पतिव्रतेच्या गळ्यात धोंड्याची माळ तर वेश्येच्या गळ्यात मोहन माळ, असे शिक्षण संस्था चालकांची रणनीती..

शासनाचे “पवित्र पोर्टल” भ्रष्ट शिक्षण सम्राटांनी “अपवित्र पोर्टल” केले कोट्यावधी रुपयाची माया जमा करण्याचा कुटील डाव आखला जातोय…
माळशिरस (बारामती झटका)
शासनाने शिक्षण क्षेत्रात गुणवत्ता व विद्वत्ता असणाऱ्या व्यक्तींना शिक्षण संस्थेमध्ये काम करण्याची संधी मिळावी या उदात्त हेतूने “पवित्र पोर्टल” माध्यमातून शिक्षण विभागातील भरतीची सुवर्णसंधी सुशिक्षित व उच्चशिक्षित व्यक्तींना उपलब्ध करून दिलेली आहे. मात्र, शासनाचे “पवित्र पोर्टल” भ्रष्ट शिक्षण सम्राटांनी अपवित्र करून कोट्यावधी रुपयाची बेकायदेशीर माया जमा करण्याचा कुटील डाव आखला जातोय. याकडे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, शालेय शिक्षण मंत्री दादाराम भुसे, महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास व पंचायत राजमंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार जयकुमार गोरे यांनी या गोष्टीकडे गांभीर्याने लक्ष देऊन भ्रष्ट शिक्षण संस्थेतील नोकर भरतीची इडीमार्फत चौकशी करावी, अशी पिडीत लोकांकडून मागणी होत आहे. अनेक वर्ष संस्थेत कमी पगारावर काम करून सुद्धा जास्त पैसे देणाऱ्या व्यक्तीला संस्थेमध्ये नोकरी देण्याचे काम सुरू असल्याने पतिव्रतेच्या गळ्यात धोंड्याची माळ तर वेश्येच्या गळ्यात मोहन माळ असे शिक्षण संस्था चालकांची रणनीती असल्याची शिक्षण क्षेत्रामध्ये दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे.
शिक्षण संस्थेत 100 च्या वर जागा आहेत. त्यामधील महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातील उमेदवार आहेत. शासनाने एका ठिकाणच्या जागेवर दहा उमेदवार असल्याने रस्सीखेच सुरू आहे. नोकरीसाठी आलेल्या उमेदवारांची मुलाखत संस्थेचे पदाधिकारी व सचिव यांच्यासमोर होत आहे. बंद खोलीमध्ये जात असताना मोबाईल व इतर उपकरणे काढून घेतली जातात. बंद खोलीमध्ये गुणवत्ता विचारली जात नाही, तुम्ही किती लाख देणार याचाच विचार केला जातो. तालुक्यातील उमेदवारांना वीस लाखांची मर्यादा मात्र तालुक्याबाहेर 30-35 लाखांवर आकडा चालला आहे. 30 ते 35 कोटी रुपयांची आर्थिक माया गोळा होणार आहे.

पवित्र पोर्टल कडे शासनाने वेगळा पवित्रा घेऊन पाहण्याची गरज आहे. पवित्र पोर्टलमध्ये एकच उमेदवार देऊन सदर होणारी आर्थिक पिळवणूक थांबवावी अशी त्रस्त लोकांकडून मागणी होत आहे. गोरगरीब विद्यार्थ्यांनी वीस लाख रुपये कुठून आणायचे, असा प्रश्न गुणवत्ता असलेल्या लोकांसमोर उभा राहत आहे. मात्र, गुणवत्ता नाही पण लक्ष्मी आहे अशांना पवित्र पोर्टलमध्ये भ्रष्ट शिक्षण सम्राटांच्या कुटील डावामुळे पवित्र पोर्टल कडून संधी मिळणार आहे. यासाठी शिक्षण मंत्री, शिक्षण सचिव, शिक्षण संचालक यांनी पवित्र पोर्टल मध्ये भरती होणाऱ्या सर्वांची कसून चौकशी करून संस्थेचे अध्यक्ष सचिव यांची नार्को टेस्ट करावी, अशी त्रस्त लोकांच्याकडून मागणी होत आहे. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, शालेय शिक्षण मंत्री दादाराव भुसे, पालकमंत्री नामदार जयकुमार गोरे या बेकायदेशीर गोष्टींकडे लक्ष देतील, असा विश्वास त्रस्त जनतेतून व्यक्त केला जात आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



