बा… विठ्ठला, या सरकारला शेतकरी कर्जमाफी व शक्तिपीठ रद्द करण्याची सदबुद्धी दे नाहीतर, आम्हाला तरी यांच्या विरोधात लढण्याचे बळ दे…. राजु शेट्टी यांचे विठ्ठलाला साकडे

पंढरपूर (बारामती झटका)
राज्यातील शेतकऱ्यांची संपुर्ण कर्जमुक्ती करावी व राज्यातील जनतेवर अन्यायकारक असणारा शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याची सदबुध्दी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना सुचावी. यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी व विधीमंडळातील गटनेते आमदार सतेज पाटील, खासदार प्रणिती शिंदे यांनी पंढरपूर येथील महाराष्ट्रातील गोरगरीब व कष्टकरी जनतेचे आराध्य दैवत पांडूरंगास साकडे घातले.
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ६ जुलै रोजी पंढरपूर येथे पांडुरंगाची सपत्नीक शासकीय पूजा करणार आहेत. या पुजेच्या आधी मुख्यमंत्र्यांनी विधानसभा निवडणुकीत दिलेला राज्यातील शेतकऱ्यांचा सात बारा कोरा करून संपुर्ण कर्जमुक्तीच्या निर्णयाची तातडीने अंमलबजावणी करावी. तसेच राज्यातील जनतेवर व शेतकऱ्यांवर अन्यायकारी ठरणारा शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याची सुबुध्दी सुचावी या मागणीसाठी पंढरपूरात आज शेतकऱ्यांनी मोठी गर्दी केली होती.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चौकातून सर्व शेतकरी एकत्रित येत विठ्ठल मंदिरासमोरील नामदेव पायरीवर पांडुरंगास अभिषेक घालून साकडे घालण्यात आले. राज्य सरकारला जर शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यास व शक्तीपीठ रद्द करण्याची सुबुद्दी सुचली नाही तर, या सरकारच्या विरोधात लढण्याची ताकद देण्याचे साकडे घालण्यात आले.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



