्वागत झालं, हा बदल समाजमनाला नवी दिशा देणारा आहे. माळशिरस गावातला हा स्वागत सोहळा महाराष्ट्राला अनुकरणीय ठरावा असा आहे. तसं झालं तर लेक वाचवा अभियानाला खऱ्या अर्थाने गती येईल.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.