ताज्या बातम्यासामाजिक

लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही, यापेक्षा अधिक मदत कशी करता येईल याचाही विचार करतोय – मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस


रसिकाश्रय या संस्थेने “जीवाची मुंबई, श्रमाची आनंदवारी” या उपक्रमाअंतर्गत धुणी-भांडी करणाऱ्या महिलांची मुख्यमंत्र्यांसमवेत भेट…

मुंबई (बारामती झटका)

“लाडकी बहीण योजना ही आमच्यासाठी केवळ आर्थिक मदत नाही, तर आमच्या जगण्याचा आधार आहे”, असे धुणी-भांडी करणाऱ्या माता-भगिनींनी सांगताच “ही योजना कधीही बंद पडणार नाही!” अशी ग्वाही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी येथील धुणी-भांडी काम करणाऱ्या २० महिलांच्या भेटीप्रसंगी दिली.

रसिकाश्रय या संस्थेने “जीवाची मुंबई, श्रमाची आनंदवारी” या उपक्रमांतर्गत मुख्यमंत्र्यांची सह्याद्री अतिथीगृह येथे भेट घडविली. त्यांच्या भावना समजून घेत “लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही, यापेक्षा अधिक मदत कशी करता येईल, याचाही विचार करतोय,” असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

या भेटीत महिलांनी आणखी एक विनंती केली की, “सन्माननिधी म्हणून मिळणारे १० हजार रुपये दरवर्षी मिळावेत.” यावर मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत “शासन पातळीवर या मागणीचा विचार करू,” असे सांगितले. तसेच काही वृद्ध महिला ‘लाडकी बहीण’ योजनेसाठी पात्र नसल्याने त्यांना ‘निराधार योजने’ अंतर्गत मदत देण्याचेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले.

या महिलांसाठी ही भेट केवळ योजनांविषयी नव्हती, तर जीवनभर लक्षात राहणारा अनुभव होता. “आम्ही कधी विमान पाहिलं नव्हतं, पण आता आम्ही त्यातून प्रवासही केला. गेल्या दोन दिवसांत आम्हाला स्वर्गासारखी अनुभूती मिळाली,” असे एका महिलेने मुख्यमंत्र्यांना सांगितले.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Back to top button