सेवा हमी पंधरवड्यात 1 हजार वृक्षारोपण करण्यात येणार – तहसीलदार गणेश शिंदे

बारामती (बारामती झटका)
छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानाअंतर्गत तालुक्यात राबविण्यात येणाऱ्या सेवा हमी पंधरवड्यात सर्व तलाठी कार्यालयात येत्या 30 सप्टेंबर रोजी स्वच्छता मोहिम राबविण्यात येणार आहे. वृक्षारोपण मोहिमेअंतर्गत प्रत्येक तलाठी कार्यालयाच्यावतीने 25 वृक्षाची लागवड याप्रमाणे सुमारे 1 हजार वृक्षारोपण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे, अशी माहिती तहसीलदार गणेश शिंदे यांनी दिली.
तहसीलदार श्री. शिंदे यांच्या हस्ते मेडद तलाठी कार्यालयात वृक्षारोपण मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी सरपंच, ग्रामसेवक, तलाठी, ग्रामस्थ आदी उपस्थित होते.

श्री. शिंदे म्हणाले, सेवा हमी पंधरवड्याअंतर्गत पाणरस्त्यांचे भौगोलिक चिन्हांकन करण्याकरिता (जीआयएस मॅपिंग) प्रत्येक मंडळाअंतर्गत 1 या प्रमाणे 15 गावांची निवड करण्यात आली आहे. याकामी पाणंद रस्त्यांची मोजणी करण्याकरिता सर्व्हेवरची नेमणूक करण्यात आली. संमतीने तयार करण्यात आलेल्या पाणंद रस्त्याची अभिलेख्यात नोंद घेण्यात येणार आहे.

भटक्या व विमुक्त जमातीच्या नागरिकांना विविध सेवांचा लाभ देण्याच्या अनुषंगाने बारामती व मानप्पावाडी येथे शिबीराचे आयोजन करण्यात येणार आहे, प्रशासनाच्यावतीने राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमात अधिकाधिक नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन तहसीलदार गणेश शिंदे यांनी केले आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



