महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे माजी सदस्य डॉ. अरुण अडसूळ यांच्या ‘प्रशासकाचा धर्म’ पुस्तकाचे प्रकाशन संपन्न

बारामती (बारामती झटका)
पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे सदस्य डॉ. अरुण अडसूळ लिखित ‘प्रशासकाचा धर्म’ (नीतीतत्वे, सचोटी, स्वाभाविक कल) या पुस्तकाचे प्रकाशन माजी सनदी अधिकारी आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे माजी अध्यक्ष किशोरराजे निंबाळकर यांच्या हस्ते संपन्न झाले.
प्रशासन ही केवळ अधिकार संपन्न जबाबदारी नाही तर समाज हिताच्या सेवेचा एक नवा संकल्प आहे. स्पर्धा परीक्षा UPSC/MPSC यामध्ये नव्या निर्णयानुसार या विषयाच्या समावेशाचे प्रमुख उद्दिष्ट विद्यार्थ्यांच्या मूल्य संचयातून तयार झालेला दृष्टिकोन नैतिकतेच्या निकषावर तपासणे आहे, या दृष्टीने हे पुस्तक अत्यंत महत्त्वाचे असल्याचे किशोरराजे निंबाळकर यांनी यावेळी नमूद केले. डॉ. अरुण अडसूळ यांनी पुस्तकामध्ये नैतिकतेच्या सिद्धांताची स्पष्ट मांडणी केली आहे. विविध नैतिक तत्त्वज्ञान, लोकशाही मूल्य, सामाजिक न्याय, सार्वजनिक सेवा आणि प्रशासनातील नैतिकतेवर लेखन केले आहे. याशिवाय प्रशासनातील भ्रष्टाचार, पारदर्शकता, उत्तरदायित्व इत्यादी विषयाचे तपशीलवार विश्लेषण केले आहे. यामुळेच हे पुस्तक तरुणाईच्या उज्वल भविष्यासाठी आणि समाजाच्या प्रगतीसाठी दिशादर्शक ठरेल असे किशोरराजे निंबाळकर यांनी सांगितले. या पुस्तकाची निर्मिती महाराष्ट्र प्रबोधिनी अकॅडमी बारामती व संपादन विजयराज चंदनकर (मा.कृषी अधिकारी) यांनी केली आहे.
या पुस्तकासाठी शुभेच्छा देताना सनदी अधिकारी श्री. रमेश घोलप यांनी या पुस्तकामध्ये अडसूळ सरांनी प्रशासकीय दृष्ट्या नैतिकता, सत्यनिष्ठा आणि मनुष्याच्या आचारधर्माचे महत्व यावरती विचार मांडले आहेत. नैतिकतेचे संविधानिक आणि कायदेशीर अधिकार तसेच त्याचे समाजावर होणारे परिणाम याबद्दल सरांनी साध्या आणि सोप्या भाषेत मांडणी केली असल्याचे नमूद केले.
या ठिकाणी मुंबई पोलीस उपायुक्त आनंद भोईटे यांनी या पुस्तकाविषयी मत व्यक्त करताना अडसूळ सरांनी नैतिकदृष्ट्या प्रशासकीय व्यवस्था, त्यांचे कार्य, सार्वजनिक धोरण, निर्णय घेण्याची प्रक्रिया आणि प्रशासनातील आव्हानांची सखोल चर्चा केली असल्याची सांगितले.
याप्रसंगी पुस्तकाचे लेखक डॉ. अरुण अडसूळ सर यांनी प्रशासकाने आपली भूमिका पार पाडताना अंत:प्रज्ञेचे मार्गदर्शन घेतले पाहिजे, हे सांगण्याचाच पुस्तकाचा मूळ उद्देश असल्याचे सांगितले. नागरी प्रशासनाद्वारे शासनाच्या कायदे धोरणांच्या निर्मिती प्रक्रिये बरोबरच कायदे धोरणांची लोकाभिमुख अंमलबजावणीत नैतिकता महत्त्वाचे योगदान देते. या अनुषंगाने महाराष्ट्र प्रबोधिनी अकॅडमी बारामती ग्रामीण भागातील सर्वसामान्य होतकरू विद्यार्थ्यांना त्यांच्या यशाच्या शिखरापर्यंत पोहोचवणारी अग्रगण्य संस्था म्हणून नावारूपाला आली आहे. आजपर्यंत अकॅडमी मधून 150 विद्यार्थ्यांची प्रशासनात निवड झाली आहे. त्याचाच एक भाग म्हणून स्पर्धा परीक्षाचे विचार सर्वदूर रुजवण्यासाठी संवाद स्पर्धा परीक्षार्थींशी हा उपक्रम घेऊन महाराष्ट्रातील दहा जिल्ह्यांमध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे मा. सदस्य अडसूळ सरांच्या उपस्थितीमध्ये आयोजित केले जाणार आहेत.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.