रोहित पवारांना रामराजेंची वकिली करण्याची गरज नाही, जयकुमार गोरेंचा टोला

सातारा (बारामती झटका)
रामराजे यांच्या नावातच फक्त राम आहे मात्र, त्यांचे काम शकुनीसारखे आहे. मला रोहित पवारांची किव येते ते रावणालाही राम म्हणतात. रोहित पवारांना यांची वकिली करायची गरज काय, असा सवाल ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी आज केला. सांगोला येथे भाजपचे नूतन जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार आणि शशिकांत चव्हाण यांचे पदग्रहण सोहळ्यासाठी आले असता ना. गोरे बोलत होते. या कार्यक्रमासाठी आमदार चित्रा वाघ, माजी खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर, माजी आमदार राजेंद्र राऊत आणि मा. आ. राम सातपुते उपस्थित होते.
आजच आमदार रोहित पवार यांनी जयकुमार गोरे यांच्यासाठी ट्विट करत, सत्तेचा दुरुपयोग करीत तुम्ही रामराजेंना अडकवण्याचा प्रयत्न करीत आहात. कायम सत्ता तुमची नसेल याची जाणीव ठेवा आणि सत्ता बदल झाल्यावर काय होईल याची कल्पना करा, अशा पद्धतीचे ट्विट केले होते. याला उत्तर देताना जयकुमार गोरे यांनी सडकून टोले लगावले.
आम्ही कधीच तपासणी यंत्रणेत हस्तक्षेप करीत नसून तपास यंत्रणा त्यांचे काम चोख बजावत आहे. यामध्ये जे फोन कॉल आहेत त्यात तो आवाज माझा नाही, मी फोनवर बोललो नाही, माझी काही चूक नाही असे ज्यांच्यावर आरोप आहेत त्या रामराजेंनी सांगावे ना ?, असा सवाल करीत रोहित पवार कशाला वकिली करतात, रोहित पवारांनी त्यांचे स्वतःचे पहावे असा टोला लगावला.
सत्तेचा आम्हाला शिकवू नका, आम्ही जो संघर्ष केलाय तो सत्तेच्या विरोधात केला आहे. इतकी वर्ष आम्ही तुम्ही केलेल्या षडयंत्राचे दुःख भोगले आहे, सोसले आहे, आणि त्या संकटांच्या मालिकेच्या छाताडावर पाय ठेवून आम्ही इथे पोचले आहोत. त्यामुळे तुम्ही संघर्षाचे व सत्तेचे शहाणपण मला शिकवू नका. सर्व पुराव्यांचा तपास सुरू असून लवकरच समोर येईल. येत्या काळात अनेक घडामोडी घडणार असून आज रोहित पवार उन्हात असले तरी लवकरच मांडवात येतील, त्यामुळे त्यांनी या सत्तेच्या सोज्वळ गप्पा आमच्याशी मारू नयेत आणि सत्ता आहे नाही याच्या धमक्या आम्हाला देऊ नये, असा टोला जयकुमार गोरे यांनी लगावला.
कोणी कोणी कॉल केले, कोण कोण प्लॅनिंगमध्ये होते, कोणी कॉल करायला सांगितले, या सर्व गोष्टी तपासात उघड होणार असून मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे यामध्ये कोणी कितीही मोठा असला तरी त्याच्यावर कारवाई होणार आहे. त्यामुळे मी तपासाबाबत अधिक बोलणार नाही, असेही ना. जयकुमार गोरे यांनी सांगितले.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



