बँकेच्या मॅनेजरकडूनच तिजोरीवर डल्ला; १२२ कोटींचा अपहार

मुंबई (बारामती झटका)
बँकेच्या मॅनेजरकडूनच बँकेच्या तिजोरीवर डल्ला मारल्याची धक्कादायक घटना दादरमध्ये समोर आली आहे. न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड या बँकेच्या जनरल मॅनेजरने बँकेच्या तिजोरीतून तब्बल १२२ कोटी रुपये काढून त्याचा अपहार केल्याचे समोर आले आहे.
हितेश प्रविणचंद मेहता असे या आरोपीचे नाव असून याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखा पुढील तपास करत आहे.
याप्रकरणी देवर्षी शिशिर कुमार घोष यांनी फिर्याद दिली असून त्यात म्हटलं आहे की, “आरोपी व त्याचे साथीदार यांनी आपसात कट रचून बँकेचा जनरल मॅनेजर अँड हेड अकाउंट्स या नात्याने त्यांच्या ताब्यात असलेल्या प्रभादेवी कार्यालय व गोरेगाव कार्यालयातील तिजोरीत विश्वासाने ठेवलेल्या बँकेच्या रोख रकमेतील सुमारे १२२ कोटी रुपयांच्या रकमेचा फौजदारीपात्र न्यासभंग करून अपहार केला.”
दरम्यान, याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास आर्थिक गुन्हे विभाग, मुंबई यांच्याकडे वर्ग करण्यात आलेला आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.