“चर्चा तर होणारच” तुका म्हणे येथे पाहिजे जातीचे, येथे येड्या गबाळ्याचे काम नाही….

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी वस्तीगृह अकलूजच्या प्रलंबित प्रश्नाचा आशेचा किरण श्रीराम बंगला येथे आंबेडकरी चळवळीतील नेते व कार्यकर्त्यांना पहावयाला मिळाला….
माळशिरस (बारामती झटका)
“तुका म्हणे येथे पाहिजे जातीचे, येथे येड्या गबाळ्याचे काम नाही”, जगद्गुरु संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज यांच्या वाक्याचा प्रत्यय माळशिरस तालुक्यातील गोरगरीब व सर्वसामान्य आंबेडकरी जनतेला आलेला आहे. महाराष्ट्र राज्याचे सामाजिक न्यायमंत्री नामदार संजयजी शिरसाट यांच्या उपस्थितीत भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार माजी आमदार राम सातपुते यांच्या मांडवे येथील श्रीराम निवासस्थानी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर वस्तीगृह अकलूज प्रलंबित प्रश्नाचा आशेचा किरण श्रीराम बंगला येथे आंबेडकरी चळवळीतील नेते व कार्यकर्त्यांना पहावयाला मिळालेला आहे.
महाराष्ट्र राज्याचे सामाजिक न्यायमंत्री ना. संजयजी शिरसाट माळशिरस तालुक्याच्या दौऱ्यावर श्रीराम निवासस्थानी आले असता रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट माळशिरस तालुक्याच्या वतीने विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. याप्रसंगी अकलूज येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर वस्तीगृहासाठी जागा उपलब्ध करून सुसज्ज इमारत उभी करावी, या विषयासाठी माजी आमदार राम सातपुते यांच्या प्रयत्नामुळे मंत्रिमहोदयांनी वस्तीगृहाचा प्रस्ताव तत्काळ सादर करा, असा आदेश करून निवेदनावर तात्काळ सही करून उपस्थित असणाऱ्या समाज कल्याण आयुक्त सुलोचना सोनवणे मॅडम यांना जागेवर लेखी सूचना केल्या.

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया यांनी दिलेल्या निवेदनामध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी वस्तीगृह दलित आदिवासींवर होणारे अन्याय अत्याचाराचे प्रमाण कमी होण्यासाठी एससी, एसटी अत्याचार प्रबंधक कायद्याची कठोर अंमलबजावणी करावी, शेतकऱ्यांचे कर्ज माफ करावे तसेच महात्मा फुले आर्थिक विकास महामंडळासह सर्वच मागासवर्गीय महामंडळाची कर्ज माफ करावीत, सामाजिक कार्यकर्त्यांना विशेष कार्यकारी अधिकारी पदी नेमणूक देणार असल्याबाबतचा महाराष्ट्र शासनाच्या आदेशाची अंमलबजावणी करावी, मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शैक्षणिक मॅट्रिकोत्तर व महाविद्यालय शिष्यवृत्ती वेळेत द्यावी, दलित आदिवासी समाजाच्या सामाजिक उत्थानासाठी असलेला निधी इतरत्र वळवू नये, यासाठी बजेटचा कायदा करावा, वेळापूर गाव पालखी मार्ग महामार्गावरील असल्याने या ठिकाणी सुसज्ज बस स्थानक करावे, वेळापूर प्राथमिक आरोग्य केंद्राचे ग्रामीण रुग्णालयमध्ये रूपांतर करावे, वेळापूर पोलीस स्टेशन साठी पोलीस वसाहत करावी, लंपी आजारामुळे मृत पावलेल्या गाईंना पूर्वीप्रमाणे अनुदान मिळावे, बाधित जनावरांवरती मोफत उपचार करावेत, इत्यादी मागण्यांचे निवेदन मंत्री महोदय शिरसाट यांना देण्यात आले.
मा.आ. राम सातपुते, जिल्हाध्यक्ष सोमनाथ भोसले, पश्चिम महाराष्ट्र संघटक एस. एम. गायकवाड, युवक आघाडी राज्य उपाध्यक्ष किरण धाईंजे, तालुकाध्यक्ष मिलिंद सरतापे, युवक तालुका अध्यक्ष दशरथ नवगिरे, सरचिटणीस प्रवीण साळवे, तालुका कोषाध्यक्ष समीर सोरटे, तालुका उपाध्यक्ष संतोष कांबळे, तालुका उपाध्यक्ष दिलीप सरतापे, तालुका सचिव दादासाहेब सरतापे, युवक कार्याध्यक्ष विनोद रणदिवे, गौतम वाघंबरे, प्रशांत साळवे आदी उपस्थित होते.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी वस्तीगृह अकलूज येथे अनेक वर्षापासून सुरू आहे. तालुक्यातील लोकप्रतिनिधी यांनी जाणीवपूर्वक भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी वस्तीगृहाला जागा उपलब्ध व भव्य इमारत होऊ दिली नाही. यासाठी आंबेडकरी चळवळीतील नेते व कार्यकर्त्यांनी अनेक वेळा मोर्चे, आंदोलने, निवेदने दिलेली होती. पत्रकार बांधवांनीसुद्धा वेळोवेळी समाज माध्यमातून आवाज उठवलेला होता. जेष्ठ पत्रकार ॲड. अविनाश काळे, गौतम भंडारे, नागेश लोंढे यांनी भर पावसात आंदोलन केलेले होते. सततचा पाठपुरावा गोरगरीब व सर्वसामान्य जनतेच्या मुलांना शिक्षण व राहण्यासाठी आपल्या हक्काची इमारत व्हावी यासाठी संघर्ष होता. माळशिरस विधानसभा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव झाल्यानंतर अनुसूचित जातीच्या समाजाच्या अपेक्षा उंचावलेल्या होत्या मात्र, लोकप्रतिनिधींची इच्छा असताना सुद्धा त्यांना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी वस्तीगृहासाठी काही करता आले नाही.
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गटाच्या तीव्र इच्छाशक्ती व भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार माजी आमदार राम सातपुते यांचा सततचा पाठपुरावा सुरू होता. कोणत्याही गोष्टीला योगायोगच लागतो. समाज कल्याण मंत्री पहिल्यांदाच माळशिरस तालुक्याच्या दौऱ्यावर आलेले होते. त्यावेळेस प्रथमच माजी आमदार राम सातपुते यांच्या श्रीराम बंगला निवासस्थानी सदिच्छा भेट दिलेली होती. त्यावेळेला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे पदाधिकारी यांनी निवेदन दिले. भाषणामध्ये माजी आमदार राम सातपुते यांनी सदरचा मुद्दा उचलून धरलेला होता. सामाजिक न्याय मंत्री ना. संजयजी शिरसाट यांनी तात्काळ मागणी मान्य करून उपस्थित असणाऱ्या समाज कल्याण आयुक्त सुलोचना सोनवणे यांना सूचना करून दहा कोटी रुपये विद्यार्थ्यांच्या व दहा कोटी रुपये विद्यार्थिनींच्या वस्तीगृहासाठी मंजूर करण्याचे आश्वासित केले. यावरून जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्या, तुका म्हणे येथे पाहिजे जातीचे, येथे येड्या गबाळ्याचे काम नाही या वाक्याची धुन माळशिरस तालुक्यामध्ये वाजत आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



