रामराजे नाईक निंबाळकर यांचे चुलत बंधू संजीवराजे अन रघुनाथराजेंच्या घरावर आयकराचा छापा
संजीवराजे यांच्या फलटणसह इतर ठिकाणी छापेमारी सुरू, अकलूजकडेही एक पथक रवाना असल्याची चर्चा…
सातारा (बारामती झटका)
सातारा जिल्ह्याच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांचे चुलत बंधू राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे नेते संजीवराजे नाईक निंबाळकर व रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांच्या घरावर इन्कम टॅक्स विभागानं छापा टाकल्याची माहिती आहे. संजीवराजे नाईक निंबाळकर हे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घरवापसी करण्यापूर्वीच आयकर विभागानं छापा टाकला आहे. आज सकाळीच आयकर विभागाचं पथक संजीवराजे यांच्या घरी दाखल झालं. आयकर विभागाचे पथक संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या बंगल्यावर दाखल झाले आहे. सकाळी सहा वाजल्यापासूनच बंगल्यामध्ये इन्कमटॅक्स अधिकाऱ्यांकडून संजीवराजे नाईक निंबाळकर यांची चौकशी सुरू करण्यात आली आहे. बंगल्यामध्ये आत कोणालाही प्रवेश दिला जात नाही,अशी माहिती आहे.
संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या प्रमाणं रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांच्यावर देखील केंद्रीय तपास यंत्रणांच्या धाडी पडल्या आहेत. हे दोघेही रामराजे यांचे चुलत बंधू आहेत. सकाळी सहा वाजता केंद्रीय तपास यंत्रणांचे अधिकारी छापा टाकण्यासाठी दाखल झाले आहेत. या विषयीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे.
रघुनाथराजे नाईक निंबाळकर हे आधीपासूनच शरद पवार यांच्या पक्षात आहेत तर संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी निवडणुकीआधी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला होता.
माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांचे चुलत बंधू संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या घरावर आयकर विभागाची धाड पडल्याने फलटणसह पुणे, मुंबई आणि अकलूज परिसरात खळबळ माजली आहे. अकलूज येथे संबंधित असणाऱ्याकडे पथक रवाना झाले असल्याची फलटण परिसरात चर्चा सुरू आहे
संजीवराजे नाईक निंबाळकरांच्या राष्ट्रवादीतील प्रवेशापूर्वी मोठी घडामोड
संजीवराजे नाईक निंबाळकर हे येत्या काही दिवसांमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार होते. त्यापूर्वीच हा छापा टाकण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी साताऱ्यातील राज्यसभा खासदार नितीन पाटील यांच्याशी चर्चेनंतर प्रवेशाचा निर्णय होईल असं म्हटलं होतं.
रघुनाथराजे नाईक निंबाळकर कारवाईबाबत काय म्हणाले?
रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांनी संजीवराजे नाईक निंबाळकर आणि माझ्या घरावर छापा पडल्याची माहिती दिली. मी पुण्यात होतो आता फलटणमध्ये पोहोचलोय. बाहेर थांबलोय आत जाऊ देतील, अशी अपेक्षा आहे. आम्ही दोन नंबरच्या विषयात नाही, यामुळं काही डॅमेज होणार नाही. आम्ही राजघराण्यातून येतो त्यामुळं आमच्याकडे काही वेडवाकडं सापडेल, असं वाटत नाही, असं रघुनाथराजे नाईक निंबाळकर म्हणाले. सत्ताधाऱ्यांची साथ सोडल्यानं छापेमारी सुरु आहे का, असं वाटत का असं विचारलं असता तसं काही वाटत नाही. प्रक्रियेचा भाग असेल असं वाटतं किंवा असेल सुद्धा तसं काही कल्पना नाही. इतकी वर्ष राजकारणात आहोत, आजोबा देखील मंत्री होते, पण असं कधी घडलं नव्हतं. देशाला लाखो रुपये देणारं कुटुंब होतं. आम्ही संस्थान विलीन केलं तेव्हा शासकीय कार्यालयं आमच्याच इमारतीत आहेत. लोकशाहीत सामील झालेलं हे घराणं आहे, असं व्हावं हे दुर्दैव आहे, असं रघुनाथराजे नाईक निंबाळकर म्हणाले.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.