लोकप्रिय व युवकांचे आशास्थान उपनगराध्यक्ष भीमराव रेडे पाटील उर्फ पाटील नाना – बी. टी. शिवशरण

श्रीपूर (बारामती झटका)
महाळुंग श्रीपूर नगरपंचायतीचे विकासाभिमुख लोकप्रिय बहुचर्चित उपनगराध्यक्ष भीमराव रेडे पाटील उर्फ पाटील नाना यांच्या कर्तृत्वाचा आलेख उंचावत आहे. सतत नवनवीन योजना कृति आराखडा व गावाच्या भल्यासाठी अहोरात्र झटणारे तरुण तडफदार नेतृत्व म्हणून त्यांनी माळशिरस तालुक्यात आपले नेतृत्व शाबीत केलं आहे. मोहिते पाटील यांच्या घराण्यावर निस्सीम प्रेम, श्रध्दा व स्नेहाचे, आपुलकीचे नाते त्यांनी पहिल्यापासून निर्माण केलं आहे. शांत, मनमिळाऊ व करारी स्वभाव असलेल्या नानांनी महाळुंग श्रीपूर पंचक्रोशीतील अनेक तरुणांना एकत्रित करून त्यांची एकत्रित मोट बांधून ती शक्ती विकास कामांसाठी वापरण्याचा प्रयत्न केला आहे. अतिशय प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी त्यांचे सामाजिक, राजकीय नेतृत्व निर्माण केलं आहे. दलित वंचित बहुजन समाजाला त्यांचा मोठा आधार वाटतोय.
अनेक विषय, समस्या, तक्रारी सोडवण्यासाठी या भागातील अनेक अडले नडलेले नागरिक नानांकडे न्याय मिळणार या भावनेतून त्यांच्याकडे जात असतात. त्यावेळी नाना दोन्ही बाजूंच्या लोकांचं म्हणणं ऐकून दुध का दुध, पाणी का पाणी या न्यायाने ते न्यायनिवाडा करून सामाजिक समतोल साधत असतात.
सकाळी सहा पासून ते संध्याकाळी दहा वाजेपर्यंत गावाच्या भल्यासाठी, विकास कामांसाठी व सामाजिक राजकीय प्रश्न सोडवण्यासाठी तत्पर असतात. नानांचे व्यक्तीमत्व लोकप्रिय होण्यामागची अनेक कारणे असू शकतात पण, झोकून देऊन काम कसे करावे हे त्यांच्याकडून शिकले पाहिजे. मोहिते पाटील यांच्या नावाने त्यांनी उभे केलेल्या पॅनलचे पाच नगरसेवक निवडून आणले. दोन ते तीन उमेदवार थोड्या मताने पराभूत झाले. पहिला प्रयत्न असल्याने त्यांचे हे यश निश्चितच कौतुकास्पद आहे. अनेकदा असे होते की, नगरपंचायतीच्या माध्यमातून महाळुंग श्रीपूर चा विकास करत असताना त्यांना अनेक अडचणी व विरोधाला सामोरे जावे लागले आहे. अनेक लोकहिताचे निर्णय घेत असतानाही विरोधाला विरोध म्हणून चांगल्या कामांना खिळ घातली जाते पण, त्यातही नाना गावाच्या हितासाठी चार पावले मागे घ्यायची वेळ आली तरी ते तयार असतात. काही अपवादात्मक बाबी लक्षात घेतल्या तर बहुतांश वेळा जाणूनबुजून त्यांना विरोध म्हणून चांगल्या कामांना डावलण्याचे प्रकार या दोन वर्षांत पहायला मिळाले आहेत. तरीही नाना सर्वांना बरोबरीने घेऊन जाण्यासाठी धडपडत असतात.
सामाजिक, राजकीय पातळीवर विरोध हा निवडणूक असते तोपर्यंत ठीक आहे. परंतु, कायम विरोधात भुमिका असणारे काही कार्यकर्ते नेते संकुचित विचार करून मर्यादित राजकारण करत असतात. नगरपंचायत स्थापन झाल्यापासून आतापर्यंत पाच मुख्याधिकारी यांनी पदभार स्वीकारला आहे. या पाचही मुख्याधिकारी यांना गावाचे विकासासाठी नानांनी चांगली साथ दिली आहे. अनेकदा असे होते की, उठसूठ अनेकांना तक्रारी व आरोप करून विरोध करण्याची सवय झालेली आहे परंतु, कर्तव्य जबाबदारी स्वतःवर आली की अंग झटकून नामानिराळे राहणारे अनेक महाभाग आहेत.
पुर्वी म्हटले जायचे की, गाव करील ते राव करील. याचाच अर्थ असा की, गावाच्या भल्यासाठी, विकास कामांसाठी नैतिक जबाबदारी व कर्तव्य म्हणून प्रत्येकाने पुढं आलं पाहिजे. हा साधा सोपा उपाय असू शकतो. नानांकडे कोणत्याही प्रकारची जादूची कांडी नाही. सर्वांनी प्रामाणिक व निस्वार्थी भावनेने साथ दिली तर अनेक विकासकामे, योजना यशस्वी होण्यास वेळ लागणार नाही.
महाळुंग श्रीपूर नगरपंचायतीमध्ये सतरा नगरसेवक आहेत यातील दहा ते बारा नगरसेवक मोहिते पाटील यांचे नेतृत्व मानणारे आहेत. सहा नगरसेवक माजी आमदार बबनदादा शिंदे यांचं नेतृत्व मानणारे आहेत. मोहिते पाटील व बबनदादा शिंदे यांच्या विरोधातील गटबाजी व नेतृत्व एकमेकांना पाण्यात पाहतात त्यामुळे विकास कमी व गटबाजीचे राजकारण जादा अशी एकंदरीत परिस्थिती आहे. त्यामुळे अनेक वेळा नगरपंचायतीच्या माध्यमातून विकासाचे प्रश्न योजना कार्यान्वित करत असताना तांत्रिक अडचणी मुद्दे उपस्थित केले जातात. त्यामुळे बराच कालावधी होतो या सर्वांवर एकमत होण्यास अडचणींचा सामना करावा लागतो. या बाबी सोडल्या तर एकंदरीत गावांसाठी उपनगराध्यक्ष म्हणून पाटील नाना प्रामाणिक व दक्ष असतात ही वस्तुस्थिती आहे. नगरपंचायतीचे नुतन कार्यालय नुतन गावठाण तसेच गावातील अंतर्गत रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, साफसफाई, कचरा गाडी, समाजमंदिर, छत्रपती शिवाजी महाराज स्मारक ते स्मशानभूमी पर्यंत रस्ता मंजुरी या कामांसाठी नाना पहिल्यापासून आग्रही आहेत. बहुतांश कामे मार्गी लागतील. श्रीपूर मधील बंद पडलेल्या आरो प्लांट बाबत येथील नागरिकांनी नगरपंचायतीकडे वारंवार मागणी केली आहे तो प्रश्न निकडीचा आहे. या सर्व प्राप्त परिस्थितीत नगरपंचायतीचे कामकाज करत असतांनाच काही अपवादात्मक प्रसंग वगळता सर्वांना बरोबरीने घेऊन जाण्यासाठी नानांची भुमिका प्रामाणिक राहिली आहे. निवडुन दिलेल्या नेतृत्वाला सर्वांनी पाच वर्षे सर्वांनी साथ दिली तर विकासकामे, अनेक प्रलंबित योजना मार्गी लागण्यास काही अडचण येणार नाही.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.