सायबर चोरट्यांनी चौघांना ८२ लाखांचा घातला गंडा

पुणे (बारामती झटका)
शेअर ट्रेडींग, टास्क फ्रॉड आणि क्रेडीट कार्डच्या बहाण्याने सायबर चोरट्यांनी चौघांना ८२ लाख ३५ हजार रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला आहे. याप्रकरणी, स्थानिक पोलिस ठाण्यात माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार फसवणुकीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
आंबेगाव बुद्रुक येथील एका व्यक्तीची सायबर चोरट्यांनी शेअर मार्केटमधील गुंतवणुकीवर चांगला परतावा देण्याच्या बहाण्याने १३ लाख १९ हजारांची फसवणूक केली.
याप्रकरणी, संबंधीत व्यक्तीने शुक्रवारी (दि. १८) दिलेल्या फिर्यादीनुसार, आंबेगाव पोलिसांनी जयकुमार वर्मा, आकांक्षा दुबे, मोबाईलधारक, इतर बँकधारक यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला.
सायबर चोरांनी वेगवेगळ्या नावाने फिर्यादींशी संपर्क साधत, व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून ट्रेडिंगच्या माध्यमातून जादा परतावा देण्याचे आमिष त्यांना दाखवले. या आमिषाला बळी पडत फिर्यादींनी २३ लाख १९ हजार रुपयांची गुंतवणूक केली. त्यांना सुरूवातीला किरकोळ स्वरूपात परतावा मिळाला. मात्र, त्यानंतर कोणताही परतावा अथवा मूळ रक्कम परत न मिळाल्याने त्यांनी पोलिसांकडे जात तक्रार दिली.
दुसऱ्या घटनेत, वारजे येथील एका नागरिकाने वारजे माळवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद नोंदवली आहे. हा प्रकार ११ नोव्हेंबर ते २१ डिसेंबर २०२४ या कालावधीत सायबर चोरांनी व्हॉट्सअप ग्रुपद्वारे संपर्क साधून शेअर मार्केटमध्ये जास्तीचा परतावा देण्याचे आमिष फिर्यादींना दाखवले, या आमिषाला बळी पडून त्याने २३ लाख ४० हजार रुपयांची गुंतवणूक केली. त्यानंतर फिर्यादींना कोणताही परतावा अथवा मूळ रक्कम न मिळाल्याने त्यांनी वारजे माळवाडी पोलिस ठाण्यात तक्रार दिली.
तिसऱ्या घटनेत, वडगाव शेरी येथील एकाने चंदनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांना सायबर चोरांनी ७ ते ९ जुलै २०२५ दरम्यान मेसेज पाठवून रिव्ह्यू टास्कच्या माध्यमातून चांगला परतावा देण्याचे आमिष दाखवले. त्यामुळे, फिर्यादीने २० लाख ७८ हजार रुपयांची गुंतवणूक केली. मात्र, त्यांना कोणताही परतावा देण्यात आला नाही. तसेच, मूळ रक्कमही देण्यात आली नाही.

तसेच चौथ्या घटनेत, लोहगाव येथील एका व्यक्तीला नामांकित क्रेडिट कार्ड डिपार्टमेंटमधून बोलत असल्याची बतावणी करत कुणाल नावाच्या व्यक्तीने कार्डचा पीन नंबर विचारला. फिर्यादींनी पीन क्रमांक देताच त्यांच्या केडीट कार्डवरून आठ लाख रुपये काढून फसवणूक केली, विमानतळ पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



