मोटेवाडी ग्रामपंचायत जलजीवन भ्रष्टाचार प्रकरणी ग्रामस्थ आक्रमक…

आर्थिक फायद्यासाठी संगनमताने ग्रामपंचायत सरपंच, सदस्य, ग्रामविकास अधिकारी यांनी खोटी, बोगस खाडाखोड करून ग्रामसभा दाखवून फसवणूक केली म्हणून त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी
मोटेवाडी (बारामती झटका)
मोटेवाडी, ता. माळशिरस ग्रामपंचायत भ्रष्टाचार प्रकरणी जिल्हाधिकारी सोलापूर आणि सी. ओ. ऑफिस सोलापूर येथे भेट घेऊन मोटेवाडीतील ग्रामस्थांनी तक्रारी अर्ज देऊन संबंधितावर कडक कारवाई करण्यासाठी निवेदन दिले. आर्थिक फायदा होण्याकरिता संगनमताने ग्रामपंचायत सरपंच, सदस्य, ग्रामविकास अधिकारी (ग्रामसेवक) यांनी खोटी, बोगस खाडाखोड करून ग्रामसभा दाखवून फसवणूक केली म्हणून त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. यावेळी ॲड. संजय रामचंद्र माने, वैजनाथ पालवे, गोरख माने, नारायण देवकाते, नवनाथ दडस, नाना दडस, आप्पा मोटे, उत्तम कोळेकर, बळवंत देवकते, तानाजी हांडे, धनाजी सलगर,
सदर निवेदनामध्ये असे नमूद करण्यात आले आहे कि, ग्रामपंचायत गाव मौजे मोटेवाडी (मा.), ता. माळशिरस, जि. सोलापुर येथील ग्रामपंचायत कार्यालयात अनेक गैरप्रकार चालू आहेत. दि. २९/०९/२०२५ रोजी मी ग्रामपंचायत आवारामध्ये भरवलेल्या ग्रामसभेमध्ये सकाळी १०.०० वा. गेलो असता, ग्रामसभा अध्यक्ष (सरपंच) व सचिव (ग्रामसेवक) बंडू कुमार होळ यांच्या उपस्थितीसमक्ष जलजिवन मिशन संदर्भात मी व गावकऱ्यांनी त्याबद्दल विचारणा केली असता, सरपंच (ग्रामसभा अध्यक्ष) सचिव (ग्रामविकास अधिकारी) यांनी या योजनेबद्दल सविस्तर माहिती न देता त्यांनी कनिष्ठ अभियंता ए. एन. आंबले व तत्कालीन ग्रामविकास अधिकारी, पांडुरंग एकतपुरे हे माहिती देतील असे सांगितले. परंतु, त्यावेळी या दोघांपैकी कोणीच या ग्रामसभेला उपस्थीत नव्हते. शाखा अभियंता यांच्यावतीने ज्युनिअर इंजिनिअर वाघमोडे हे पाठवले आहेत व ते सर्व माहिती देतील असे अध्यक्ष व सचिव यांनी सांगितले. तेव्हा मी विचारले की, त्या संबंधित व्यक्ती आजच्या ग्रामसभेला का उपस्थित राहिल्या नाहीत. तेव्हा सरपंच अध्यक्ष यांनी सांगितले की, त्यांच्या वैयक्तिक अडचणींमुळे ज्युनिअर इंजिनिअर पाठवले आहेत व तत्कालीन ग्रामविकास अधिकारी, पांडुरंग एकतपुरे यांची बदली झाली असल्यामुळे ते येणार नाहीत असे सांगितले, तेव्हा मी विचारले की, त्यांना आपण ग्रामसभेस उपस्थित राहण्या संदर्भामध्ये पत्रव्यवहार केला होता का ? तर त्यांनी सांगितले की, हो केला होता.

तदनंतर शाखा अभियंता यांनी पाठवलेल्या ज्युनिअर इंजिनिअर यांनी जलजीवन मीशन संदर्भात माहिती सांगण्यास सुरूवात केली व १ कोटी २ लाख रूपयांची जलजीवन ची योजना आपल्या गावाला मंजूर झाली आहे, त्यापैकी कॉन्ट्रॅक्टर यांनी Below १०% नी टेंडर भरल्यामुळे ही योजना ९८ लाख रूपये जी.एस.टी. सह झाली आहे. त्यामध्ये ७०% काम पुर्ण झाले आहे, त्यांची सर्व रक्कम ६२ लाख रूपये अदा केली गेली आहे. तेव्हा कोणती कामे केली आहेत हे विचारल्यावरती सर्व कामे पुर्ण करून पाणी योजनेच्या नियमाप्रमाणे पाणी पुरवठा होत आहे. सर्व कुटुंब प्रमुख यांच्या नावाची यादी तसेच सर्व कर्मचारी यांची नावे इ. आयएमआयएस या पोर्टलवरती अपलोड करण्यात आली आहे, तेव्हा गावातील नागरीक यांनी आयएमआयएस पोर्टलवरती अपलोड केलेली कागदपत्रे दाखवली. तेव्हा असे निदर्शनास आले की, ३४० कुटुंबप्रमुख यांना पाणी पुरवठा होत आहे व अंगणवाडी, जिल्हा परिषद शाळा यांना पाणी पुरवठा होत असलेले कार्यात्मक घरगुती नळ जोडणी सर्व कुटुंबांना प्रदान केल्याचे प्रमाणपत्र तत्कालीन ग्रामविकास अधिकारी व सरपंच यांनी महिल ग्रामसभा दि. १०/०३/२०२५ च्या ग्रामसभेमध्ये ग्रामपंचायत ठराव करून शासन परिपत्रक जजीमि / २०२१/ प्र. क्र. ११७/पापू सोबत परिशिष्ट २, परिशिष्ट ३, परिशिष्ट १ ग्रामसभा व्हिडीओ चित्रीकरण करून अपलोड केले आहे, असे निदर्शनास आले. तेव्हा जी यादी जोडण्यात आली होती तिच्यामध्ये ज्या कुटुंब प्रमुखांची नावे आहेत ती यादी ग्रामपंचायत कर्मचारी यांनी वाचून दाखवली. तेव्हा जवळजवळ ३४० पैकी १०० कुटुंब प्रमुख उपस्थित होते. तेव्हा सर्वांनी सांगितले की, आम्हाला कोणालाच नळ जोडणी अथवा पाणी मिळाले नाही. तर तुम्ही आमची नावे कशीकाय यादीमध्ये दिली आहेत. तेव्हा सरपंच यांनी सांगितले की, सदर यादी ही ३४० ची नसून ९३ लोकांची आहे. तेव्हा मी विचारले की, ९३ कुटुंबाची यादी ग्रामसभेमध्ये वाचवून दाखवा तेव्हा ती यादी त्यांच्याकडे नाही असे अध्यक्ष (सरपंच) यांनी सांगितले.
त्यानंतर दि. १०/०३/२०२५ रोजी झालेल्या महिला विशेष ग्रामसभेमध्ये तुम्ही कसाकाय हा ठराव करून घेतला. तेव्हा सरंपच यांनी जाहिर केले की, त्या ग्रामसभेमध्ये तत्कालीन ग्रामविकास अधिकारी पांडूरंग एकतपुरे, आंबले कनिष्ठ अभियंता यांनी आम्हाला सांगितले की, ही मोदीची योजना आहे, मी जे विचारीन ते तुम्ही हो म्हणून सांगायचे. हे आपल्याला वरती पाठवायचे आहे. म्हणून आम्ही महिला ग्रामसभेमध्ये तो ठराव करून दिला, आमची फसवणुक झाली आहे.
तरी त्या दोघांच्या सांगण्यावरून आम्ही ते केले व तो ठराव आम्ही रद्द करून आमची फसवणुक झाली आहे. म्हणून त्यांच्यावरती फौजदारी कार्यवाही करणार आहे असे उत्तर दिले. तद्नंतर ग्रामसभा सदस्यांनी विचारले, महिला ग्रामसभेला हजेरी रजिस्टर मधील सदस्यांची नावे वाचून सांगा, तेव्हा ती यादी वाचण्यात आली त्यामध्ये १) सरपंच सतिश रामचंद्र मोटे व इतर ग्रामपंचायत सदस्य, २) हरिभाऊ दडस, ३) महादेव मोटे ४) कुसूम दशरथ पालवे व इतर यांनी पाणी गुणवत्ता चाचणी समिती व अंगणवाडी सेविका १) रमन ज्ञानेश्वर सरगर, २) उज्वला आण्णा ठेंगल, ३) सोनाली दादासाहेब वायदंडे, ग्रामपंचायत कर्मचारी सचिन केंगार, ४) दादासाहेब अंकुश नामदास तसेच योजना देखभाल दुरूस्ती कर्मचारी (वायरमन), अर्जुन भिवा यमगर, पोलीस पाटील विष्णू तरडे, वंदना तानाजी देवकाते- उपसरपं व इतर ग्रामपंचायत सदस्य अशी २१ लोकांची यादी दिली. त्या ग्रामसभेचा ग्रामसभा प्रोसिडींग व हजेरी रजिस्टर मला दाखवण्यात आले. सदर कागदपत्रे दाखवल्यावर माझ्या लक्षात आले की, सदर ग्रामसभा ही खोटी, बनावट, बोगस सभा वृत्तांत घेवून तसेच खाडाखोड करून ठराव नं. २ मध्ये जलजीवन योजनेच ठराव करून घेतला आहे. सदर ग्रामसभेमध्ये ग्रामपंचायत कर्मचारी व ग्रामपंचायत सदस्य वगळता कोणती महिला ग्रामसभेला उपस्थित नव्हती. सदरच्या कथित ग्रामसभेचा कोणताही कोरम पुर्ण नाही. सदरच्या कथीत ग्रामसभा प्रोसिडींगची सही शिक्याची नक्कल सोबत जोडत आहे.

मुख्यतः अशी खोटी ग्रामसभा आयोजित करून जलजीवन योजनेची बिले काढण्यासाठी घाईघाईत व्हिडीओ चित्रीत करून शासनाच्या परिपत्रकाप्रमाणे बोगस ग्रामसभा दाखवण्यात आली आहे. याबाबतची तक्रार मा. गटविकास अधिकारी सोो. यांचे दाखल दि. ०९/०६/२०२५ रोजी दिला होता, त्यामध्ये मा. गटविकास अधिकारी सोो. यांनी कार्यवाही केल्याचा दि. ०५/०८/२०२५ रोजीच्या अहवालामध्ये सदर ग्रामसभा ही अवैध ठरविलेली आहे, असा अहवाल दिला आहे. सदर अहवालामध्ये सरपंच यांचा जबाब नोंदविलेला आहे. त्यामध्ये शासन परिपत्रकामध्ये महिला सभा घेवून घोषित करावे म्हणून तो ठराव घेतला असा खोटा जबाब नोंदविला आहे. सदर पत्रामध्ये सर्वसाधारण सभा घेवून दि. १५ ऑगस्ट व २६ जानेवारी असा उल्लेख केलेला आहे. सदर शासन निर्णयाचाही अवमान केलेला दिसून येत आहे, त्यामुळे सरपंच, ग्रामपंचायत कार्यवाहीस पात्र आहे.
तसेच, ग्रामपंचातीची कामे एकाच कॉन्ट्रॅक्टर समर्थ एन्टरप्रायजेस यांना टेंडर देवून त्यांच्याकडूनच काम करून घेत आहे. यामध्ये देखील लाखो रूपयांचा भ्रष्टाचार करत आहेत. तसेच बाजीराव वायदंडे वस्ती, सटवाई वस्ती, मामा केंगार वस्ती, या मागासवर्गीय निधीतून आलेल्या पेव्हींग ब्लॉक बसवणे यामध्ये निकृष्ठ दर्जाचे काम करून त्यामध्येही मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केलेला आहे. तसेच घरकुल योजना ही सर्वसामान्यांसाठी असताना देखील नातेवाईक (भाऊ) यांनाच देवून आर्थिक लाभ मिळविलेला आहे. तसेच १५ वा वित्त आयोगातून केलेल्या पाणी पुरवठा जुनी योजना यामध्ये केलेल्या कामाची बिले काढून सदर काम देखील जल जिवन योजनेची आहेत, असे भासवून त्यातही भ्रष्टाचार करण्यात आलेला आहे. रस्ता मुरमीकरण निकृष्ठ दर्जाचे करत असताना ग्रामस्थ श्री. शितल नारायण देवकाते यांनी जाब विचारला असता, त्यांच्या घरी जावून त्यांचेवर हल्ला करून शिवीगाळ करून मारहाण केली आहे. यासंदर्भात माळशिरस पोलीस स्टेशनमध्ये दि. १५/०५/२०२५ रोजी एन.सी. नोंदविलेली आहे. सदर ग्रामपंचायत सरपंच, सदस्य हे ग्रामस्थांना धमकावणे, दमदाटी करणे, दहशत माजवून ग्रामपंचायतीमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करत आहेत. त्यामुळे महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ चे तरतुदीनुसार व शासन परिपत्रकानुसार कोणतेही नियमांची पुर्तता संबंधितांनी केलेली नाही, त्यामुळे प्रस्तुतचा अर्ज आपणाकडे करणे भाग पडलेले आहे.
तरी मा. साहेबांस नम्र विनंती की,
१) दि. १०/०३/२०२५ रोजी झालेली विशेष महिला ग्रामसभा ही बोगस, बनावट, खोटी, खाडाखोड करून जलजीवन मिशन योजनेचे बिले काढण्यासाठी घेवून ६२ लाख रूपयांचा भ्रष्टाचार केला आहे.
२) सदर ग्रामपंचायत सरपंच, सदस्यांवरती फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करावेत.
३) ग्रामसेवक/ग्रामविकास अधिकारी पांडूरंग महादेव एकतपुरे व शाखा अभियंता ए. एन. आंबले यांचेवरही फौजदारी गुन्हा दाखल करावा व सदर योजनेचे पैसे वसुल करून घ्यावे.
४) सदर योजनेचे ठेकेदार बंटू खरात यांनीही काम न करता बिल संगनमत करून काढून घेतले आहे, त्यांच्यावरही फौजदारी गुन्हा दाखल करावा व त्यांना ब्लॅकलिस्ट (काळयात यादीत टाकण्यात यावे) करण्यात यावे.
५) तसेच ग्रामपंचायतीने वेळोवेळी मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केलेला असल्याने सदरची ग्रामपंचायत बरखास्त करण्यात यावी. असे नमूद करण्यात आले आहे
सदर निवेदनाच्या प्रती १) मा. प्रधान सचिव व मा. अतिरिक्त मुख्य सचिव सोो., ग्रामविकास विभाग, महाराष्ट्र शासन, मंत्रालय, मुंबई- ४००००१.
२) मा. विभागीय आयुक्त सोो., पुणे विभाग, पुणे.
३) मा. जिल्हाधिकारी सोो., जिल्हाधिकारी कार्यालय, सोलापुर.
४) मा. मुख्य कार्यकारी अधिकारी सोो., जिल्ह परिषद, सोलापुर.
५) मा. गट विकास अधिकारी सोो. पंचायत समिती, माळशिरस, सोलापुर यांना देण्यात आल्या आहेत.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



