श्री संत तुकाराम महाराज पालखी महामार्गाच्या बाधित शेतकऱ्यांच्या पाईपलाईनचा मोबदला रखडला….

भूसंपादन अधिकारी तथा प्रांताधिकारी यांच्याकडे सर्व कागदपत्रांचा प्रस्ताव सादर करून सुद्धा मोबदला न मिळाल्याचे गौडबंगाल कळेना, शेतकरी उपोषण व आंदोलन करण्याच्या तयारीत…
महाळुंग (बारामती झटका)
माळशिरस तालुक्यामधून श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्ग आळंदी ते पंढरपूर व श्री संत तुकाराम महाराज पालखी महामार्ग देहू ते पंढरपूर असे दोन महामार्ग माळशिरस तालुक्यातून गेलेले आहेत. महामार्गामध्ये बाधित झालेल्या काही शेतकऱ्यांचा मोबदला मिळालेला आहे तर श्री संत तुकाराम महाराज पालखी महामार्गावरील महाळुंग हद्दीमधील काही शेतकऱ्यांचे भूसंपादनामध्ये गेलेल्या विहीर पाईपलाईन, विंधन विहिरी याचे मोबदले जाणीवपूर्वक रखडलेले आहेत. भूसंपादन अधिकारी तथा प्रांताधिकारी यांच्याकडे सर्व कागदपत्रांचा प्रस्ताव सादर करून सुद्धा मोबदला न मिळाल्याचे गौडबंगाल कळेना. त्यामुळे शेतकरी उपोषण व आंदोलन करण्याच्या तयारीत असल्याचे बोलून दाखवत आहेत.

महाळुंग हद्दीमधील 70 ते 80 शेतकरी पाईपलाईनच्या मोबदल्यापासून वंचित राहिलेले आहेत. शेतकऱ्यांच्या मते सर्व कागदपत्रे प्रांताधिकारी कार्यालयांमध्ये जमा केलेले आहेत, तरीसुद्धा जाणीवपूर्वक काहीतरी त्रुटी दाखवून चालढकल सुरू आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोबदला देण्यामध्ये अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना नेमक्या अडचणी काय आहेत, असा सवाल उपस्थित करून शेतकरी आंदोलन व उपोषण करण्याच्या तयारीत असल्याचे सांगितले.
काही शेतकऱ्यांनी कितीतरी वेळा प्रांत कार्यालयात हेलपाटे घातले. संबंधित अधिकारी व क्लार्क यांची भेट घेतली. खाजगी काम करणारे कर्मचारी यांच्याशी सुद्धा संपर्क साधला, तरीसुद्धा अद्यापपर्यंत मोबदला मिळालेला नाही. यामागे काय गोड बंगाल आहे, असाही सवाल उपस्थित केलेला आहे. जर आठ दिवसांमध्ये पाईपलाईनचा मोबदला मिळाला नाही तर तीव्र स्वरूपात आंदोलन करून संबंधित अधिकारी व कर्मचारी यांच्यावर कार्यवाही करण्याची मागणी करणार असल्याचे सांगितले…

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



