पत्रकारांच्या आर्थिक विकास महामंडळावर इंदापूरला संधी द्या – विजयसिंह मोहिते पाटील
इंदापुरात पत्रकार दिन सोहळ्यानिमित्त विकासाच्या भागीदारांचा पुरस्कार देऊन सन्मान
इंदापूर (बारामती झटका)
इंदापूर येथील शहर ग्रामीण मराठी पत्रकार संघ व महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाने कोरोना कालावधीत १४ हजार कुटुंबांना, सलग दोन वर्ष अन्नधान्य मोफत पुरवून व बाविस गावांमध्ये वृक्षारोपण करून आदर्श निर्माण केला आहे. या पत्रकार संघाचे अध्यक्ष नीलकंठ मोहिते यांचे आदर्शवत कार्य असल्याने शासन स्थापन करीत असलेल्या पत्रकारांचे आर्थिक विकास महामंडळाच्या संचालक पदी नियुक्ती करून त्यांचा सन्मान केल्यास आगामी काळात राज्यातील पत्रकारांना मदत मिळवून देण्यासाठी मोठी मदत होईल. यासाठी शासनाकडे आग्रह धरणार असल्याची माहिती राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांनी दिली.
इंदापूर शहरातील डॉ. नीतू मांडके आयएमए हाऊस सभागृहात महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ व शहर ग्रामीण मराठी पत्रकार संघाच्या वतीने सोमवार (ता. ६ जानेवारी) रोजी पत्रकार दिन सोहळ्याचे आयोजन राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले होते. यावेळी तालुक्यातील विकासाचे भागीदार यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. तसेच शेकडो महिला सफाई कामगारांना, मोफत पैठणी व आदर्श पत्रकारांचा सन्मान करण्यात आला. यावेळी उपस्थितांचे स्वागत पत्रकार संघाच्या वतीने तालुका अध्यक्ष नीलकंठ मोहिते, स्वागत प्रमुख संतोष आटोळे, सचिव सागर शिंदे यांनी केले.
पुढे बोलताना माजी उपमुख्यमंत्री मोहिते पाटील म्हणाले की, इंदापूर येथील पत्रकार भवन उभारणीसाठी शासनाच्या माध्यमातून भरीव मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार आहे. पुणे जिल्ह्याने आदर्श घ्यावा, असे पत्रकार भवन आगामी काळात उभे राहील, असा आशावाद मोहिते पाटील यांनी व्यक्त केला. मोहिते पाटील यांच्या भाषणाचे वाचन जेष्ठ पत्रकार सूर्यकांत भिसे यांनी केले.
यावेळी कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन भरत शहा, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षाचे इंदापूर तालुका अध्यक्ष ॲड. तेजसिंह पाटील, इंदापूर बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. गिरीश शहा, उद्योजक वसंतराव मोहोळकर, इंदापूर नगरपरिषदेचे मुख्य अधिकारी रमेश ढगे, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सचिन खुडे, दुय्यम निबंधक विनायक तपस्वी, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य श्रीमंत ढोले, जेष्ठ पत्रकार चंद्रकांत कुंभार, मुकुंद शहा, बाळासाहेब हरणावळ, महारुद्र पाटील, रघुनाथ राऊत, शिवाजी मखरे, संदिपान कडवळे, प्रा. कृष्णाजी ताटे, धरमचंद लोढा, सागर मिसाळ, डॉ. अनिल शिर्के यांच्यासह राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, पत्रकार व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
याप्रसंगी तालुक्याच्या विकासाचे भागीदार म्हणून शहा ग्लोबल स्कूलच्या रुचिरा अंगद शहा तसेच जय भवानी गड विकास प्रतिष्ठानचे श्रीमंत ढोले यांना आदर्श शिक्षण संस्था पुरस्कार, श्री केतकेश्वर सहकारी पतसंस्थेचे चेअरमन गोरख आदलिंग यांना आदर्श पतसंस्था पुरस्कार, शिवाजी विद्यालय व जुनिअर कॉलेजचे प्राचार्य दशरथ घोगरे यांना आदर्श प्राचार्य पुरस्कार, तर आदर्श युवा उद्योजक म्हणून जे. के. जगताप कंपनीचे विराज जगताप, आदर्श योग शिक्षक म्हणून दत्तात्रेय अनपट, आदर्श वैद्यकीय सेवा म्हणून डॉक्टर श्रेणिक शहा, आदर्श उद्योजक म्हणून सागर भोसले यांना पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले.
सदर कार्यक्रमाचे प्रस्ताविक पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष नीलकंठ मोहिते यांनी केले, तर आभार सचिव सागर शिंदे यांनी मानले.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.