विठ्ठलाच्या दारी निघाली… बाल चिमुकल्यांची वारी..!

अकलूज (बारामती झटका)
टाळ मृदंगाचा निनाद… विठ्ठल विठ्ठल नामाचा गजर… ज्ञानोबा तुकाराम नामघोषाने किडझी स्कूलमधील लहान मुलांनी दिंडी पालखी सोहळ्यात उत्साहाने भाग घेतला होता. त्यामुळे शाळेचा परिसर भक्तीमय वातावरणाने फुलून गेला होता.
किडझी स्कूलचे संस्था व्यवस्थापक मनिष गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली या दिंडी पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या पालखी सोहळ्यात लहान चिमुकल्या मुलांनी विठ्ठल-रूक्मिणी, विविध संतांची वेशभूषा करून पालखी सोहळ्यात सहभागी होऊन या कार्यक्रमाला एक वेगळीच रंगत आणली होती. त्यामुळे शाळेचा परिसर पांडुरंगाच्या नामघोषाने भक्तीमय झाला होता. सदर कार्यक्रमाच्या सुरुवातीला किडझी स्कूल अकलूज सेंटरच्या सहायक व्यवस्थापक सौ. पल्लवी गायकवाड व प्रिन्सीपल सौ. सुषमा देशपांडे यांच्या हस्ते पालखीचे विधीवत पुजन करण्यात आले. त्यानंतर शाळेच्या परिसरात दिंडी काढण्यात आली होती व गोल रिंगण सोहळ्याने या पालखी सोहळ्याची सांगता झाली. प्रशालेचे सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी सोहळ्याचे नियोजन व्यवस्थितरित्या पार पाडले.

मुलांना लहान वयातच शालेय शिक्षणाबरोबरच अध्यात्मिक ज्ञान मिळावे. आपल्या हिंदु संस्कृतीतील सण समारंभाची माहिती मिळावी. त्याचबरोबर संतांची माहिती मिळावी यासाठी दिंडी पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. आजची ही लहान मुले देशाचे भवितव्य घडवणार आहेत. त्यामुळे त्यांना लहान वयातच चांगले संस्कार व भवितव्य घडविण्याचे काम आमची शाळा करत असते. – सौ.पल्लवी गायकवाड सहाय्यक व्यवस्थापक, किडझी स्कूल अकलूज.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



