संग्रामनगर येथे प.पु. सदगुरु श्री शंकर महाराज यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा स्थापना व दक्षिणमुखी मारुती मंदिराचा कलशारोहण समारंभ संपन्न

अकलूज (बारामती झटका)
संग्रामनगर अकलूज, ता. माळशिरस येथे परमपूज्य सदगुरु श्री शंकर महाराज यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा स्थापना व दक्षिणमुखी मारुती मंदिराचा कलशारोहण समारंभ मोठ्या धार्मिक उत्साहात संपन्न झाला. परिसरातील सर्व समाज बांधवांनी एकत्र येऊन दि. २४ व २५ डिसेंबर २०२४ असे दोन दिवस धार्मिक विधीसह शंकर महाराजांच्या नवीन मूर्तीची प्राणप्रतिष्ठा सहित दक्षिणमुखी मारुती मंदिराचे व शंकर महाराज मंदिराचे कलशारोहण करण्यात आले. या निमित्ताने ग्राम प्रदक्षिणा मिरवणूक, पुण्याह वाचन, देवता स्थापना, मूर्ती व कलशाला जलाधीवास, धान्य दिवस, शय्यादीवास, अग्निस्थापना, आदित्यादी नवग्रह स्थापना, आवहित देवांचे हवन, तत्वन्यास हवन आदी धार्मिक विधी परमपूज्य श्रीपाद तीर्थ स्वामीजी महाराज सज्जनगड यांच्या हस्ते करण्यात आले.
सदर कार्यक्रमाचे पौरोहित्य वेदमूर्ती प्रवीण इनामदार गुरुजी व सहकारी श्रीक्षेत्र सज्जनगड यांनी केले. या कार्यक्रमाचे आयोजन सर्व ग्रामस्थ, विश्वरूप प्रतिष्ठाण व सर्व मित्र परिवार यांच्या सहकार्याने झाले. सर्व विधी व धार्मिक कार्यक्रम यशस्वी पार पाडले. या निमित्ताने ऋतुजा पोतदार यांनी शंकर महाराजांच्या चित्राची अत्यंत सुबक रांगोळी काढली. तसेच धार्मिक विधीनंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात आले व हजारो भाविकांनी याचा आस्वाद घेतला.
ज्या जागेत परमपूज्य सदगुरु श्री शंकर महाराजांचे मंदिर उभारले आहे, त्या जागेत काही काळ शंकर महाराजांचे वास्तव्य होते.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.