महाराष्ट्रातील ‘या’ भागात तयार होणार पहिला १४ पदरी महामार्ग !

कोणकोणत्या जिल्ह्यांमधून जाणार नवा Expressway ?
मुंबई (बारामती झटका)
एकीकडे समृद्धी महामार्गाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे तर दुसरीकडे राज्यातील जनतेसाठी आणखी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. महाराष्ट्रातील जनतेला आगामी काळात १४ पदरी महामार्गाची भेट मिळणार असून हा रस्ता राज्यातील काही प्रमुख जिल्ह्यांमधून जाणार आहे.
गेल्या काही वर्षांमध्ये महाराष्ट्रात हजारो किलोमीटर लांबीचे महामार्ग विकसित करण्यात आले आहेत. यामुळे राज्यातील रस्त्यांचे नेटवर्क फारच मजबूत झाले आहे. खरे तर, कोणत्याही देशाच्या विकासात तेथील रस्ते आणि रेल्वेचे नेटवर्क महत्त्वाची भूमिका निभावत असते. अशातच, आता राज्यातील जनतेसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे ते म्हणजे महाराष्ट्राला लवकरच एक १४ पदरी महामार्गाची भेट मिळणार आहे.
वास्तविक, मुंबई ते नागपूर दरम्यान विकसित होणाऱ्या समृद्धी महामार्गाचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. ७०१ किलोमीटर लांबीच्या सहापदरी समृद्धी महामार्गापैकी ६२५ किमी. लांबीचा मार्ग सध्या वाहतुकीसाठी सुरू असून उर्वरित ७६ किलोमीटर लांबीचा मार्ग देखील लवकरच वाहतुकीसाठी सुरू केला जाणार आहे.
समृद्धी महामार्गाचा पहिला टप्पा म्हणजेच नागपूर ते शिर्डी हा ५२० किलोमीटर लांबीचा टप्पा डिसेंबर २०२२ मध्ये सुरू झाला, त्यानंतर शिर्डी ते भरवीर हा ८० किमी लांबीचा टप्पा २०२३ मध्ये सुरू करण्यात आला आणि पुढे २०२४ मध्ये भरवीर ते इगतपुरी हा २५ किलोमीटर लांबीचा टप्पा सुरू झाला. आता लवकरच इगतपुरी ते आमने हा शेवटचा टप्पा वाहतुकीसाठी सुरू होणार असल्याची माहिती समोर आली असून याचे लोकार्पण स्वतः पंतप्रधान मोदी करतील अशी आशा आहे.
खरंतर या शेवटच्या टप्प्याचे लोकार्पण २ मे रोजी होईल अशी आशा होती मात्र, तसे काही घडले नाही. यामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजीचे वातावरण पाहायला मिळत आहे. अशातच आता राज्याला एका नव्या महामार्गाची भेट मिळणार असल्याचे वृत्त हाती आले असून हा नवा महामार्ग नेमका कसा राहील ? याच संदर्भातील सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.
कसा असणार नवा महामार्ग ?
मिळालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्राला मिळणारा हा नवा 14 पदरी महामार्ग मुंबई ते बेंगलोर दरम्यान विकसित होणार आहे. या महामार्गाची लांबी देखील समृद्धी महामार्ग एवढीच राहील असे बोलले जात आहे. मुंबई-बेंगलोर नव्या महामार्गाची लांबी ७०० किलोमीटर इतकी असेल आणि हा एक १४ पदरी महामार्ग राहणार आहे.
हा राज्यातील पहिलाच १४ पदरी महामार्ग असेल अशीही माहिती काही तज्ञांकडून समोर आली आहे. या महामार्गाबाबत बोलायचं झालं तर हा महामार्ग मुंबई येथील अटल सेतूपासून सुरू होणार आणि पुढे पुण्यातील रिंग रोडला जोडला जाणार आहे. हा एक ग्रीन फील्ड एक्सप्रेस वे राहणार आहे, त्यामुळे प्रवासाचा कालावधी निम्म्याने कमी होईल अशी सुद्धा माहिती देण्यात आली आहे.
किती खर्च होणार?
केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांनी सांगितल्याप्रमाणे मुंबई-बेंगलोर ग्रीन फील्ड एक्सप्रेस वे चे काम पूर्ण झाल्यानंतर मुंबई ते बेंगलोर हा प्रवास अवघ्या सात ते आठ तासांमध्ये पूर्ण होण्याची शक्यता आहे. सध्या मुंबई ते बेंगलोर या दरम्यानचा प्रवास करायचा झाल्यास प्रवाशांना तब्बल 16 तासांचा कालावधी लागतोय.
मात्र, जेव्हा हा महामार्ग पूर्णपणे बांधून तयार होईल तेव्हा हा प्रवासाचा कालावधी निम्म्यावर येईल अशी माहिती तज्ञांकडून देण्यात आली असून या नव्या महामार्ग प्रकल्पामुळे मुंबई ते बेंगलोर दरम्यान चा प्रवास फारच वेगवान होणार आहे. या महामार्ग प्रकल्पाच्या खर्चाबाबत बोलायचं झालं तर या प्रकल्पासाठी जवळपास 40,000 कोटी रुपयांचा खर्च केला जाणार आहे.
हा महामार्ग महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली या तीन महत्त्वाच्या जिल्ह्यांमधून जाणार आहे आणि हा मार्ग कर्नाटकातील नऊ जिल्ह्यांना जोडणार आहे. यामध्ये बेलगावी, बागलकोट, दावणगेरे, विजयनगर आणि तुमाकुरूसारख्या जिल्ह्यांचा समावेश राहणार अशी माहिती देण्यात आली आहे.
महामार्गाशी संबंधित अधिकाऱ्याने सांगितल्याप्रमाणे हा मार्ग महाराष्ट्र आणि कर्नाटक मधून जाणार आहे. हा मार्ग या संबंधित भागातील लॉजिस्टिक्स, व्यापार आणि पर्यटनाला चालना देणारा राहणार आहे. या महामार्गावर 55 फ्लायओव्हर, 22 इंटरचेंज आणि 2 इमर्जन्सी एअर स्ट्रिप्स असतील अशी माहिती देण्यात आली आहे.
या महामार्ग प्रकल्पाचे सर्वात मोठे विशेषता म्हणजे हा नवा एक्सप्रेस वे राज्यातील १० प्रमुख नद्या पार करणार आहे. म्हणजेच मुंबई ते बेंगलोर दरम्यान प्रवास करताना प्रवाशांना प्रवासादरम्यान निसर्गसौंदर्याचाही अनुभव घेता येणार आहे. या रस्त्याच्या कामाबाबत बोलायचं झालं तर हा मार्ग २०२८ पर्यंत खुला होईल अशी माहिती देण्यात आली आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.