राज्याच्या राजकारणात खळबळ; माजी मंत्री तानाजी सावंत यांचा मुलगा पुण्यातून गायब, अपहरणाची शक्यता..?
![](https://baramatizatka.com/wp-content/uploads/2025/02/Screenshot_2025_0210_220816.png)
पुणे (बारामती झटका)
माजी मंत्री तानाजी सावंत यांचा मुलगा पुण्यातील विमानतळावरून बेपत्ता झाल्याची माहिती समोर येत आहे. सिंहगड पोलिस ठाण्याच्या हद्दीतील नर्हे येथून आज सायंकाळी ऋषिराज सावंत हे एका कारमधून पुणे विमानतळावर गेले होते. त्यानंतर ते पुढे कुठे गेले याची माहिती पोलिसांकडून घेतली जात आहे. दरम्यान, याबाबत पुणे पोलिसांसह तानाजी सावंत यांनी पत्रकार परिषद घेत या प्रकरणाची अपडेट दिली आहे.
आज सायंकाळी पावणेपाच वाजण्याच्या सुमारास ऋषिराज सावंत हे एका स्विफ्ट कारमधून पुणे विमानतळाकडे गेले. त्यानंतर त्यांचा संपर्क होत नसल्यामुळे ते बेपत्ता झाल्याची किंवा त्यांचं अपहरण झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे पोलिसांनी या प्रकरणी सिंहगड रोड पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करत तपासाला सुरुवात केली आहे.
याबाबत पुणे पोलिसांनी आणि तानाजी सावंत यांनी पत्रकार परिषद घेत पोलिसांकडून तपास सुरू असल्याची माहिती दिली आहे. हा अपहरणाचा प्रकार आहे की इतर काही विषय याचाही शोध पोलिसांकडून घेतला जात आहे. दरम्यान, ऋषिराज सावंत हे ज्या कारमधून विमानतळाकडे गेले, त्या कारचालकाकडेही पोलिसांनी चौकशी केली आहे. त्याने ऋषिराज यांना विमानतळावर सोडल्याची माहिती पोलिसांना दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी ऋषिराज हे कोणत्या विमानाने गेले, ते कोणत्या दिशेने गेले याचाही तपास सुरू केला आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.