सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोहेल आतार यांचे आजपासून आमरण उपोषण…

पुरंदावडे गावचे कोतवाल जावेद मणेरी नियमबाह्य पद्धतीने काम करतात व यांचा आश्रयदाता तहसीलदार सुरेश शेजूळ यांच्यावर कारवाई होण्याची मागणी…
सोलापूर (बारामती झटका)
माळशिरस येथील सोहेल रज्जाक आतार यांनी जिल्हाधिकारी सोलापूर यांना माळशिरस तहसील कार्यालयातील भोंगळ कारभाराबद्दल कारवाई करण्याबाबतचे निवेदन दिले होते. पुरंदावडे गावाचे कोतवाल जावेद मणेरी नियमबाह्य पद्धतीने काम करतात व यांचा आश्रयदाता माळशिरसचे तहसीलदार सुरेश शेजूळ आहेत. या दोघांवर जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोहेल आतार यांनी दि. १४/०२/२०२५ पासून आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे.
सदर निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की, मौजे पुरंदावडे गावाचे कोतवाल नियुक्ती वेळी पेपरमध्ये खाडाखोड करून त्यांचे गुण वाढविल्याचे आम्ही तहसीलदार यांच्या निदर्शनास आणून दिले होते, तरी पण त्यांनी सदर व्यक्तींची त्या पदावर नियमबाह्य नियुक्ती केली आहे. आम्ही मौजे पुरंदावडे गावाचे तलाठी यांच्याकडे माहिती अधिकारातून माहिती मागितली असता तेथील कोतवाल जावेद मणेरी हे त्या गावाचे रहिवासी नसून ते मी तलाठी म्हणून नियुक्त झाल्यापासून कामावर येत नाहीत, ते तहसील कार्यालयामध्ये काम करतात असे सांगण्यात आले. हा सर्व प्रकार मा. तहसीलदार सुरेश शेजूळ साहेब यांना निदर्शनास आणून दिले होते. पण सदर गंभीर विषय असून देखील त्यांनी दिलेल्या तक्रारीची कोणतीही साधी दखल देखील घेतलेली नाही. अश्या प्रकारे विनानियुक्त माणसे व कोतवाल हे पद धारण करणारी लोकं म्हणजेच मौजे पुरंदावडे येथील कोतवाल जावेद मणेरी हे नियमबाह्य पद्धतीने तहसीलदार यांच्या आश्रयाने व पाठींब्याने तहसील कार्यालयात काम करीत असून त्यांच्यावर कोणत्याही प्रकारची कार्यवाही झालेली नाही. हे नियमबाह्य पद्धतीने कामावर रुजू असलेने आणि तहसीलदार यांचा पूर्ण पाठींबा असले कारणाने तहसील कार्यालयामध्ये येणाऱ्या सर्वसामान्य लोकांचे अतोनात त्रास देवून तसेच त्यांची आर्थिक पिळवणूक करत आहेत. त्या सर्व लोकांची वारंवार तक्रार देवून देखील कोणत्याच प्रकारची कारवाई केली गेलेली नाही. म्हणून माळशिरस तालुक्यातील जनतेने तहसीलदार यांच्या मनमानी कारभाराविरुद्ध दि. २८/०१/२०२४ रोजी आमदार नितेशजी राणे साहेब व आमदार महेशजी लांडगे साहेब यांच्या नेतृत्वाखाली माळशिरस येथे मोर्चा घेतला होता. तसेच त्या संदर्भात माळशिरस पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केली होती. तेव्हा तहसीलदार यांनी आश्वासन दिले होते की, विनानियुक्त कार्यरत असणारे कोतवाल आणि तत्सम व्यक्ती यांच्यावर कार्यवाही करण्यात येईल. कारवाई केलेनंतर २ ते ३ महिन्यातच परिस्थिती पुन्हा जैसे थे च पूर्ववत झालेली आहे.
मौजे पुरंदावडे गावातील नागरिकांनी कोतवाल भरती वेळी पेपर दिलेल्या व्यक्तींना डावलून चुकीच्या पद्धतीने आमच्या गावातील रहिवासी नसलेल्या व्यक्तीची नियुक्ती केली. त्यामुळे पुरंदावडे गावातील लोकांची गैरसोय होत असल्याने गावातील रहिवासी असणाऱ्या व्यक्तीचीच नियुक्ती करावी अशी तक्रार मा. प्रांत यांच्याकडे केलेली होती. तसेच तश्या प्रकारचे ठराव ग्रामपंचायतीने दि. २६/०१/२०१४ रोजी झालेल्या ग्रामसभेत विषय नं. २ ठराव नं. ६८ तसेच दि. १५/०८/२०१७ रोजी ग्रामसभेत विषय नं. ७ ठराव नं. ३१३, दिनांक २६/०१/२०१८ विषय नं. ०३ ठराव नं. ९३ नुसार पारित केलेले आहेत.
नियम डावलून मूळ आस्थापना कोतवाल असताना देखील जावेद मणेरी हा सध्या पुरंदावडे येथे काम न करता तहसील कार्यालय माळशिरसमध्ये काम करीत असून कोणताही अधिकार नसताना देखील दुय्यम कारागृह माळशिरस येथील आरोपी नोंद रजिस्टर मध्ये सही करीत आहे. तसेच माळशिरस तहसील मधील कारागृहातील आरोपी यांचे नातेवाईक भेटीचे अर्जावरती जावेद मणेरी हा कोणताही अधिकार नसताना जेलर यांचे ऐवजी स्वतःच सही करून अनधिकृत आणि बेकायदेशीर काम करीत आहे. या संदर्भात कारागृहाचे दि. ०१ सप्टेंबर २०२४ पासून आजपर्यंतचे CCTV फुटेज तपासावे. सोबत जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूर यांची दि. ०६/१२/२०२३ रोजी सर्वसमावेशक पंचवार्षिक अंतिम जेष्ठता यादी जोडत असून त्यामध्ये जेष्ठता क्रमांक ४१० चे यादीतील नाव मणेरी जावेदखां इंनुस असे असून कर्णबधीर अशी नोंद शेरा सहित प्रसिद्ध आहे. अश्या प्रकारेचे बोगस कर्णबधीर प्रमाणपत्र काढून देणारे वैद्यकीय अधिकारी यांची चौकशी होऊन फसवणुकीचा गुन्हा नोंद व्हावा, ही विनंती.
पुरंदावडे गावाचे कोतवाल जावेद मणेरी हे कोतवाल पदी नियुक्त झालेपासून नियुक्ती ठिकाणी काम न करता तहसीलदार कार्यालय माळशिरस येथे काम करीत आहेत. त्यांनी नियुक्ती झाल्यापासून जो पगार घेतला आहे तो शासन दरबारी जमा करून घ्यावा आणि ह्यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात यावा.
तरी आपण या प्रकरणाची गांभीर्याने नोंद घेवून त्वरित योग्य ती कारवाई करावी हि नम्र विनंती.
सोबत जोडलेली कागदपत्रे –
१) ग्रामपंचायत ठराव प्रत
२) जाहीर नोटीस प्रत
३) उत्तरपत्रिका संच प्रत
४) सोलापूर जिल्ह्यातील कोतवाल संवर्गाची जा.क्र. ९८९/२०२३ दिनांक ०६/१२/२०२३ रोजीची अंतिम जेष्ठता प्रसिद्ध यादी.
५) तलाठी कार्यालय पुरंदावडे यांचेकडील माहिती अधिकारान्वये मिळालेली माहिती.
६) उपविभागीय अधिकारी यांचेकडील पुरंदावडे गावातील सरपंच यांचा तक्रारी अर्ज.
माहितीसाठी प्रत –
१. मा. मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य
२. मा. महसूल मंत्री, महाराष्ट्र राज्य
३. मा. विभागीय आयुक्त, पुणे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.