उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या पुढाकाराने बारामती येथे ‘वैद्यकीय मदत कक्ष’ सुरु

बारामती (बारामती झटका)
उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार यांच्या निर्देशानुसार बारामती तालुक्यातील नागरिकांना तातडीने आणि दर्जेदार आरोग्यसेवा मिळण्याकरिता वैद्यकीय मदत कक्ष सुरु करण्यात आला आहे.
उपमुख्यमंत्री श्री. पवार यांच्या नेतृत्वाखाली पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय, मेडद, १०० खाटांचे आरोग्य पथक मौजे सोमेश्वरनगर (वाघळवाडी) यांची स्थापना अशा विविध माध्यमातून बारामती तालुक्यातील नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा मिळण्याकरिता प्रयत्न करण्यात येत आहे.
वैद्यकीय मदत कक्ष, पहिला मजला, कृषी भवन, नवीन प्रशासकीय भवन, बारामती येथे स्थापन करण्यात आला आहे. या कक्षामुळे नागरिकांना त्यांच्या भागातच आरोग्य विषयक अडचणीबाबत मार्गदर्शन मिळणार आहे. परिणामी आरोग्यविषयक मदत किंवा मार्गदर्शनाकरिता मुंबई येथे जाण्या-येण्याचा वेळ वाचण्यासोबतच त्यांची आर्थिक बचतही होणार आहे.
नागरिकांनी आरोग्याबाबत कोणतीही वैद्यकीय अडचण, मदत किंवा मार्गदर्शनाची आवश्यकता भासल्यास उपमुख्यमंत्री यांचे स्वीय सहायक नितीन हाटे यांच्या ९८१९६३८९०८, ७९७७४७७३८२ या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात येत आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



