रामचंद्र जगताप यांना सातारा जिल्हा परिषदेचा विशेष पुरस्कार

अंकोली (बारामती झटका) दशरथ रणदिवे यांजकडून
मोहोळ तालुक्यातील शेज बाभूळगाव चे सुपुत्र व सध्या सातारा जिल्ह्यात कार्यरत असणारे प्राथमिक शिक्षक रामचंद्र सूर्यभान जगताप यांना सातारा जिल्हा परिषदेचा जिल्हा विशेष पुरस्कार नुकताच जाहीर झाला आहे. शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या शिक्षकांना दरवर्षी शिक्षक दिनानिमित्त जिल्हा परिषदेच्या वतीने आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरवण्यात येते. यंदाचा हा पुरस्कार जगताप यांना देण्यात येणार आहे. यंदा प्रथमच पुरस्काराची प्रक्रिया ऑनलाइन झाल्याने दर वर्षी पुरस्कार मिळण्यासाठी होणाऱ्या वशिलेबाजीपणा व राजकीय हस्तक्षेपाला चाप बसल्याचे जगताप यांनी सांगितले.
रामचंद्र सुर्यभान जगताप हे शेज बाभुळगाव (ता. मोहोळ) येथील रहिवाशी असून सध्या ते सातारा जिल्हा परिषदेच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, डेळेवाडी, ता. कराड येथे उपशिक्षक पदावर कार्यरत आहेत. त्यांनी केलेल्या आजपर्यंतच्या क्रिडा, कला व कार्यानुभव क्षेत्रातील अतुलनीय कार्याबरोबरच गुणवत्तेतील उठावदार कामगिरीचा गौरव म्हणून त्यांना यंदाचा सातारा जिल्हा परिषदेचा जिल्हयातून एक असा विशेष पुरस्कार जाहीर झाला आहे.
त्यांचे प्राथमिक शिक्षण जि. प. शाळा शेज बाभुळगाव (ता. मोहोळ), माध्यमिक शिक्षण भैरवनाथ विद्यालय अंकोली, उच्च माध्यमिक शिक्षण नेताजी जुनियर कॉलेज मोहोळ येथे तर डीएडचे शिक्षण शंकरराव निंबाळकर अध्यापक विद्यालय बार्शी येथे झालेले आहे. त्यानंतरचे पदव्युत्तर शिक्षण हे त्यांनी मुक्त विद्यापीठातून पूर्ण केलेले आहे. सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे यांच्यामार्फत घेण्यात येणारी सहाय्यक प्राध्यापक पात्रता परीक्षा देखील ते पात्र झालेले आहेत .
आतापर्यंत त्यांनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भैरवाडी (ता. पाटण), जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मायणी मुले, (ता. खटाव) या ठिकाणी सेवा बजावली आहे. तसेच ते आता जिल्हा परिषद प्राथमिक शाळा डेळेवाडी (ता. कराड) येथे कार्यरत आहेत. त्यांना आतापर्यंत खटाव तालुका आदर्श शिक्षक पुरस्कार, ग्लोबल टिचर रोल मॉडेल अवॉर्ड असे पुरस्कार देखील मिळाले आहेत. तसेच त्यांनी ब्रिजकोर्स अभ्यासक्रम निर्मितीत राज्यस्तरीय समितीमध्ये देखील काम केले आहे. त्याचबरोबर विविध साहित्य स्पर्धांमध्ये त्यांना डायट फलटण यांचेकडून गौरविण्यात आले आहे. आतापर्यंत विद्यार्थ्यांसाठी तळमळीने केलेल्या प्रामाणिक कामाचे फळ मिळाले आहे.
रामचंद्र जगताप यांना सातारा जिल्हा विशेष पुरस्कार जाहीर झाल्यामुळे शेजबाभुळगाव तसेच संपूर्ण अंकोली पंचक्रोशीतून त्यांच्यावर कौतुकाचा व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.