अकलूज-यशवंतनगर प्रवास करताना पोटातील पाणी हालत नाही, अकलूजमध्ये प्रवास करताना पोटात पाणी राहत नाही सारखं ढवळतयं….

अकलूज (बारामती झटका)
अकलूज ची राजकीय पंढरी म्हणून ओळख आहे. अकलूज मधील अंतर्गत रस्त्यांची दूर्दशा झालेली आहे. रस्त्यात खड्डा की, खड्ड्यात रस्ता, अशी दयनीय अवस्था झालेली आहे. मोटरसायकल, चारचाकी वाहनधारक सोडा, सायकल वरून प्रवास करणारे सायकलस्वार नव्हेतर चालत चालणारे वाटसरू यांना सुद्धा खड्ड्यांची झळ पोहचते आहे. अकलूज-यशवंतनगर प्रवास करीत असताना पोटातील पाणी हालत नाही, मात्र, अकलूजमध्ये अंतर्गत रस्त्याने प्रवास करताना पोटात पाणी राहत नाही, सारखं ढवळतंय अशी वाहनधारक, सायकलस्वार, चालणारे वाटसरू यांची दयनीय अवस्था सुरू आहे. याकडे लोकप्रतिनिधी व अधिकारी यांची जाणीवपूर्वक डोळेझाक होत आहे. त्यामुळे अकलूज पंचक्रोशीतील स्थानिक नागरिक, व्यापारी व बाहेरून येणाऱ्या नागरिकांमध्ये उलटसुलट चर्चा सुरू आहे.

अकलूज येथे सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता कार्यालय व तीन उप अभियंता कार्यालय आहेत. उपविभागीय प्रांत कार्यालय, उपविभागीय पोलीस कार्यालय, मार्केट कमिटी, खरेदी विक्री संघ, सहाय्यक निबंध कार्यालय, महावितरण कार्यकारी कार्यालय, दुय्यम निबंधक कार्यालय, पोलीस स्टेशन अशी अनेक कार्यालये आहेत.
शासकीय कामामुळे व अकलूज व्यापार पेठ असल्याने खरेदी विक्रीसाठी आसपासच्या गावातील जनतेचा दैनंदिन संपर्क येतो. अकलूज अंतर्गत रस्त्याची दयनीय अवस्था झालेली आहे. खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डा अशी बिकट अवस्था होऊन नागरिकांना प्रचंड त्रास होत आहे. खड्डे चुकवित असताना जीवित्व वित्तहानी होत आहे. वाहनांची मोडतोड होत आहे. याकडे प्रशासन व लोकप्रतिनिधी यांची लक्ष देण्याची मानसिकता नाही.
अकलूज शहरातील मुख्य रस्ता व बायपास रस्ता वगळता अंतर्गत रस्त्याची अक्षरशा चाळण झालेली आहे. अकलूज ग्रामपंचायतीचे नगर परिषदेमध्ये रूपांतर झालेले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडील रस्ते नगर परिषदेकडे वर्ग झालेले आहेत. काही रस्ते झालेले नाहीत, त्यामुळे नागरिकांनी तक्रार करायची कोणाकडे आई जेवू देईना आणि बाप भीक मागू देईना, अशी अवस्था नागरिकांची झालेली आहे. नगरपरिषद व सार्वजनिक बांधकाम विभाग उडवा उडवीची उत्तरे देत आहेत. आमच्याकडे वर्ग झालेला नाही, त्यांच्याकडे आहे त्यांनी सांगायचे अजून आमच्याकडे वर्ग झालेला नाही. सुज्ञ नागरिकांची अवस्था रस्त्याविषयी विचारणा करण्याकरिता गेल्यानंतर फुटबॉल सारखी इकडून तिकडे केली जात आहे. लोकप्रतिनिधींकडून तोंड दाबून बुक्क्याचा मार आहे की काय, अशी धारणा झालेली आहे. निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये स्थानिक नागरिक वेगळा विचार करण्याच्या मानसिकतेमध्ये आहेत, अशी अकलूज पंचक्रोशीत चर्चा सुरू आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.